Skip to main content
x

साठे सदाशिव दत्तात्रेय

भाऊ साठे

           शिल्पकार सदाशिव दत्तात्रेय साठे यांचा जन्म पेण तालुक्यातील वावोशी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव रमाबाई होते. त्यांचे बालपण कल्याण येथे व्यतीत झाले. घरात चैत्रगौर, नागपंचमी, गणपती, दिवाळी यांसारखे उत्सव व सणावारांच्या अनुषंगाने सजावट केली जात असे. मुख्यतः शिल्पकलेचे संस्कार होण्यात त्यांचे काका हरी रामचंद्र साठे यांचे मोठेच योगदान होते. काकांचा कल्याणमध्ये गणपती बनविण्याचा व्यवसाय होता. तेथे गणपतीच्या मूर्तींसोबतच नवरात्रीसाठी महालक्ष्मीचे मुखवटे, नागपंचमीचे नाग इत्यादीही केले जात. या प्रकारच्या कलात्मक वातावरणात त्यांची जडणघडण होत गेली व त्यांना शिल्पकलेबद्दल आत्मीयता वाटू लागली.

               मॅट्रिक झाल्यानंतर १९४४ ते १९४८ या कालावधीत त्यांनी सर जे.जे. स्कूल ऑफ आर्ट येथे ‘शिल्पकला’ विभागाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. या अभ्यासक्रमात पाश्‍चिमात्य पद्धतीच्या वास्तवचित्रणावर भर असल्याने सदाशिव साठे यांचा शरीरशास्त्राचा सखोल अभ्यास व तो शिल्पात आणण्याचे त्यांचे तांत्रिक कौशल्य घोटून पक्के झाले. पुढे त्यांना स्मारकशिल्प घडविताना याचा चांगला उपयोग झाला.

               शिक्षण संपल्यावर चित्रपट निर्माता-दिग्दर्शक व्ही. शांताराम यांच्या ‘राजकमल’ स्टुडीओच्या आर्ट डिपार्टमेंटमध्ये साठे यांना नोकरी मिळाली. परंतु तेथे अपेक्षित कलानिर्मितीस अजिबातच वाव नसल्याने चार-सहा महिन्यांतच त्यांनी ती नोकरी सोडली. पुढे १९५२ मध्ये दिल्लीत एका फर्ममध्ये काम मिळाले व तेथील कलाजगताशी त्यांचा परिचय झाला.

               दिल्लीचे कलाजगत त्या वेळी थंडच होते. तथापि राजधानीचे शहर व पंडित नेहरूंसारखी कलाप्रिय व्यक्ती पंतप्रधानपदी असल्याने कलेला तेथे निश्‍चित वाव मिळेल अशी त्यांनी अटकळ बांधली व आपले बस्तान दिल्लीतच बसविण्याचा निर्णय घेतला.  सदाशिव साठे पंचवीस वर्षे तेथे होते व नंतर ते मुंबईत परतले. त्यांचा विवाह १९५६ मध्ये चित्रकार कृ.र. केतकर यांची कन्या नेत्रा हिच्याशी झाला.

