Skip to main content
x

सहस्रबुद्धे, वीणा हरी

          वीणा हरी सहस्रबुद्धे यांचा जन्म कानपूर येथे झाला. घरातूनच संगीताचा, ग्वाल्हेर गायकीचा वारसा वीणाताईंना मिळाला. वडील पं. शंकरराव बोडसांकडून आणि बंधू काशिनाथ बोडसांकडून त्यांना ग्वाल्हेर गायकीची परंपरा प्राप्त झाली. पं. वसंत ठकार, पं. बलवंतराय भट्ट, पं. गजाननबुवा जोशी यांच्याकडूनही त्यांना शिक्षण मिळाले. लग्नानंतर काही काळ परदेशात वास्तव्य असताना तसे संगीत मागे पडले, तरीही विशेष म्हणजे मायदेशात परत आल्यावर, संगीताचा पुन:प्रवेश आयुष्यात किंचित उशिरा होऊनही त्यांंनी अत्यंत मनस्वीपणे आणि गंभीरपणे गायकी वाढवून, संपन्न अशी कारकीर्द घडविली.

संगीत-अध्यापन, मैफली गायन, वाग्गेयकार (अनेक बंदिशींची निर्मिती), लेखन आणि ध्वनिमुद्रित संगीत या सर्व क्षेत्रांत त्यांचे कार्य विपुल आणि बहुमोल असे आहे.

त्यांनी संस्कृतमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले; परंतु संगीत क्षेत्राची व्यवसाय म्हणून निवड केली. संगीतात पदव्युत्तर शिक्षण घेऊन, त्यानंतर त्यांनी तराण्यावर संशोधन करून डॉक्टरेट मिळवली. त्यांनी अनेक उत्तम तराणे बांधले.

मैफलीच्या गायिका म्हणून भारतभर अनेक ठिकाणी त्यांनी मैफली गाजविल्या. तानसेन समारोह, सवाई गंधर्व अशा महोत्सवांतून तर त्यांचे गायन अनेकदा झाले; परंतु परदेशांतही त्यांनी अनेक मैफली केल्या, गाजविल्या. तळिलशी षि ींहश थिीश्रव या कोपनहेगनमधील संगीतोत्सवासाठी त्यांना खास निमंत्रण होते.

वीणा सहस्रबुद्धे यांनी कानपूरला, त्यांच्या वडिलांच्या शंकर संगीत विद्यालयात १९७६ ते १९८५ पर्यंत शिकविले. त्यांनी १९८५ ते १९९० दरम्यान ना.दा. ठाकरसी विद्यापीठात, पुणे येथे संगीत अध्यापनाचे काम केले. त्यातील शेवटची दोन वर्षे त्यांनी विभाग प्रमुख म्हणून काम केले. त्यांनी १९९४ मध्ये स्टॉकहोममध्ये झालेल्या कंठसंगीताच्या एका समारोहात चर्चासत्रे घेतली. पुण्यामध्ये १९९० ते १९९७ पर्यंत पेन्सिल्वेनिया विद्यापीठातील विद्यार्थ्यांसाठी संगीत रसास्वादया विषयावर कार्यशाळा घेतल्या. जून २००२ ते मे २००४  या काळात त्यांनी मुंबई आय.आय.टी.मध्ये निमंत्रित अध्यापक म्हणून काम केले. मुंबईच्या सेंट झेविअर्स कॉलेजमध्येही त्यांनी अनेक चर्चासत्रे घेतली. ब्रिटनमधील खुल्या विद्यापीठात चित्रफितीद्वारे शिक्षणांतर्गत अभ्यासक्रमासाठी त्यांनी एक सिद्धहस्त कलाकार म्हणून काम पाहिले. त्या २००९ मध्ये कानपूर आय.आय.टी.मध्ये कलाकारम्हणून कार्यरत होत्या.

 वीणा सहस्रबुद्धे यांनी संगीतावर दर्जेदार लेखनही केले आहे. उत्तराधिकारया त्यांच्या पुस्तकात, वडिलांचे (शंकरराव बोडस) आणि भावाचे (काशिनाथ बोडस) आणि स्वत:चे असे संगीतावरील लिखाण समाविष्ट आहे. तसेच २००५ मध्ये अबॅटन बुक कंपनीने त्यांचे वन थाउजंड माइंड्सहे पुस्तक प्रसिद्ध केले. नादनिनादहे त्यांच्या परिवारातील व त्यांच्या स्वत:च्या बंदिशींचे पुस्तक प्रकाशित झाले आहे.

त्यांचे गायन विपुल प्रमाणात ध्वनिमुद्रित झाले आहे. एच.एम.व्ही., रिदम हाउस, बी.एम.जी., सोनी, म्यूझिक टुडे अशा प्रख्यात कंपन्यांनी त्यांचे जवळजवळ ५० अल्बम्स प्रकाशित केले आहेत. त्यांत राग-संगीताचे ख्याल, तराणा, ऋतुसंगीत, भजन असे विविध प्रकार समाविष्ट आहेत. 

वीणा सहस्रबुद्धे यांनी सुरेल, घुमारेदार आवाज कमविला आहे आणि विशेष म्हणजे ही आवाजावरील पकड तीन तासांच्या मैफलीत शेवटपर्यंत राहते. भरपूर दमसासामुळे सर्व अलंकार समर्थतेने पेलण्याची आणि गळ्यातून निघण्याची सहजता या गायकीत आहे. ग्वाल्हेरचे बेहेलावेही या गायकीत मिळतात. अतिशय जोशपूर्ण मांडणी हे त्यांच्या गायकीचे मर्म आहे. विपुल गमक असलेली आलापीही यात आहे. त्या भरपूर गणिती लयकारी करतात, त्यातून त्यांचे तालावरचे प्रभुत्व दिसते. बंदिशींचा संदर्भ राग-बढतीत सतत जाणवतो. रागस्वरूपे अत्यंत सुस्पष्ट अशी असतात. त्यांची तान अत्यंत चपळ, व्यामिश्र आणि संपन्न आहे. ख्यालात हरकती, मुरक्या अत्यंत प्रमाणित असल्याने ही गायकी भारदस्त आणि परिपक्व बनली आहे. त्यांच्या गायकीतील अभिव्यक्ती वीररसपूर्ण, जोशपूर्ण अशी  आहे.

आणखी एक मोलाची गोष्ट म्हणजे अनेक अप्रचलित, श्रोत्यांच्या कानांवर न पडलेल्या अशा बंदिशींचा अभ्यास करून वीणा सहस्रबुद्धे त्या मैफलीत पेश करतात. त्यामुळे त्यांच्या गायकीत बंदिशींची विविधता आणि समृद्धी आहे. दरबारी कानडा, श्री, मल्हार असे पुरुषी समजले जाणारे रागही त्या समर्थतेने पेश करतात. ख्याल, भजन, ऋतुसंगीत असे सर्व गानप्रकार वीणा सहजतेने गातात.

देशविदेशांत मैफली गाजवणार्‍या वीणा सहस्रबुद्धे यांना अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहेत. भारतात व सध्या अमेरिकेतही त्यांनी अनेकांना संगीत शिकवले असून जयंती सहस्रबुद्धे, सावनी शेंडे, रंजनी रामचंद्रन इ. शिष्या त्यांचा वारसा चालवत आहेत.

डॉ. शुभदा कुळकर्णी

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].