Skip to main content
x

सडवेलकर बाबुराव नारायण

      विविध शैलीत प्रयोगशील चित्रनिर्मिती करणारे चित्रकार, एक विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, अभ्यासक, समीक्षक व प्रशासक अशा अनेक प्रकारे आयुष्यभर कार्यरत राहिलेले कलावंत म्हणून बाबूराव नारायण सडवेलकर प्रसिद्ध आहेत. महाराष्ट्रातील कलावंत व बॉम्बे स्कूलची कलापरंपरा याबद्दल त्यांना जिव्हाळा होता व या कलापरंपरेचे जतन व्हावे म्हणून त्यांना असलेली तळमळ व त्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे आहेत.

      त्यांचे मूळ गाव वेंगुर्ले होय. त्यांचा जन्म सावंतवाडी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव सरस्वती होते. सात मुली व तीन मुले असलेल्या या दाम्पत्याचे बाबूराव हे सर्वांत ज्येष्ठ चिरंजीव होत. त्यांचे १९४२ पर्यंतचे शालेय शिक्षण कोल्हापूरच्या न्यू हायस्कूलमध्ये झाले. रवींद्र मिस्त्री हे त्यांचे त्यावेळी वर्गमित्र होते व ही मैत्री पुढे आयुष्यभर कायम होती. त्यानंतर  कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमधून १९४७ मध्ये ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. त्यांच्यावर कोल्हापूरमधील कलात्मक वातावरणाचा संस्कार झाला व चित्रकलेबाबत त्यांना आकर्षण वाटू लागले. परंतु शालेय शिक्षणानंतर घरच्यांनी त्यांना विज्ञान शाखेत जाण्यास भाग पाडले; पण चित्रकलेची आवड असल्यामुळे ते अस्वस्थ होते. अशातच १९४८ मध्ये कोल्हापुरातील राजाराम आर्ट सोसायटीत मुंबईतील प्रसिद्ध चित्रकार एस.एल. हळदणकर यांचे प्रात्यक्षिक बघण्यास मिळाले व त्यांनी चित्रकलेचे शिक्षण घेण्याचा निश्‍चय केला. वडिलांचा याला विरोध होता. हे बघून त्यांच्या आईने स्वत:चा दागिना गहाण टाकून त्यांना मुंबईत शिक्षणासाठी पाठविले.

      सुरुवातीला त्यांनी हळदणकर्स फाइन आर्ट इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेऊन, सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या परीक्षा दिल्या. अर्थार्जनासाठी मिळेल ते काम करीत त्यांनी १९५० मध्ये जे.जे. मध्ये चौथ्या वर्षाला प्रवेश घेतला आणि अल्पावधीतच एक हुशार विद्यार्थी म्हणून नावलौकिक मिळवला. चित्रकलेसोबतच त्यांना शास्त्र या विषयाचीही गोडी असल्यामुळे त्यांनी चित्रकला माध्यमे व तंत्र यांचाही या काळात अभ्यास सुरू केला.

      त्या काळी जे.जे.तील कलाशिक्षणात वास्तववादी (अकॅडमिक), परंपरागत व भारतीयत्व जोपासणार्‍या व आधुनिक अशा सर्वच प्रकारच्या कलाप्रवाहांचे पुरस्कर्ते असणारे शिक्षक शिकवीत होते. प्रोग्रेसिव्ह आर्टिस्ट ग्रूपची स्थापना होऊन प्रयोगशील व बंडखोर कलेलाही मान्यता मिळू लागली होती.

      हळूहळू सडवेलकरांचा कल आधुनिक कलाप्रवाहाकडे झुकू लागला व त्याचे प्रत्यंतर त्यांची निसर्गचित्रे, व्यक्तिचित्रे व रचनाचित्रे यांमधून येऊ लागले. तजेलदार रंग, जोमदार हाताळणी, आविष्कारातील स्वातंत्र्य व विरूपीकरणाचा प्रयोगशील वापर ही त्या काळातील त्यांच्या कलानिर्मितीची वैशिष्ट्ये होती.