               त्या काळी मराठी कुटुंबातील होतकरू तरुणाचा हा निर्णय धाडसी होता. कामे मिळविणे व तेथे स्थिरावण्याच्या प्रयत्नात १९५३ मध्ये तत्कालीन अर्थमंत्री चिंतामणराव देशमुख यांना समोर बसवून त्यांचे व्यक्तिचित्र करण्याची संधी साठे यांना मिळाली. त्यानंतर स्मारकशिल्पांच्या व व्यक्तिशिल्पांच्या परंपरेत सदाशिव साठे यांनी दर्जेदार व वैविध्यपूर्ण निर्मिती वेगवेगळ्या माध्यमांतून, भारतभर केली. अभिव्यक्तीतील कल्पकता, नावीन्यपूर्ण दृष्टिकोन ही त्यांच्या स्मारकशिल्पांची वैशिष्ट्ये आहेत. स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या काळात त्यांना थेट दिल्लीतील राजकीय वर्तुळात मान्यता मिळाली. त्यांनी १९५३-१९५४ मध्ये दिल्लीच्या महानगरपालिकेसाठी महात्मा गांधी यांचे  पहिले व महत्त्वाचे पूर्णाकृती स्मारकशिल्प केले. गांधीजींचे देशातील हे पहिलेच स्मारक होते. तेव्हापासून आजतागायत अनेक प्रतिष्ठित ठिकाणी त्यांनी स्मारकशिल्पे तयार केली आहेत. त्यांपैकी काही  महत्त्वाच्या शिल्पाकृतीः मुंबईतील गेटवे ऑफ इंडियासमोरचा शिवाजी महाराजांचा अठरा फूट उंचीचा अश्‍वारूढ पुतळा (१९६१). त्या निमित्ताने ब्राँझ कास्टिंगच्या क्षेत्रात त्यांनी विशेष संशोधनही केले. ग्वाल्हेर येथील झाशीच्या राणीचा पुतळा (१९६२), दिल्लीत लालकिल्ल्यासमोरील उद्यानात नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे बंदूकधारी सैनिकांसह आक्रमक पवित्र्यातील समूहशिल्प (१९७५), आसाम, गोहत्ती येथे म. गांधी, चिलाराय, लासितबारफोकन आदी ऐतिहासिक व्यक्तींची भव्य शिल्पे (१९८६ ते १९८९). चंदिगड येथे येशू ख्रिस्त, पंजाबात क्रांतिकारकांची अनेक शिल्पे, मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, आंध्रप्रदेश येथे अनेक भव्य स्मारकशिल्पे, यांसह नागपूर, औरंगाबाद, सोलापूर, नाशिक, मुंबई अशा अनेक ठिकाणी त्यांची शिवस्मारक शिल्पे आहेत.

               याखेरीज मंत्रिगण, नेते, सामाजिक कार्यकर्ते, लेखक इत्यादी प्रतिष्ठित मंडळींना समोर बसवून सदाशिव साठे यांनी त्यांची व्यक्तिशिल्पे केली आहेत. त्यांत महर्षी कर्वे, यशवंतराव चव्हाण, जयप्रकाश नारायण, सर्वपल्ली राधाकृष्णन, अटलबिहारी वाजपेयी इत्यादींचा समावेश आहे. याशिवाय लॉर्ड माउण्टबॅटन व प्रिन्स फिलिप्स यांची शिल्पे साठे यांनी लंडनमध्ये त्यांच्या राहत्या घरी, त्यांना समक्ष बसवून केली. जपान, थायलंड, मलेशिया, सिंगापूर, हॉलंड, बेल्जियम, रोम, इंग्लंड येथे त्यांनी मं. गांधींचे पुतळे केले असून लंडन, मॉस्को व इतरत्र शिल्प-प्रदर्शने, अभ्यासदौरे केले आहेत.

               साठे यांना राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक मानसन्मान व गौरव प्राप्त झाले. पंतप्रधान, राष्ट्रपती यांच्याकडून त्यांचे सत्कारही झाले. बॉम्बे आर्ट सोसायटी व आर्ट सोसायटी ऑफ इंडिया या कलासंस्थांकडून त्यांच्या कलाकारकिर्दीचा गौरव करणारे पुरस्कार त्यांना २००९ मध्ये मिळाले. देश-परदेशांत त्यांनी शिल्प-प्रदर्शने केली. भारत सरकारतर्फे रशियात गेलेल्या सांस्कृतिक शिष्टमंडळात त्यांचा समावेश होता. त्यांचे मॉस्कोतही प्रदर्शन झाले. त्यांना ‘गोदा गौरव’, ‘याज्ञवल्क्य’सारखे इतरही पुरस्कार मिळाले.

               शिल्पाकृती घडविताना रूढ पद्धतीपेक्षा नेहमी काहीतरी वेगळे व नावीन्यपूर्ण देण्याचा साठे यांचा प्रयत्न असतो. व्यक्तीचे साधर्म्य ते सहजतेने जपतात. संदर्भासाठी ते शक्य असेल तेथे संबंधित व्यक्तीबद्दल वाचन करतात. काही वेळा इतिहासतज्ज्ञांशीही त्यांनी चर्चा केली होती.

