Skip to main content
x

सडेकर, रामनाथ धोंडो

              जागतिक तुलनेत संख्येने मोठ्या असलेल्या भारतीय पशुधनाची अनुत्पादकता वा अल्प उत्पादकता हा नेहमीच चिंतेचा विषय राहिला आहे. एकंदर पशु-आरोग्यरक्षणाविषयी पशुपालनात असलेली अनास्था हे अल्प उत्पादकतेचे प्रमुख कारण समजले जाते. मात्र ही अनास्था महागड्या आधुनिक औषधोपचारामुळे (अ‍ॅलोपॅथी) आली आहे. आणि जनावरांची उत्पादकता वाढवायची असल्यास सहज उपलब्ध व स्वस्त अशी पर्यायी औषधयोजना शास्त्रीय कसोट्यांवर पारखून पशुपालकांना उपलब्ध करून देणे आवश्यक आहे, याची परखड जाणीव ठेवणाऱ्या पशुवैज्ञानिकांपैकी डॉ. रामनाथ धोंडो सडेकर हे एक होते.

              कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड या गावी जन्मलेल्या रामनाथ धोंडो सडेकरांचे प्राथमिक शिक्षण चंदगड येथे तर माध्यमिक शिक्षण मुंबईतील पार्ले टिळक विद्यालयात पार पडले. मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी (१९६५) आणि औषधविज्ञानशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी (१९७०) प्राप्त करून सडेकर यांनी गोविंदवल्लभ पंत कृषी विद्यापीठातून १९८४मध्ये याच विषयातील पीएच.डी. पदवी विशेष प्रावीण्यासह संपादन केली. त्यांनी रवंथ करणाऱ्या जनावरांतील रोगचिकित्सा (१९७३) आणि ‘वासरांचे संगोपन व व्यवस्थापन’ (१९७७) तसेच ‘संगणक प्रशिक्षण’ (२०००) हे अभ्यासक्रमही पूर्ण केले. त्यांनी १९६५ ते १९७२ या काळात महाराष्ट्र शासनाच्या पशु-संवर्धन विभागात पशुवैद्यकीय अधिकारी म्हणून काम करताना मेष पैदास केंद्र, कागल (१९६५) व पशुवैद्यकीय सर्वचिकित्सालय, चिपळूण (१९७०) या संस्थांची उभारणी केली. त्या काळात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची चणचण असणाऱ्या रत्नागिरीसह देवरुख, लांजा आणि राजापूर या तालुक्यांचे पशुवैद्यकीय अधिकारी म्हणूनही डॉ. सडेकरांनी काम सांभाळले. त्यांनी कोकणातील मालगुंड येथे सर्वांत मोठ्या सहकारी कुक्कुटपालन केंद्राची स्थापना, देवरुख तालुक्यात राबवण्यात येणाऱ्या केंद्रीय योजनांद्वारे छोट्या शेतकऱ्यांसाठी दुधाळ म्हशींचे वाटप, खासगी स्तरावर कुक्कुटपालन व्यवसायाला प्रोत्साहन अशा विविध योजना हिरिरीने राबवल्या.

              जनावरांच्या आरोग्यासाठी आणि उत्पादकता वाढीसाठी वनौषधी ही संकल्पना पशुवैद्यकीय विज्ञान क्षेत्रात रुजवून विकसित करण्यासाठी सडेकर यांनी मोठे योगदान दिले आहे. त्यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरांवर ही संकल्पना सादर केली. परिणामी जेथे वनौषधींच्या उपयुक्ततेवर संशोधन होत नाही अशी एकही पशुविज्ञानविषयक शिक्षण व संशोधन संस्था आज भारतात नाही. वनौषधीबरोबर होमिओपॅथीचाही पर्यायी औषधोपचार योजना म्हणून विचार होणे गरजेचे होते. पशुवैद्यकीय दवाखाने आणि जिल्हा पातळीवरील पशुवैद्यकीय रुग्णालये यांच्या मदतीने जनावरातील रोगांवर उपचार करण्यासाठी अनेक होमिओपॅथिक औषधांची उपयुक्तता डॉ. सडेकर यांनी सिद्ध करून दाखवली. पशुवैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमात वनौषधी व होमिओपॅथी औषधयोजना हा विषय अंतर्भूत व्हावा, यासाठी त्यांनी तळमळीने प्रयत्न केले.

              गुहागर तालुक्यातील गाई-बैलातील पक्षाघात हा वारंवार उद्भवणारा रोग जनावरांच्या हाडे चघळण्याच्या सवयीमुळे होतो व हाडे चघळण्याची सवय ही कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जडते, हा शासनाच्या रोगअन्वेषण विभागाचा नित्कर्ष होता. तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर याची माहिती पोहोचवण्यासाठी आणि जनावरांच्या खाद्यान्नात कॅल्शियमचा वापर वाढवण्यासाठी डॉ. सडेकरांनी अपरिमित प्रयत्न केले. परिणामी सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात गुहागर तालुक्यातील जनावरांच्या पक्षाघाताचे प्रमाण दहा टक्क्यांहूनही खाली घरसले. कोंबड्यातील राणीखेत रोगाचा प्रसार रोखण्यासाठी त्यांचे लसीकरण हाच एक उपाय आहे व दिवसभरात शंभर टक्के लसीकरण होत नाही, हे लक्षात येताच त्यांनी सायंकाळी व रात्रीच्या वेळी राणीखेत लसीकरण हा उपक्रम चिपळूण, रत्नागिरी व गुहागर तालुक्यांत यशस्वीपणे राबवला.