      त्यांनी १९५२ मध्ये जी.डी. आर्ट ही पदविका प्राप्त केली व १९५२-५३ मध्ये त्यांना जे.जे.त फेलोशिपचा बहुमान मिळाला. या काळात त्यांच्यावर चित्रकार पॉल क्ली व तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती यांचा प्रभाव होता. नवकलेतील पाश्‍चिमात्य जगातील विविध कलासंप्रदाय व कलाचळवळी समजावून घेऊन त्या प्रकारे चित्रनिर्मिती करून बघण्यात त्यांना रस वाटू लागला. याच वर्षी त्यांनी एक अमूर्त चित्रमालिकाही रंगविली.

      फेलोशिप संपल्यावर सडवेलकर व त्यांचे समकालीन चित्रकार गायतोंडे, मोहन सामंत, अंबादास, तय्यब मेहता असे अनेक तरुण चित्रकार धडपडत होते. मुंबईतील आर्टिस्ट सेंटरवर सगळे जमत व त्यांच्या चर्चा चालत. याच काळात त्यांना ग्रंथालयात जाऊन कलाविषयक व सौंदर्यशास्त्रविषयक ग्रंथांचे वाचन करण्याची आवड निर्माण झाली.

      त्यांची १९५३ च्या अखेरीस सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिक्षक म्हणून नेमणूक झाली व १९७१ मध्ये राजीनामा देईपर्यंत ते जे.जे.त शिक्षक म्हणून कार्यरत होते. आधुनिक पद्धतीने विचार करणार्‍या पळशीकर यांच्या सोबत सडवेलकरांनीही जे.जे.तील वातावरण बदलण्यास सुरुवात केली. सडवेलकर म्यूरल डेकोरेशनच्या वर्गावर शिकवू लागले. फ्रेस्को, टेंपरा, मोझाइक, टेराकोटा अशा भित्तिचित्र माध्यमांचा पद्धतशीर अभ्यास सुरू झाला.

      ते शिकवीत असलेल्या म्यूरल क्लासमधील विद्यार्थिनी विजू भिसे हिच्याशी १९५६ मध्ये त्यांचा विवाह झाला. याच वर्षी ते ‘बॉम्बे ग्रूप’मध्ये सहभागी झाले. के.एच. आरा, के.के. हेब्बर, एस.डी. चावडा, एच.ए. गाडे, व्ही.एस. गायतोंडे, डी.जी. कुलकर्णी, मोहन सामंत, हरकिशन लाल या सदस्य असलेल्या चित्रकारांसोबत त्यांनी बॉम्बे ग्रूपतर्फे १९६२ पर्यंत अनेक समूह प्रदर्शने भरविली. त्यानंतर १९६२ मध्ये बॉम्बे ग्रूप विसर्जित करण्यात आला.

      सुरुवातीच्या काळात त्यांनी समोर मॉडेल बसवून अनेक कलात्मक व दर्जेदार व्यक्तिचित्रे रंगविली. या व्यक्तिचित्रांतून समोर बसलेल्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वासोबतच रचना, रंगलेपन व कलामूल्यांचे विविध प्रयोग असत. त्यांच्या अशा व्यक्तिचित्रांना अनेक पारितोषिकेही मिळाली. १९५४ मधील ‘तारा’ व १९५५ मधील ‘देवी’ ही व्यक्तिचित्रे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या प्रदर्शनात तसेच १९५६ मधील पहिल्या राज्य कला प्रदर्शनात ‘बॉबी’ व्यक्तिचित्र ही बक्षीसपात्र ठरली. बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १९५८ मधील प्रदर्शनातील त्यांचे ‘दादाजी’ हे व्यक्तिचित्र सुवर्णपदक विजेते ठरले.

      सुरुवातीच्या काळातल्या त्यांच्या निसर्गचित्रणात मुंबईच्या निसर्गाचे म्हणजेच इमारती, चौक, झाडे, ट्राम, बस व गर्दी यांचे एक वेगळेच मिश्रण आढळते. जलरंगासोबत पांढर्‍या रंगाचा जोमदार वापर हे त्यांच्या या निसर्गचित्रांचे वैशिष्ट्य असून एस.एच. रझा व सुरुवातीच्या काळातील आलमेलकर यांच्या निसर्गचित्र शैलीचा त्यांच्यावर प्रभाव आढळतो. याच काळात विविध विषय व आशय व्यक्त करणार्‍या आधुनिक शैलीतील चित्रमालिका ते सातत्याने रंगवीत होते. त्यांतील ‘एस्केव्हेशन २००१ ए.डी.’ या चित्राला १९५६ मधील बॉम्बे आर्ट सोसायटीचे रौप्यपदक व ‘कॉस्मिक स्टेशन’ या चित्राला बॉम्बे आर्ट सोसायटीचे १९५९ मधील सुवर्णपदक मिळाले. त्यांचे चित्र १९६१ च्या राज्य कला प्रदर्शनात प्रथम पारितोषिक विजेते ठरल्यानंतर त्यांनी स्पर्धात्मक प्रदर्शनांतून निवृत्त होण्याचा निर्णय घेतला.