               आधुनिक तंत्र व साधनसामग्रीचा ते कौशल्याने उपयोग करतात. त्यांच्या बर्‍याच शिल्पांत माती लावताना विशिष्ट प्रकारे दाब देऊन मातीचे लहानलहान गोळे लावत एक पोत निर्माण केलेला आढळतो.

               साठे यांनी स्मारकशिल्पाच्या रूढ संकल्पनांपेक्षा आधुनिक व वेगळ्या पद्धतीच्या काही स्मारकशिल्पांच्या संकल्पना तयार केल्या होत्या. परंतु कलावंताचा प्रतिभाविलास काही वेळा संबंधितांना आकलन होत नाही किंवा रुचत नाही. मग अशा संकल्पना व्यवहारात उतरविल्या जात नाहीत. साठे यांच्या बाबतीत काही वेळा असे घडले. त्यांची काही अपारंपरिक पद्धतीची स्मारकशिल्पे उत्तम दर्जाची, तरल असूनही वेगवेगळ्या कारणांनी ती प्रत्यक्षात आली नाहीत. उदा. दिल्लीतील बुद्धस्मारक (१९५६), कन्याकुमारीच्या शिलाखंडावर उभा असलेला विवेकानंदांचा पुतळा (१९६५), मुंबईत नेहरू सेंटरसाठी कल्पिलेले नेहरूंचे शिल्प (१९८०). यातील नेहरू सेंटरच्या शिल्पात त्यांना वीस फुटांच्या अखंड शिलाखंडातून नेहरूंच्या अलौकिक व विविध पैलू असणार्‍या व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडवायचे होते. या संकल्पनेला आकार देताना नेहरूंच्या चेहरेपट्टीची अगदी आवश्यक तेवढीच ओळख देऊन, कमीतकमी रेषांतून आणि मर्यादित व सपाट पातळ्यांच्या संयोगातून त्यांचे तरल व्यक्तिमत्त्व पकडण्याचा प्रयत्न केला होता. विस्तृत पातळ्यांच्या पृष्ठभागावर केवळ रेखाकृतींनी त्यांच्या जीवनाचे नाना पैलू व प्रसंग दर्शविले होते. अशा काही शिल्पांच्या त्यांच्या संकल्पना ‘आकार...’ या त्यांच्या पुस्तकात छायाचित्रांसह व्यक्त झाल्या आहेत.

               सदाशिव साठे लिखित, ‘आकार — जन्मकथा शिल्पांची’ हे पुस्तक २००० मध्ये प्रसिद्ध झाले. शिल्पकलेबाबत अनुभवकथन करणारे हे मराठीतील पहिले पुस्तक आहे. त्यातून त्यांचा कलाप्रवास समजतो. या आत्मकथनात त्यांना मिळालेली संधी, निर्मितीच्या काळातील थरार, धुंदी, आव्हाने, समर्पकतेने लिहिली . चांगल्या शिल्पाकृतींचे निकष, शिल्पनिर्मिती व ती प्रत्यक्षात येण्याचे तीन मुख्य घटक, शिल्पकाराची आव्हाने, अडचणी, आर्थिक व्यवहार, तांत्रिक बाबी अशा अनेक बाबतींतील त्यांचे चिंतन-विवेचन त्यात दिसते . याखेरीज त्यांनी वेळोवेळी वृत्तपत्रीय लेखनही केले .

               स्वतःच्या शिल्पांच्या कायमस्वरूपी संग्रहालयासाठी व कलेच्या प्रसारासाठी त्यांनी ‘सदाशिव साठे प्रतिष्ठान’ २००६ मध्ये स्थापन केले . डोंबिवली एम.आय.डी.सी. येथे त्यांनी शिल्पालय बांधले .

- साधना बहुळकर

साठे सदाशिव दत्तात्रेय