Skip to main content
x

शिवलकर, नवनाथ भीमसेन

शिवलकर, नाना

        वनाथ भीमसेन शिवलकर ऊर्फ नाना शिवलकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यात झाला. सर जे.जे. इन्स्टिट्यूट ऑफ अप्लाइड आर्टमधून त्यांनी उपयोजित कला (अप्लाइड आर्ट) पदविका १९७६ साली प्राप्त केली. ‘द टाइम्स ऑफ इंडिया’च्या कलाविभागात  त्यांनी ग्रफिक डिझाइनर म्हणून काम केले. त्यांचे ‘विज्ञान चित्रकार’ म्हणून नाव प्रचलित झाले ते मुख्यत: ‘सायन्स टुडे’ मासिकांवरील त्यांच्या कल्पक मुखपृष्ठांमुळे. त्यांनी जवळपास पंचवीस वर्षे हे काम केले.

‘टाइम्स ऑफ इंडिया’ वृत्तपत्रासाठी माहितीपूर्ण सचित्र तक्ते (ग्रफिक्स), प्रदर्शनांची मांडणी, जाहिरातसंस्थांची कामे, बॉम्बे नॅचरल हिस्टरी सोसायटीसाठी माहितीपूर्ण भित्तिपत्रके, नेहरू प्लॅनेटोरियमसाठी चित्रांचे संकल्पन अशी विज्ञान प्रसाराला पूरक असणारी अनेक कामे त्यांनी केली. विदेशात मस्कत, ओमान, तेहरान येथे त्यांनी भित्तिपत्रके (पोस्टर्स), संगणकाक्षरदर्शक फलक (डिजिटल डिस्प्ले बोर्ड) अशा माध्यमांमधून कामे केली.

नाना शिवलकर १६ फेब्रुवारी १९९८ रोजी झालेल्या खग्रस सूर्यग्रहणाचे निरीक्षण करण्यासाठी बंगलोरला (बंगळुरू) संशोधकांच्या शोधमोहिमेचे सदस्य म्हणून गेले होते. विविध उपकरणांच्या आधारे केलेल्या निरीक्षणांवर आधारित असे ‘डायमंड रिंग’ हे त्यांचे चित्र न्यूयॉर्कहून प्रसिद्ध होणार्‍या ‘अ‍ॅस्ट्रॉनॉमी’ या नियतकालिकात प्रकाशित झाले आणि ते विशेष गाजले.

शिवलकरांना १९७९, १९८० आणि १९८१ अशी सलग तीन वर्षे ‘कॅग’ (कमर्शिअल आर्टिस्ट्स गिल्ड) तर्फे ‘सायन्स टुडे’च्या मुखपृष्ठांसाठी पुरस्कार मिळाला. स्त्री-भ्रूणहत्या या विषयावरील जाहिरातमोहिमेच्या संकल्पनासाठी त्यांना १९८६ मध्ये ‘अशोक जैन’ पुरस्कार मिळाला. पुणे येथे २००० मध्ये ‘मराठी विज्ञान परिषद’ आणि ‘राष्ट्रीय विज्ञान प्रसार’ केंद्राद्वारे विज्ञानप्रसारकांची आंतरराष्ट्रीय परिषद भरवण्यात आली होती. तेथे नाना शिवलकरांना ‘विज्ञान चित्रकार’ म्हणून आमंत्रित केले होते.

सत्तर आणि ऐंशीच्या दशकात आपल्याकडे विज्ञान चित्रकलेची गरज निर्माण झाली. विज्ञानातल्या गुंतागुंतीच्या संकल्पना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी  दृश्यमाध्यमांचे साहाय्य घेणे गरजेचे होते. आधुनिक तंत्रज्ञानाचा विकासही या काळात होत होता. विज्ञानाचीच मदत घेऊन कळायला सोपी अशी एक दृश्यभाषा विकसित करण्याचे आव्हान शिवलकरांनी स्वीकारले आणि स्वत:ची खास शैली विकसित केली.

विज्ञान चित्रकाराला वैज्ञानिक संकल्पना, प्रक्रिया आधी समजून घ्याव्या लागतात आणि वैज्ञानिक आशय विपर्यस्त न करता त्या प्रतिमा प्रतीकांच्या भाषेतून  मांडाव्या लागतात. नाना शिवलकर अशी विज्ञानचित्रे काढणारे बहुधा पहिले चित्रकार होत.

विज्ञानाच्या विविध शाखांशी परिचय असण्याबरोबरच वाचकाला आकृष्ट करून घेण्याचे कथाचित्राचे मूलभूत उद्दिष्ट शिवलकरांनी नेहमीच जपले. त्यामुळे त्यांची शैली आकर्षक राहिली. संगणकाच्या आधाराने चित्रे तयार करण्याच्या नव्या शक्यता उपलब्ध झाल्या तरी शिवलकरांनी कट्आउट्स करून एअरब्रशच्या साहाय्याने विविध रंगछटा (कलर टोन्स) चित्रात भरण्याचे तंत्र पसंत केले. सूर्यग्रहणाच्या चित्रात त्यांनी जे चित्रघटक मांडले आहेत, त्यांच्या रंगसंगतीतून वातावरणातील बदलाचा जो ‘अनुभव’ व्यक्त होतो, तो कॅमेरा पकडू शकत नाही, म्हणून ते चित्र अनोखे ठरले.

‘सायन्स टुडे’च्या मुखपृष्ठांमध्ये त्यांनी कधी वर्णनात्मक (इलस्ट्रेटिव्ह), कधी प्रतीकात्मक (सिम्बॉलिक), तर कधी कथनात्मक (नॅरेटिव्ह) तंत्राचा वापर केला आहे. विज्ञानप्रसारक परिषदेच्या स्मरणिकेचे मुखपृष्ठ करताना वैज्ञानिक सत्याला धक्का न लावता समुद्रमंथनाच्या मिथकाचा त्यांनी कलात्मक उपयोग करून घेतला. कथनात्मक तंत्राचे हे उत्कृष्ट उदाहरण आहे. त्यांंचे वयाच्या बावन्नाव्या वर्षी निधन झाले.

           - दीपक घारे, रंजन जोशी

शिवलकर, नवनाथ भीमसेन