      मुंबईत १९५० च्या दरम्यान भुलाभाई देसाई यांच्या स्मरणार्थ सुरू झालेल्या भुलाभाई इन्स्टिट्यूटमध्ये त्यांना स्टूडिओ मिळाला होता. विविध कला क्षेत्रातील मंडळी त्या जागेत आपापले काम करीत असत. सडवेलकरांनी रंगविलेल्या ‘पोएटिक थीम्स’, ‘सायंटिफिक थीम्स’, ‘इमेज ऑफ दी सिटी’, ‘स्पेस एक्स्प्लोरेशन’, ‘ओडेसी ऑफ मॅन’ व ‘माउण्टन्स’ अशा चित्रमालिकांची अनेक प्रदर्शने झाली. सत्ताविसावे व्हेनिस बिनाले, (१९५४); एशियन आर्टिस्ट एक्झिबिशन, टोकियो, जपान, (१९५८); दुसरे बिनाले द पॅरिस, (१९६१); अशा अनेक आंतरराष्ट्रीय प्रदर्शनांत बाबूराव सडवेलकरांना आमंत्रित करण्यात आले होते. १९६५ व १९७१ मधील बिनाले द साओ पावलो (ब्राझिल), या प्रदर्शनांत त्यांचा सहभाग होता.

      याशिवाय सडवेलकरांनी अनेक संस्थांसाठी व्यावसायिक भित्तिचित्रेही (म्यूरल्स) तयार केली. १९५४ मध्ये ३० फूट × ७ फूट आकाराची ‘कुरुक्षेत्र’ व ‘मुघल बॅटल’ ही भित्तिचित्रे त्यांनी पुणे येथील नॅशनल डिफेन्स अकॅडमीत व मफतलाल यांच्यासाठी त्यांनी ‘रामायण’ या विषयावर भित्तिचित्रे तयार केली. १९९२ मध्ये कोल्हापूर येथील अ‍ॅक्सल इंडस्ट्रीसाठी त्यांनी ४० फूट × ७ फूट आकाराचे ‘इंडस्ट्री’ या विषयावरील सिरॅमिक टाइलवरील भित्तिचित्र रंगविले. ‘ओडेसी ऑफ मॅन’ या विषयावरील ४० फूट × १० फूट आकाराचे मोझाइक म्यूरल त्यांनी टेक्सास, अमेरिका येथील बेडफोर्ड स्कूलसाठी तयार केले.

      कोल्हापूरच्या कलापरंपरेचा सडवेलकरांवरील प्रभाव ते मुंबईत आल्यावर अल्पावधीत ओसरू लागला. पाश्‍चिमात्य व्यक्तिचित्रकारांच्या व्यक्तिचित्रांपेक्षा आता त्यांना दृक्प्रत्ययवादी चित्रकारांबद्दल आकर्षण वाटू लागले. त्या काळातील तरुण व आधुनिक दृष्टिकोन असणार्‍या प्रा. पळशीकरांसोबत होणाऱ्या चर्चांचा त्यांना उपयोग झाल्याचे ते सांगत. व्यक्तिचित्रण व निसर्गचित्रण हा त्यांचा ध्यासविषय बनला व ते झपाटल्यासारखे चित्र रंगवू लागले. ‘किंबहुना, अशी व्यक्तिचित्रं रंगविण्यातच माझा आनंद व दु:ख सामावलेले असे,’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे.

