Skip to main content
x

शास्त्री, बापूदेव सीताराम

      सीताराम शास्त्री व त्यांच्या पत्नी सत्यभामाबाई यांच्या पोटी बापूदेव यांचा जन्म कायगाव टोका या अहमदनगर जिल्ह्यातील गावी झाला. वडिलांनी मुलाचे नामकरण ‘नृसिंह’ असे केले. परंतु प्रेमापोटी सर्वजण त्याला ‘बापू’ या नावानेच संबोधित असत. लहानपणाच्या या नावानेच ते पुढे जीवनभर ओळखले गेले. त्या काळच्या पद्धतीप्रमाणे बापूचे शिक्षण सुरू झाले. सुरुवातीस त्याने अष्टाध्यायी, पिंगलसूत्र, रूपावली, अमरकोश इत्यादी ग्रंथांचे अध्ययन केले. मुंजीनंतर वेदपठण केले. परंतु प्रकृती-अस्वास्थ्यामुळे विस्मृती होऊ लागली. तेव्हा सीताराम शास्त्री नागपूरला नोकरी करीत होते, म्हणून बापूला ते नागपूरला घेऊन गेले. तेथे त्याने रघुवंश, लघुकौमुदी इत्यादी ग्रंथांचा अभ्यास केला. पुढे नोकरीच्या बदलीमुळे वडलांबरोबर बापू पुण्यास गेला. तेथे पं.पांडुरंग तात्या दिवेकर यांच्या पाठशाळेत त्याने गणितशास्त्राचे अध्ययन केले. परंतु वडिलांबरोबर ते पुन्हा नागपुरास आले. येथे पं.धुंडिराज मिश्र यांच्याकडून लीलावती, बीजगणित इत्यादी प्रसिद्ध ज्योतिष ग्रंथांचे शिक्षण घेतले.

    बापूदेवांचे वडील सीताराम शास्त्री यांचे स्नेही, एक आंग्ल विद्वान लान्सलाट विल्किन्सन हे त्या वेळेस सिहोर येथील ‘पोलिटिकल एजन्ट’ होते. ते पाश्चात्त्य गणिताचे विद्वान होते. त्यांनी बापूच्या हुशारीबद्दल प्रशंसा ऐकल्यावर नागपूरला त्याला भेटावयास बोलावले. त्या भेटीत बीजगणितासंबंधीच्या त्याने दिलेल्या उत्तराने विल्किन्सनसाहेब अतिशय खूश झाले. परंतु सिद्धान्त गणिताबाबत त्याचे ज्ञान तोकडे आहे असे पाहून बापूदेवला ते सिहोरला घेऊन गेले. तेथे पं.सेवाराम यांच्याकडे ‘सिद्धान्त शिरोमणी’ ग्रंथाचे अध्ययन करण्याची त्यांनी व्यवस्था केली. तसेच बीजगणित व रेखागणित स्वत: विल्किन्सन साहेब शिकवीत. अशा तऱ्हेने बापूदेवने गणित विषयात पारंगतता मिळवली.

     इतके प्रगाढ पांडित्य प्राप्त झाल्यावर शासकीय संस्कृत महाविद्यालय, काशीच्या ज्योतिष विभागाचे अध्यापकपद मिळावे, अशी बापूंची इच्छा  होती. परंतु विल्किन्सनसाहेबांच्या अचानक निधनामुळे त्यांची इच्छा तेव्हा पूर्ण होऊ शकली नाही. लान्सलाटचे भाऊ मेजर टी. विल्किन्सन नंतर नागपूरचे रेसिडंट नेमले गेले. बापूदेवने एका प्राचीन शिलालेखाची नक्कल सुंदर व शुद्ध तयार करून साहेबास दिली, ज्यामुळे अत्यंत प्रसन्न होऊन त्यांनी त्यांस २०० रुपयांचा पुरस्कार दिला व त्यांच्या शिफारशीनुसार बापूदेव शास्त्रींची १५ फेब्रुवारी १८४२ रोजी शासकीय संस्कृत महाविद्यालय, काशी येथे ज्योतिषगणिताच्या अध्यापकपदावर नियुक्ती झाली.

     त्या काळी विद्यार्थ्यांना लागणाऱ्या पाठ्यपुस्तकांचा फारच अभाव असे. तेव्हा बापूदेव शास्त्रींनी सिद्धान्त तथा गणितशास्त्र विषयाच्या नवीन ग्रंथांची निर्मिती व संपादन केले. त्यांनी इंग्रजी भाषेचेही अध्ययन केले. बापूदेव शास्त्रींची विद्वत्ता, विनयशीलता व ग्रंथलेखन यांमुळे सर्व विद्यार्थी व प्राचार्य वेलेन्टाइन प्रसन्न व प्रभावित झाले. तेथे त्यांनी आठ वर्षे अध्यापन केले. इ.स. १८५० मध्ये काशीचे जिल्हाधिकारी मॅकलॉइडसाहेबांनी बापूदेव शास्त्रींना गणित विषयावरील ग्रंथांची निर्मिती करण्याचा आग्रह केला. तेव्हा त्यांनी ‘बीजगणित’ ग्रंथ हिंदी भाषेत लिहून १८५० साली मुंबईहून प्रकाशित केला. या विद्वत्तापूर्ण पुस्तकासाठी तेव्हाच्या लेफ्टनंट गव्हर्नरांनी बापूदेव शास्त्रींना दोन हजार रुपये पुरस्कार देऊन सन्मान केला. त्याच सुमारास ‘इंग्लिश जर्नल ऑफ एज्युकेशन’ या नियतकालिकात सिद्धान्त ज्योतिष विषयावर एक लेख प्रसिद्ध झाला. त्यामधे अनेक चुका असल्याचे बापूदेव शास्त्रींनी दर्शवून दिल्याने लेखकास त्या मान्य कराव्या लागल्या.

