Skip to main content
x

समद, अब्दुल हमीद

         पशुवैद्यकीय शिक्षणाची सुरुवात भारतात एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात (१८८६) मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या स्थापनेने झाली. देशातील पशुवैद्यकीय शिक्षणाची गंगोत्री समजले जाणारे मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयाने शतकोत्तर रौप्य महोत्सव साजरा करत असतानाही पशुवैद्यकीय शिक्षणातील पारंपरिकता काही अपवादात्मक अभ्यासक्रमांचा समावेश वगळता तशीच टिकून राहिलेली आहे. विसाव्या शतकाच्या अखेरीस माहिती तंत्रज्ञान, जैवतंत्रज्ञान, सूक्ष्म तंत्रज्ञान आणि अणू चिकित्साविज्ञान यांसारख्या नवीन ज्ञानशाखांचा समावेश पशुवैद्यकीय अभ्यासक्रमात करावा आणि पशुवैद्यकीय सेवा केवळ मानवी आरोग्यसेवेला समांतरच नव्हे, तर त्यापुढेही न्यावी ही संकल्पना घेऊन पशुवैद्यकीय शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेले डॉ. अब्दुल समद देशातील एकमेव पशुविज्ञान अध्यापक आहेत. अब्दुल समद यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण मराठवाड्यातील औरंगाबाद येथे पार पडले. त्यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयातून पदवी (१९७४) आणि पशु-रोगचिकित्साशास्त्रात पदव्युत्तर पदवी (१९७६) प्राप्त केली. समद यांनी कॉमनवेल्थ ब्युरो, कॅनडा आणि भारत सरकार यांनी संयुक्तरीत्या प्रदान केलेल्या शिष्यवृत्तीवर ओन्टरिओ पशुवैद्यकीय महाविद्यालय (कॅनडा) येथून बायोमेडिकल सायन्सेस या विषयात पीएच.डी. (१९८६-९०) प्राप्त केली. हैदराबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन व्यवस्थापन प्रबोधिनीतून आधुनिक शिक्षण पद्धती; तसेच व्हॅक्सिन टेक्नॉलॉजी या विषयात पंजाब कृषी विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण प्राप्त केले.

         डॉ. समद यांनी १९७७ मध्ये साहाय्यक प्राध्यापक म्हणून मुंबई पशुवैद्यक महाविद्यालयाच्या पशु-रोगचिकित्सा विभागात प्रवेश केला आणि पुढील ३३ वर्षांच्या काळात सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक, विभागप्रमुख आणि प्राचार्य अशी पदे भूषवत पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि विस्तारशिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान केले. याचीच फलश्रुती म्हणून डॉ. समद यांची नागपूर येथील पशुविज्ञान विद्यापीठात पशुवैद्यकीय विद्याशाखेचे अधिष्ठाता आणि शिक्षण संचालक म्हणून नेमणूक करण्यात आली.

         अणू चिकित्साविज्ञान, जैवतंत्रज्ञान आणि अतिसूक्ष्म तंत्रज्ञान या विषयांचा माहिती तंत्रज्ञानाच्या मदतीने जर मानवी आरोग्याच्या समस्या सोडवण्यासाठी उपयोग होत असेल तर हीच सर्व तंत्रज्ञाने पशुवैद्यकीय सेवेतही तितक्याच प्रभावीपणे वापरता येऊ शकतात आणि त्याची सुरुवात पशुवैद्यकीय महाविद्यालयातूनच होणे आवश्यक आहे, या विचाराने डॉ.समद यांनी मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात अनेक उपक्रम सुरू केले. भाभा अणू संशोधन केंद्राच्या सहकार्याने देशातील पहिल्या पशुवैद्यकीय अणू उपचार केंद्राची स्थापना, पेनिसिल्व्हानिया विद्यापीठाच्या सहयोगाने जनावरांसाठी देशातील पहिल्या रक्तपेढीची आणि रक्तसंबंधी व्याधी निदान केंद्राची स्थापना, दुर्बिणीद्वारे रोगनिदान करणार्‍या प्रयोगशाळेची स्थापना, ब्रुसेल्लोसीस, लेप्टोस्पायरोसीस आणि इर्लिकोसीस रोगसंशोधनासाठी अत्याधुनिक जैवतंत्रज्ञान प्रयोगशाळांची उभारणी, २-डी इकोकार्डियोग्राफीसह इतर सुविधांयुक्त असे राज्यातील पहिले पशुवैद्यकीय हृदयरोग चिकित्सा केंद्र व पहिले रिजनल डायलेसीस केंद्र, पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी लॅब, अ‍ॅनिमल सोयी असलेल्या अत्याधुनिक प्रयोगशाळा, मांसोत्पादनांची गुणवत्ता आणि निर्यातक्षमता तपासणारी आणि मांस निर्यातदारांना वरदान ठरलेली प्रयोगशाळा, आधुनिक आणि पारंपरिक औषधयोजनांचा तुलनात्मक अभ्यास करणारे केंद्र, मुक्त गोठा पद्धतीसह मूरघास बनवण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान, शेतीतील टाकाऊ पदार्थापासून खाद्यनिर्मिती आणि भ्रूण प्रत्यारोपण अशा सुविधा असलेले आर्थिक नफ्यात चालवले जाणारे पशुसंगोपन केंद्र, असे अनेक प्रकल्प डॉ. समद यांनी कार्यान्वित केले.