      ब्रशच्या फटकाऱ्यांचा पूर्वनियोजित वापर, रंगलेपनातून निर्माण होणारा त्रिमितीचा आभास, छाया-प्रकाशाचा खेळ व पोत, आणि गडद, फिकट व तजेलदार रंगछटांच्या रचनेतून निर्माण होणारी सळसळ हे त्यांच्या व्यक्तिचित्रणाचेच नव्हे, तर पुढील काळातील चित्रमालिकांचेही वैशिष्ट्य होते. किंबहुना, त्यांच्या अशा चित्रांत, रेखनातून तयार होणार्‍या आकारात रंग भरण्यापेक्षा ब्रशच्या पॅचमधून आकार निर्माण झालेला दिसतो. अशा प्रकारच्या त्यांच्या व्यक्तिचित्रांचे व तत्कालीन कलाजगतातील प्रभावी कलावंत व कलासमीक्षक त्रयी, लायडन, लँगहॅमर व श्‍लेशिंजर यांनी कौतुकही केले.

      सडवेलकरांसाठी अशी व्यक्तिचित्रे रंगविणे हा पराकोटीचा कलात्मक आनंद होता. परिणामी, व्यक्तिचित्रणात तडजोड करू नये अशी त्यांची भावना होत गेली व व्यावसायिक व्यक्तिचित्रणात आदर्शवाद व तडजोड नसावी या मताचे, तत्कालीन आधुनिक व तरुण चित्रकारांप्रमाणेच ते पुरस्कर्ते झाले. शिवाय त्या काळात बरेच ज्येष्ठ चित्रकार व्यावसायिक व्यक्तिचित्रांच्या क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे कमालीची स्पर्धा होती. भारतीय समाजात, पाश्‍चिमात्य समाजाप्रमाणे व्यावसायिक व्यक्तिचित्रण करताना कलावंताचे स्वातंत्र्य, कलामूल्ये व आदर्शवादाला किंमत नाही असा त्यांचा समज होता. तसे ते बोलून दाखवत व या पार्श्‍वभूमीवर त्यांनी व्यावसायिक व्यक्तिचित्रण क्षेत्राकडे पाठ फिरवली.

      सडवेलकरांनी १९५६ च्या दरम्यान विविध संकल्पना घेऊन रंगविलेल्या चित्रमालिकांमध्ये त्यांनी अलंकरण व विरूपीकरण यांचा संयोग असलेली काव्यात्मक चित्रमालिकेपासून ते अमूर्त आकाराच्या चित्रमालिकेपर्यंत, अनेक प्रयोग केले. यानंतर त्यांना त्या दरम्यान लागत असलेल्या शास्त्रीय शोधांबाबत रस निर्माण झाला व त्यांनी या विषयांवर चित्रे रंगविली. सडवेलकरांनी ‘इमेेज ऑफ द सिटी’ या विषयावरील   चित्रमालिका रंगविली व त्याची प्रदर्शनेही झाली. याच दरम्यान जगातील विविध देशांच्या अंतराळ मोहिमांचा परिणाम सडवेलकरांच्या ‘स्पेस एक्स्प्लोरेशन’सारख्या चित्रमालिकांतून दिसतो. यातूनच त्यांची ‘ओडिसी ऑफ मॅन’ ही चित्रमालिका निर्माण झाली. त्यांनी १९८६ च्या दरम्यान ‘माउण्टन्स’ ही चित्रमालिका रंगविली.

      सुरुवातीच्या काळातील चित्रमालिकांची चित्रे लहान आकारांची व जलरंगात ग्वॉश (अपारदर्शक) पद्धतीने रंगवली असली तरी नंतरच्या काळातील चित्रमालिका मात्र त्यांनी तैलरंगात रंगविल्या. तैलरंगात चित्र रंगवताना या माध्यमाचे शास्त्र समजून चित्र रंगवावे असा त्यांचा आग्रह असे. ते पारदर्शक रंग पातळ असल्यामुळे तसेच लावत व अपारदर्शक रंग जाड असल्यामुळे त्याचे जाड थर इम्पॅस्टो पद्धतीने देत. त्यांच्या अशा चित्रात उजळ व गडद रंगछटांमधून चित्रफलकावर स्पंदने व त्रिमितीचा आभास निर्माण होत असे. निसर्गातील डोंगर, ढग, ग्रह व वेगवेगळ्या वेळी, वेगवेगळ्या प्रकाशात भासणारी स्थित्यंतरे अशा विविध घटकांचा ते वापर करीत.