              ग्रामीण स्तरावर १९६५ ते १९७२ या काळात केवळ पशुवैद्यकीय सेवा पुरवणे आणि शासकीय योजना कार्यान्वित करणे यात रमलेल्या डॉ. सडेकर यांची विदर्भात स्थापित डॉ.पं.दे.कृ.वि.त प्रतिनियुक्ती झाली आणि पशुवैद्यकीय अध्यापन, संशोधन आणि विस्तारशिक्षण हे विशाल क्षेत्र त्यांना उपलब्ध झाले. या तीनही क्षेत्रांत त्यांनी १९७२ ते १९९९ या २८ वर्षांच्या कालखंडात आपला वेगळा ठसा उमटवला. डॉ. सडेकरांनी ‘जनावरांसाठी पर्यायी औषध योजना’ हेच आपले संशोधनाचे व विस्तार शिक्षणाचे प्रमुख क्षेत्र आहे, अशी खूणगाठ बांधून पुढच्या काळात वाटचाल केली.

              पशुरोगचिकित्सा आणि औषधविज्ञान शास्त्राचे निम्न स्तरापासून ते पीएच.डी. स्तरापर्यंत अध्यापन करत असतानाच अभ्यासक्रमाची, परीक्षापद्धतींची पुनर्रचना कालानुरूप नवीन अभ्यासक्रमाची निर्मिती अशी शिक्षणविषयक कामेही डॉ. सडेकर यांनी सफलपणे पार पाडलेली आहेत. भारतीय पशुवैद्यकीय परिषदेची १९९४मध्ये स्थापना झाल्यावर अखिल भारतीय स्तरावर एकच अभ्यासक्रम परिषदेतर्फे मांडण्यात आला. राज्य स्तरावर या अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी व तद्नुषंगिक बदल घडवण्यासाठी स्थापन झालेल्या राज्यस्तरीय समितीत डॉ. सडेकरांचा समावेश होता. या कामातील वैयक्तिक योगदानाबद्दल त्यांना प्रशस्तिपत्र देऊन गौरवण्यात आले.

              कडुलिंब, तुळस, हळद, लसूण, शतावरी, अश्‍वगंधा, भुईआवळी, माका, कंबरमोडी, उंबर अशा उपयुक्त वनौषधींचा आयुर्वेदिक ग्रंथांतून शोध घेऊन या वनौषधी आयुर्वेदात वर्णिल्याप्रमाणे जनावरांच्या रोगावर खरोखरच उपयोगी पडतात का? याचा परिपूर्ण अभ्यास करून डॉ. सडेकर यांनी त्यासंबंधीचे संशोधन अहवाल जागतिक व राष्ट्रीय स्तरावरील संशोधन पत्रिकांतून प्रसिद्ध केले. प्रयोगशाळेतील संशोधन प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या दारात जोपर्यंत वापरले जात नाही तोवर ते अपूर्ण असते, या उक्तीवर दृढ विश्‍वास ठेवणाऱ्या डॉ. सडेकर यांनी विद्यापीठाच्या पशुधन प्रक्षेत्रावर प्रत्यक्ष रोगी जनावरांत वनौषधींची उपयुक्तता सिद्ध केली, राज्यस्तरीय कृषी विद्यापीठ संशोधक समितीसमोर ती सादर केली, नंतर त्यांनी ती शिफारशीच्या स्वरूपात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शासनाच्या पशु-संवर्धन विभागाकडे सुपूर्द केलेली आहेत.

