शिंदे, शशांक चंद्रसेन
मुंबईवर झालेल्या २६ नोव्हेंबर २००८ च्या दहशतवादी हल्ल्यात छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे शहीद झालेले पोलीस निरीक्षक शशांक शिंदे हे त्या हल्ल्यात बळी पडलेले पहिले अधिकारी.
रत्नागिरीतील चिपळूणमधील रिक्तोली या मूळ गावी जन्मलेल्या शशांक चंद्रसेन शिंदेंचे शालेय शिक्षण गुहागरात आणि रत्नागिरीच्या ह्यूम हायस्कुलात झाले. पुढे मुंबईतील सिद्धार्थ महाविद्यालयातून बी.ए. पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी मुंबईतील न्यू लॉ कॉलेजातून एलएल.बी.देखील पूर्ण केले. परंतु पोलीस अधिकारी बनून समाजासाठी उपयोगाचे काही केले पाहिजे ह्या ध्यासातून त्यांनी पोलीस निरीक्षकपदाची परीक्षा उत्तीर्ण केली. १९८७ च्या बॅचमधून त्यांनी मुंबई पोलीस खात्यात प्रवेश केला.
२६ नोव्हेंबर२००८च्या त्या दुर्दैवी दिवसापर्यंत २४ पासून तीन दिवस एस.टीच्या रेल्वे पोलीस ठाण्यात अथक ड्यूटी शिंदेंनी निभावली होती. २६ नोव्हेंबर २००८ रोजी रात्री ८ वाजता ते तीन दिवसांची ड्यूटी संपवून घरी जायला निघाले आणि त्याच वेळी सी.एस.टी स्थानकाच्या मोठ्या कॉरिडॉरमध्ये इस्माईल आणि अजमल कसाब ह्या दहशतवाद्यांनी धुमाकूळ सुरू केला. खरे तर दहशतवाद्यांचा त्या वेळी प्रवाशांना ओलीस ठेवण्याचा इरादा होता. पण त्याच वेळी शिंदेंनी आपल्या रिव्हॉल्व्हरमधून कसाब आणि इस्माईलच्या दिशेने फायरिंग सुरू केली, आणि त्यामुळे प्रवांशावरील लक्ष विचलित होऊन त्यांनी शिंदेंच्या दिशेने गोळीबार केला आणि त्यातच शशांक शिंदे ह्यांचा अंत झाला.
एक कर्तव्यदक्ष, आपल्या पेशाशी इमान राखणारे, मनमिळाऊ सहकारी आणि कुटुंबवत्सल प्रापंचिक म्हणून शशांक शिंदे ह्यांची ओळख सदैव स्मरणात राहील. त्यांच्या असामान्य अशा शौर्याबद्दल त्यांना मरणोत्तर कीर्तीचक्र देऊन सन्मानित करण्यात आले.