       सडवेलकरांनी विविध विषयांत, विविध शैलींत विपुल काम केले. चित्रनिर्मितीपूर्वी ते आवर्जून स्केचेस करीत व त्यातून चित्राचे स्वरूप ठरत जाई. परंतु आजच्या कलाजगताने सडवेलकरांच्या चित्रांची म्हणावी तशी दखल घेतल्याचे आढळत नाही. महाराष्ट्र राज्याचे कलासंचालक म्हणून नेमणूक झाल्यावर तर त्यांचा बराच वेळ प्रशासकीय कामात व त्यातून निर्माण झालेल्या असंतोषाशी सामना करण्यात गेला. परिणामी, या काळात ते कलानिर्मितीपासून दूर गेले. परंतु उत्तम जाण, आरेखन व रंगमाध्यमांवर प्रभुत्व आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा काहीसा पूर्वनियोजित आविष्कार त्यांच्या चित्रांतून दिसून येतो.

      सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये शिकवत असतानाच १९६२-६३ या वर्षी ते अमेरिकेतील ‘फुलब्राइट’ स्कॉलरशिपचे मानकरी ठरले व त्यांनी या काळात अमेरिकेतील कलाशिक्षणपद्धतीचा अभ्यास केला. अमेरिकेहून परतल्यानंतर त्यांनी या काळात समजावून घेतलेल्या नवीन शिक्षणपद्धतीचा वापर येथे करण्यास सुरुवात केली. परंतु जे.जे.तील वातावरणात ती फारशी लोकप्रिय होऊ शकली नाही. त्यांनी १९७१ मध्ये प्राध्यापक पदावर असताना राजीनामा दिला व ते व्यावसायिक चित्रकार म्हणून जगू लागले.

      ते १९५५ पासून सातत्याने मराठी व इंग्रजीत लेखन करीत होते. १९५६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टच्या ‘रूपभेद’ वार्षिकाची संकल्पना सडवेलकरांचीच होती व पहिल्या रूपभेदचे संपादनही त्यांनीच केले होते. ‘मौज’, ‘सत्यकथा’, ‘अभिरुची’, ‘नवभारत’ अशा नियतकालिकांतून, तसेच ‘महाराष्ट्र टाइम्स’, ‘लोकसत्ता’, ‘नवशक्ती’ आदी दैनिकांतून त्यांचे कला, कलावंत व कलासमीक्षाविषयक लेखन प्रसिद्ध होत होते. मराठी विश्‍वकोशाकरिता त्यांनी अनेक नोंदींचेे लेखन केले व १९७७ पासून संपादन व सल्लागार संपादक म्हणून ते कार्यरत राहिले. त्यांची आकाशवाणीवर अनेक व्याख्याने झाली व दूरदर्शनवरील अनेक चर्चांत त्यांचा सहभाग असे.

      त्यांची १९७५ मध्ये  महाराष्ट्र राज्याचे कलासंचालक म्हणून नेमणूक झाली व १९८६ पर्यंत त्यांनी कलासंचालक म्हणून काम केले. अमेरिकेत केलेल्या कलाशिक्षणविषयक पद्धतीचा उपयोग त्यांनी इथे केला. त्यांच्याशी समकालीन असणार्‍या व त्या काळातील अनेक शिक्षकांशी मतभेद होऊन त्यांची ही कारकीर्द वादग्रस्त ठरली. महाराष्ट्राच्या कलापरंपरेचे जतन व्हावे व कलाशिक्षण क्षेत्रात प्रगती व्हावी या दृष्टिकोनातून त्यांनी केलेल्या योजना व प्रयत्न अत्यंत महत्त्वाचे होते. परंतु काही घटना अशा घडल्या, की या योजना यशस्वी होऊ शकल्या नाहीत. असे असूनही या कल्पक व महत्त्वपूर्ण योजनांमुळे महाराष्ट्राच्या कलापरंपरेच्या जतन व संवर्धनाच्या कार्याला काही प्रमाणात चालना मिळाली.