              कोणतीही वनौषधी उपटून वा तोडून घरी आणा, वाळवा व चूर्ण करून आजारी जनावराला द्या. इतक्या सोप्या स्वरूपात वनौषधीचा वापर करण्याची पद्धत डॉ. सडेकरांनी पशुपालकांपर्यंत पोहोचवली. वनौषधी वाळवण्याव्यतिरिक्त तिच्यावर इतर कोणतेही संस्करण करणे गरजेचे नाही, ही त्यांची शिकवण महत्त्वाची होती. गाई-म्हशीतील सुप्त स्तनदाह, वासरांचे अपमृत्यू, सर्व जनावरांत आढळणाऱ्या यकृत व्याधी, रोग-प्रतिकारशक्तीच्या कमतरतेमुळे उद्भवणाऱ्या व्याधी, वासरे-शेळ्या-मेंढ्यांत आढळणारी खरूज, खांदेसूज, दुग्धोत्पादनातील कमतरता, सर्वसाधारण आरोग्यासाठी उपाययोजना, अपचन अशा अनेक रोगांवर उपयुक्त वनौषधी योजना डॉ. सडेकरांनी शोधून काढल्या आणि आता मोठ्या प्रमाणावर पशुवैद्यांकडून वा पशुपालकांकडून वापरल्या जातात. वनस्पतीजन्य औषधांसोबतच वनस्पतीजन्य विषबाधेवर डॉ. सडेकरांनी मोलाचे संशोधन केले आहे. उन्हाळी पावसानंतर शेतात साठवलेल्या कडब्यावर काळी बुरशी वाढते व असा बुरशीयुक्त कडबा जनावरांच्या खाण्यात आल्यास त्यांना पक्षाघातासारखा आजार होऊन ती मृत्युमुखी पडतात यावर संशोधन होणे गरजेचे आहे, असा अहवाल शासनाकडून कृषी विद्यापीठाकडे पाठवण्यात आला. डॉ.सडेकरांनी यावर तीन वर्षे संशोधन केले. काळ्या बुरशीमुळे कडब्यात निर्माण होणाऱ्या ऑक्झॅलिक अ‍ॅसिडमुळे होणारी विषबाधा झालेल्या जनावरांचा जीव केवळ चुन्याची निवळी पाजल्याने वाचवता येतो हेसुद्धा त्यांनी दाखवून दिले. राज्य शासनातर्फे ही शिफारस महाराष्ट्रातील पशुपालकांपर्यंत पोहोचली व वळीव पावसानंतर विदर्भ-मराठवाड्यात दिसून येणारे जनावरांतील विषबाधांचे प्रमाण लक्षणीयरीत्या घटले. डॉ. सडेकरांच्या या संशोधनामुळे त्यांना डॉ.पं.दे.कृ.वि.तर्फे डॉ. के.जी.जोशी उत्कृष्ट संशोधकाचा पुरस्कार देण्यात आला. गाजरगवत, घाणेरी, सायनाडयुक्त कडबा, गॉसिपालयुक्त सरकी, अ‍ॅर्पोटॉक्सीकोसीस वनस्पतीजन्य विषबाधांवर संशोधन करून सोप्या व सहजशक्य उपाययोजना प्रसृत केल्या. या संशोधनामुळे त्यांना भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संघटनेची फेलो ही सन्माननीय पदवी देण्यात आली आणि कृषी विद्यापीठाच्या पशुवैद्यकीय विद्याशाखेच्या संशोधन समितीचे समन्वयक हा सन्मान केला.

              पशुवैद्यकीय विषयासंबंधी माहिती व संशोधन अत्यंत सोप्या शब्दात व भाषेत श्रोत्या-वाचकांपर्यंत पोहोचवण्याची हातोटी असल्यामुळे डॉ.सडेकरांनी विस्तारशिक्षण कार्यक्रमातही मोलाचे योगदान दिलेले आहे. मराठी नियतकालिकांतून व वृत्तपत्रांतून त्यांचे असंख्य लेख प्रकाशित झाले असून सेवानिवृत्तीनंतर पशु-संवर्धन व पशुआरोग्य विषयावर समाजप्रबोधनाचे कार्य सुरूच ठेवले. भारतीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेले संशोधन व पशुआरोग्य/पशुसंगोपन क्षेत्रातील नव्या संकल्पना ते पशुपालकापर्यंत पोहोचवत असतात. उत्कृष्ट शिक्षक व उत्कृष्ट पशुवैद्यकीय शिक्षणवेत्ता ही अनुक्रमे विद्यापीठीय व राज्यस्तरीय पारितोषिके, आंतरराष्ट्रीय सर्वसमावेशक औषधोपचार परिषदेत उत्कृष्ट पशुवैद्यकीय संशोधक पारितोषिक, भारतीय पशुवैद्यकीय संघटनेचे संशोधन सुवर्णपदक, पशुवैद्यकीय औषधविज्ञान परिषदेत उत्कृष्ट संशोधन सादरीकरण पारितोषिक, पशुवैद्यकीय शिक्षण संशोधन आणि विस्तार शिक्षण कार्यक्रमातील योगदानासाठी अनेक प्रशस्तिपत्रके मिळवणारे डॉ.रामनाथ सडेकर वयाच्या सत्तरीतही पूर्वीच्याच उत्साहाने पशुपालन प्रशिक्षण शिबिरांत, पशुपालक मेळाव्यांत, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांसाठी आयोजित शिक्षण कार्यक्रमांत भाग घेतात.

              ‘मर्क शार्प ढोम’ या बहुराष्ट्रीय औषध निर्माण करणाऱ्या संस्थेच्या ‘ब्लू क्रॉसबुक फॉर व्हेटरनरी प्रोफेशन’ या नियतकालिकाच्या संपादकपदाची जबाबदारी डॉ. सडेकर यांच्यावर सोपवण्यात आली. त्यामुळे त्यांच्या पशुवैद्यकीय क्षेत्रातील अष्टपैलू कामगिरीवर जणू  शिक्कामोर्तबचं झाले.

- संपादित

सडेकर, रामनाथ धोंडो