         मुंबई पशुवैद्यकीय महाविद्यालयात चालवले जाणारे अणू उपचार तंत्रज्ञान पदविका यांसारखे उपक्रम देशातील इतर शैक्षणिक संस्थांनासुद्धा मार्गदर्शक ठरले.

         पेशीअंतर्गत वास्तव्य करणार्‍या जंतूंपासून होणारे सांसर्गिक गर्भपात, अन्य पेशींना हानी न पोहोचवता केवळ जंतूयुक्त पेशींवर हल्ला करणारी औषधयोजना नॅनो टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून साध्य करता येते हे जाणून डॉ.समद यांनी केवळ भारतातच नव्हे तर जगातही पहिली ठरावी अशा औषधयोजनेचे संशोधन केले आणि नॅनो टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने जनावरांसाठी वापरता येणाऱ्या औषधांचे जनक होण्याचा मान मिळवला. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पशुवैद्यकीय क्षेत्रासाठी निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सची निर्मिती हा डॉ.समद यांच्या कार्यकर्तृत्वाचा महत्त्वाचा पैलू होय.

         पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि विस्तार सेवा क्षेत्रांच्या माध्यमातून पशुपालकांची समृद्धी हे ध्येय बाळगून कार्यरत डॉ.समद यांना अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पारितोषिके आणि सन्मानांनी गौरवण्यात आले आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या आधारे भारतीय पशूंचे आरोग्य आणि उत्पादकता यात सुधारणा घडवून आणण्यासाठी काय करता येईल यासंबंधी जागतिक बँकेने प्रकल्प अहवाल आमंत्रित केले होते तेव्हा त्यांना २०००पेक्षाही अधिक अहवाल प्राप्त झाले होते. या सर्व अहवालांत डॉ. समद यांचा अहवाल प्रथम क्रमांकाचा ठरून ते वीस हजार अमेरिकन डॉलर्सच्या पारितोषिकास पात्र ठरले. पुढे यांपैकी ५० अहवाल जागतिक बँकेने कार्यान्वित केले आणि यातील पाच सर्वाधिक यशस्वी प्रकल्पांपैकी डॉ. समद यांचा एक प्रकल्प होता.

         जागतिक बँकेने पुढे या प्रकल्पावर २००८ साली अनुबोधपटही काढला. अशाच प्रकारच्या कार्यासाठी इ-इंडिया २०१० हे प्रतिष्ठेचे मानले जाणारे पारितोषिक डॉ.समद यांना प्रदान करण्यात आले. भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संघटनेचे डिस्टिंगविशड् व्हेटरनरिअन अ‍ॅवॉर्ड आणि ज्येष्ठ पशुवैद्य प्रतिष्ठान या संघटनेमार्फत दिला जाणारा डॉ.दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक/पशुवैज्ञानिक पुरस्कार डॉ. समद यांना २०१२मध्ये प्रदान करण्यात आला. पशुवैद्यकीय शिक्षण, संशोधन आणि विस्तार सेवाअंतर्गत डॉ. अब्दुल समद यांनी विकसित केलेल्या तंत्रज्ञानाच्या आधारे महाराष्ट्रातील पशुपालक, विशेषतः दुग्ध व्यावसायिक एकविसाव्या शतकाच्या पहिल्या दशकाअखेर प्रगतीच्या एका विशिष्ट टप्प्यावर येऊन पोहोचला हे निःसंशय !

         डॉ. रामनाथ सडेकर

समद, अब्दुल हमीद