      जे.जे. स्कूलच्या १८८५ ते १९७५ या नव्वद वर्षांच्या कालखंडातील विद्यार्थ्यांच्या व जे.जे.च्या संग्रहातील चित्र-शिल्पांचे जतन, संवर्धन व प्रदर्शन सुरू झाले. अशी चित्रे राज्य कला प्रदर्शनाच्या निमित्ताने गावोगावी प्रदर्शित झाली. ‘आर्ट अ‍ॅण्ड ट्रॅडिशन ऑफ महाराष्ट्र’ हे प्रदर्शन १९८१ मध्ये महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने दिल्लीत भरविले गेले व ते कमालीचे गाजले. वाई येथील भित्तिचित्रे, पिंगुळीची चित्रकथी परंपरा, पोथ्या आणि महाराष्ट्रातील चित्र-शिल्पकार अशा दिनदर्शिका करण्यास महाराष्ट्र शासनाला त्यांनी उद्युक्त केले. या निमित्ताने शोधनिबंध लेखन व संपादनाद्वारे या शासकीय दिनदर्शिकेला एक वेगळा दर्जा मिळाला. त्यांच्या या कार्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर मान्यता मिळाली. त्यांतील १९७७ च्या ‘आर्ट ऑफ पेंटिंग इन महाराष्ट्र’ या दिनदर्शिकेला सर्वोत्तम संकल्पना व डिझाइनचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला.

      याच काळात कलासंचालनालयातर्फे जुन्या व दिवंगत झालेल्या कलावंतांची चित्रे, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी राज्य कला प्रदर्शनात प्रदर्शित करण्याची प्रथा त्यांनी सुरू केली व त्यांतील काही चित्रे शासनासाठी विकत घेऊन त्यांनी कलासंचालनालयाचा चित्रसंग्रह समृद्ध केला. या संदर्भातील समाज व शासन यांची उदासीनता त्यांना व्यथित करत असे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन महाराष्ट्रातील चित्र-शिल्पादी दृक्कला, पारंपरिक कला व लोककला यांच्याविषयी जागरूकता निर्माण होण्यास त्यांच्या अशा प्रयत्नांमुळे चालना मिळाली. त्यापासून पुढील पिढीतील काही कलावंतांना अशा प्रकारचे कार्य करण्यासाठी प्रेरणाही मिळाली.

      सडवेलकर १९८६ मध्ये कलासंचालक पदावरून निवृत्त झाले. ‘बॉम्बे आर्ट सोसायटी’ला १९८९ मध्ये १०० वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने सडवेलकरांनी प्रयत्नपूर्वक एका शतकमहोत्सवी प्रदर्शनाचे आयोजन करून १०० वर्षांच्या काळातील कलाकृतींमधून या काळात दृश्यकला क्षेत्रात होत गेलेल्या स्थित्यंतराचे दर्शन घडविले. या निमित्ताने प्रसिद्ध झालेले ‘स्टोरी ऑफ हण्ड्रेड इयर्स’ हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण असे पुस्तक आहे.

      जहांगीर आर्ट गॅलरीचे विश्‍वस्त असताना त्यांनी १९९६ मध्ये एक निधिसंकलनस्वरूप प्रदर्शन भरवून ‘कन्टेम्पररी इंडियन पेन्टर्स १९९६, असोसिएटेड विथ जहांगीर आर्ट गॅलरी’ हे पुस्तक प्रसिद्ध केले. याच वर्षी त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या कला व कलाचळवळींविषयीच्या लेखांचे ‘वर्तमान चित्रसूत्र’ हे पुस्तक प्रसिद्ध झाले.

      कलावंताने इतर कलांचाही व्यासंग केला पाहिजे याविषयी ते आग्रही होते. आपल्याला पटलेली मते व विचार प्रयत्नपूर्वक प्रत्यक्षात आणण्याचा ते आग्रह धरीत व असे न करणार्‍यांबद्दल तुच्छतेची भावना व्यक्त करीत. त्यातून त्यांचे अनेकांशी मतभेद झाले.

      महाराष्ट्र राज्याचे कलासंचालकपद स्वीकारल्यामुळे व त्यांच्या चित्रनिर्मितीला हळूहळू मर्यादा पडत गेल्या. प्रशासकीय काम व काही सहकार्‍यांकडून होणारा कमालीचा विरोध यांच्याशी सामना करण्यातच बराचसा वेळ जाऊ लागला. पण अभ्यास, लेखन व दृश्यकलेचे जतन व संवर्धनासंदर्भातील त्यांचे कार्य कधीच थांबले नाही.

