Skip to main content
x

शिरगावकर रामचंद्र तुकाराम

     रामचंद्र तुकाराम शिरगावकर यांचा जन्म चिपळूण येथे झाला. बालपणीच आई-वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांच्या काकांनी त्यांचा सांभाळ केला. त्यांना लहानपणापासून मूर्तीकरण्याचा छंद होता. विशेषत: गणपतीच्या मूर्ती ते आवडीने करीत. शिरगावकर यांचे मूर्तिकाम बघून मूर्तिकार खातू यांनी त्यांच्यामधील कलागुण ओळखले व त्यांना मुंबईस जाण्याचा सल्ला दिला.

शिरगावकर १९३५ मध्ये चिपळूणहून केवळ दहा रुपये घेऊन मुंबईस पोहोचले. मुंबईत राहण्याची सोय नसल्याने ते सी.पी.टँक येथील फुटपाथवर, दुकानाच्या पायरीवर राहत असत. याच काळात त्यांनी गणपतीच्या लहान लहान मूर्ती करून, त्या टोपलीत ठेवून डोक्यावरून विकण्यास सुरुवात केली व स्वत:च्या उदरभरणाची सोय केली.

रामचंद्र शिरगावकर यांनी १९३७ मध्ये सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये चित्रकलेच्या पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला व १९४१ मध्ये ते ‘जी.डी. आर्ट’ ही पदविका उत्तीर्ण झाले. त्यांनी वार्षिक प्रदर्शनात सुवर्णपदक मिळवले होते. दुष्यंत हटकर, गिरगाव चौपाटीचे वाघ, बडोद्याचे कोल्हटकर हे त्यांचे त्या काळातील वर्गमित्र. नंतर त्यांच्या ‘कोकेवाला’ या शिल्पास बॉम्बे आर्ट सोसायटीचे सुवर्णपदक मिळाले. त्यांनी १९४१ नंतरच्या काळात सुमारे अठरा वर्षे अर्थार्जनासाठी चित्रपटसृष्टीमध्ये ‘सेट’ची कामे केली. त्यामधील ‘उडनखटोला’, ‘मुगल-ए-आझम’, ‘आन’, ‘अनारकली’, ‘मदर इंडिया’ या चित्रपटांची कामे उल्लेखनीय म्हणता येतील.

सिनेमा क्षेत्रात असल्यामुळे अल्पावधीत काम पूर्ण करण्याचे कौशल्य शिरगावकरांनी आत्मसात केले होते. सिनेदिग्दर्शक मेहबूब यांच्या चित्रपटाचे काम अडले असता त्यांनी वीस फुटी पुतळा अवघ्या चौदा तासात उभारून या दिग्दर्शकाकडून वाहवा मिळविली व हाच कामाचा झपाटा पुढील काळातही कायम ठेवला. परंतु त्यामुळे कामाच्या दर्जावरही त्याचा अपरिहार्यपणे परिणाम झाला. ‘भांडवलाचा अभाव व म्हणून संधीचा अभाव हे एकच कारण आमची कला जनतेपुढे मांडण्याआड येते,’ अशी खंत ते बोलून दाखवीत. त्या काळात सी.पी. टँकजवळ छोट्याशा स्टूडिओत ते आपली शिल्पसाधना करीत असत.

मीरत काँग्रेसच्या वेळी स्व. प्यारेलाल (म. गांधींचे पट्टशिष्य) यांचा पुतळा तयार करण्याचे काम शिरगावकर यांच्याकडे सोपविण्यात आले. पुतळ्याचे अनावरण करताना पंडित नेहरूंनी त्यांची स्तुती केली. पण त्यामुळे शिरगावकर इतके गांगरून गेले, की त्यांची ओळख करून द्यावयाच्या वेळी ते पुढे होण्यास कचरले.

शिरगावकर यांना १९५९ मध्ये पहिल्या स्मारक- शिल्पाचे काम मिळाले. झाशीच्या राणीचे सोळा फूट उंचीचे हे अश्‍वारूढ शिल्प नागपूर येथे उभारले आहे.

वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना त्यांनी १९६२ मध्ये शिरगावकरांना जोगेश्‍वरी येथे शिल्पकलेसाठी काम करण्यास जागा दिली. त्यांनी त्या ठिकाणी स्वत: स्टूडिओ उभारला. ‘शिरगावकर फाइन आर्ट स्टुडिओ’ या नावाने आज तो प्रसिद्ध आहे. स्वत:चा स्टुडिओ उभारल्यानंतर शिरगावकरांनी तेथे मातीकामासोबत ब्राँझ कास्टिंगचीही व्यवस्था केली व महाराष्ट्रात अनेक ठिकाणी स्मारकशिल्पे घडविली. सांगली व ठाण्याच्या मासुंदा तलावातील शिवाजी महाराजांचा अश्‍वारूढ पुतळा, पुणे व नागपूर येथील झाशीच्या राणीचे अश्‍वारूढ पुतळे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा पूर्णाकृती पुतळा ही त्यांची उल्लेखनीय कामे होत. त्यांनी केलेल्या शिवाजी महाराजांच्या बारा फुटी अश्‍वारूढ पुतळ्यांच्या प्रतिकृती ताराराणी विद्यापीठ, कोल्हापूर, देवळाली, नाशिक, नांदेड, पनवेल, राहुरी अशा अनेक ठिकाणी आहेत.

रामचंद्र शिरगावकरांना प्रत्यक्ष स्टुडीओत काम करतानाच मृत्यू आला. त्यांचे हे कार्य त्यांची मुले व नातवंडे पुढे चालवीत आहेत.

- अ. म. मराठे

शिरगावकर रामचंद्र तुकाराम