      इ.स. १८६१ साली बापूदेव शास्त्रींनी ‘सूर्यसिद्धान्त: सोपपत्तिका’ नामक ग्रंथाची रचना केली. तिचे इंग्रजी भाषांतर लान मिलेट विल्किन्सन यांनी एशियाटिक सोसायटी ऑफ बंगालच्या ‘बिब्लोथिका इंडिका’ ग्रंथमालेत टिप्पणींसहित प्रसिद्ध केले. या ग्रंथाच्या ‘गोलाध्याय’चासुद्धा इंग्रजी अनुवाद प्रकाशित होऊन ख्यातिप्राप्त झाला. पाश्चात्त्य गणित तत्त्वावर आधारित त्यांचा संस्कृतमधील ‘सरल त्रिकोणमिती’ ग्रंथ, शंभर वर्षांहून अधिक काळ लोटला असूनही, आजही त्याचे महत्त्व कमी झालेले नाही.

     शास्त्रींनी संस्कृतमध्ये  १. सूर्यसिद्धान्त-सोपपत्तिका, २. फलितविचार, ३. सायनवाद,  ४. मानमंदिर-वर्णनम्, ५. प्राचीन-ज्योतिषाचार्याशय-वर्णनम्, ६. तत्त्वविवेक-परीक्षा, ७. विचित्र-प्रश्‍नसंग्रह : सोत्तर, ८. अतुलयंत्रम्, ९. पंचक्रोशियात्रानिर्णय, १०. नूतनपंचांगनिर्माणम्, ११. पंचांगोपपादनम्, १२. सिद्धान्त शिरोमणी ग्रंथे चलगणितम् हे बारा ग्रंथ; हिंदीमध्ये १. बीजगणितम्, २. व्यक्तगणितम्, ३. भूगोलवर्णनम्, ४. खगोलसार हे चार ग्रंथ, तर इंग्लिशमध्ये १. एलिमेंट्स ऑफ अरिथ्मॅटिक, दोन भाग, २. एलिमेंट ऑफ अल्जिब्रा, असे दोन ग्रंथ इ.स. १८५० ते १८७५ या काळात प्रसिद्ध केले.

     शास्त्री यांना अनेक मानसन्मान प्राप्त झाले. इ.स. १८६४ मध्ये त्यांना लंडनच्या रॉयल एशियाटिक सोसायटीची मानद सदस्यता  प्रदान करण्यात आली. ‘बीजगणित’च्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशनावर प्रसन्न होऊन तेव्हाचे लेफ्टनंट गव्हर्नर सर विलियम म्युअर यांनी पं. बापूदेव यांना प्रयाग येथे किमती रेशमी वस्त्र व एक सहस्र मुद्रा देऊन सन्मानित केले. इ.स. १८७० मध्ये भारताच्या व्हाइसरॉयने त्यांना कोलकाता विश्वविद्यालयाचे मानद सदस्यत्व (फेलोशिप) बहाल केले. त्यांनी सूर्य व चंद्रग्रहणाची निर्धारित केलेली वेळ क्षणभरही बदलली नाही. याने प्रसन्न होऊन काश्मीर महाराजांनी इ.स. १८७३ मध्ये त्यांना शाल व एक सहस्र मुद्रा देऊन गौरवान्वित केले. इ.स. १८७५ मध्ये काशीनरेशांच्या विनंतीनुसार त्यांनी नव्या नूतन पंचांगाची सुरुवात केली. त्यासाठी महाराजांनी त्यांना दोनशे रुपयांचे पेन्शन जाहीर केले.

     इ.स. १८७७ मध्ये महाराणी व्हिक्टोरिया ‘राजराजेश्वरी’ झाल्याच्या सन्मानार्थ भारतीय विद्वानांना पदके प्रदान करण्यात आली. त्यांत पं.बापूदेव शास्त्री अग्रगण्य होते. पुन्हा इ.स. १८७८ मध्ये १ जानेवारीला व्हिक्टोरिया राणीच्या निमित्ताने जो विशेष समारंभ झाला, त्यात पं. बापूदेवजींना सी.आय.ई.च्या उपाधीने विभूषित करण्यात आले. संस्कृत पंडितांमध्ये हा मान मिळविणारे हे सर्वप्रथम होते. इ.स. १८८७ मध्ये महाराणी व्हिक्टोरियाच्या सुवर्णजयंती निमित्ताने संस्कृत पंडितांच्या सन्मानार्थ ‘महामहोपाध्याय’ पदवी देण्याची सुरुवात करण्यात आली. त्याचे सर्वप्रथम मानकरी होते, पं.बापूदेव शास्त्री.

     शास्त्रींचे भारतीय पंचांगनिर्मितीतील विशेष योगदान नेहमीच अविस्मरणीय राहील. त्यांच्या दृक-सिद्ध पंचांगाचे वैशिष्ट्य म्हणजे ते आधुनिक यंत्रांद्वारे निर्मित ग्रहवेधांवर आधारित आहे. या पंचांगाची सुरुवात त्यांनी इ.स. १८७६ मध्ये केली. हे पंचांग आजही प्रकाशित होत असते.

     काशीच्या शासकीय महाविद्यालयामध्ये ४७ वर्षे अध्यापन करून इ.स. १८८९ मध्ये ते सेवानिवृत्त झाले. तेव्हा त्यांचे वय ७० होते. त्याच्या पुढील वर्षीच, म्हणजे इ.स. १८९० मध्ये, ७ जूनला काशी येथे त्यांचे देहावसान झाले.

सूर्यकांत कुलकर्णी

शास्त्री, बापूदेव सीताराम