      त्यांची पत्नी विजू सडवेलकर यांच्या १९८९ मधील मृत्यूनंतर अखेरच्या काळात ते काहीसे एकाकी झाले. आपल्या पत्नीच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांनी ‘विजू सडवेलकर’ हा पुरस्कार सुरू केला. सर्व जबाबदार्‍या सांभाळून कलानिर्मिती करणाऱ्या स्त्री-चित्रकर्तीला सडवेलकर हा पुरस्कार देत असत.

      बॉम्बे स्कूलच्या कलावंतांबद्दल सडवेलकरांना वाटणाऱ्या आत्मीयतेचा आविष्कारही सतत व्यक्त होत राहिला. ‘विश्रब्ध शारदा खंड तीन’ या ह.वि. मोटे यांनी परिश्रमपूर्वक प्रकाशित केलेल्या कलावंतांच्या पत्रव्यवहारावरील पुस्तकासाठी शांतिनिकेतनमधील प्रा. दिनकर कौशिक यांनी प्रस्तावना लिहिली. ही प्रस्तावना काहीशी बंगाल स्कूलला झुकते माप देणारी आहे हे लक्षात आल्यावर संबंधितांनी नव्याने काही भाग जोडण्याचे ठरविले व ही जबाबदारी बाबूराव सडवेलकरांवर सोपवली. त्यांनी कुठल्याही प्रकारची कटुता न येता दिनकर कौशिक यांच्याशी पत्रव्यवहार करून ‘महाराष्ट्रातील कलाप्रवाह — बॉम्बे स्कूल’ हे टिपण व कलावंतांचा परिचय लिहून दिला व तो या पुस्तकात छापला गेला. यातून कलावंतांच्या आपआपसातील पत्रव्यवहाराच्या या पुस्तकाची उपयुक्तता वाढली. बॉम्बे स्कूलच्या कलाकृती एकत्रितरीत्या प्रदर्शित व्हाव्यात हे त्यांचे स्वप्न मात्र अपुरेच राहिले. याबद्दल त्यांनी वेळोवेळी लेख लिहून खंत व हळहळ व्यक्त केली होती.

      अशा निराश मन:स्थितीत असतानाही त्यांनी वेळोवेळी महाराष्ट्रातील कलावंतांवर लिहिलेल्या लेखांच्या पुस्तकाची अंतिम प्रत तयार केली होती. ‘विजू सडवेलकर’ पुरस्काराचा कार्यक्रम २४ नोव्हेंबर २००० या दिवशी ठरला होता. त्याच्या पूर्वतयारीत असतानाच २३ नोव्हेंबर २००० या दिवशी त्यांचे निधन झाले.

      त्यांनी मृत्यूपूर्वी जुळवाजुळव करून ठेवलेले ‘महाराष्ट्रातील कलावंत : आदरणीय व संस्मरणीय’ हे पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर २००५ मध्ये प्रकाशित झाले.

       त्यांची पत्नी विजू सडवेलकर या सिरॅमिक माध्यमात कलानिर्मिती करीत. त्यांनी सडवेलकरांच्या कलासंचालक पदाच्या कारकिर्दीतील प्रतिकूल परिस्थितीत त्यांना साथ देत या कलावंताचा संसार सांभाळून आपली कलानिर्मिती सुरू ठेवली होती व त्याची अनेक प्रदर्शनेही भरविली.

      प्रा. बाबूराव सडवेलकर यांचा धाकटा मुलगा शील हा चित्रकार असून तो बॉलपेन या माध्यमात चित्रनिर्मिती व प्रदर्शने करतो. शील सडवेलकर व त्याची पत्नी मिनू सडवेलकर यांच्या प्रयत्नातून ‘विबा ट्रस्ट’ — ‘विजू-बाबूराव ट्र्स्ट’ स्थापन झाला असून त्यामार्फत पुणे येथे लहान मुलांसाठी चित्रकलाविषयक उपक्रम राबविले जातात. शिवाय ‘विजूज क्रिएटिव्ह वर्कशॉप’च्या माध्यमातून चित्रकलेचे वर्गही चालविले जातात.

- सुहास बहुळकर

सडवेलकर बाबुराव नारायण