Skip to main content
x

सोमण, दत्तात्रेय वामन

       घाडीचे रोगविज्ञान तज्ज्ञ. हाफकिन इन्स्टिट्यूट या जगविख्यात संशोधन संस्थेशी ते आपल्या वैज्ञानिक कारकिर्दीतील बहुतांश काळ निगडित होते. त्या संस्थेत डॉ.सोमण यांनी संशोधनकार्य केले. १९५५ ते १९५७ सालांदरम्यान डॉ.सोमण यांनी हाफकिनचे संचालकपद भूषविले. संस्थेत येण्यापूर्वी डॉ.सोमण हे ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय येथे विकृतिशास्त्र व जीवाणुशास्त्र या शाखेत कार्यरत होते. (डिपार्टमेन्ट ऑफ पॅथॉलॉजी अ‍ॅन्ड बॅक्टेरिऑलॉजी). तेथून ते हाफकिनमध्ये आले. दोन्ही ठिकाणी त्यांनी वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर प्राध्यापक म्हणून काम सांभाळले. १८९९ सालाआधी हाफकिन संस्था ही ग्रॅण्ट वैद्यकीय महाविद्यालय येथे होती. हा एक योगायोग की, डॉ. हाफकिन व डॉ. सोमण दोघेही आधी ग्रॅण्ट महाविद्यालय व नंतर हाफकिन संस्था, परळ येथे कार्यरत होते.

     डॉ. सोमण यांनी विकृतिशास्त्र, जीवाणुशास्त्र व विषाणुशास्त्र या वैद्यकीय विज्ञानाच्या तिन्ही शाखांत काम केले (पॅथॉलॉजी, बॅक्टेरिऑलॉजी आणि व्हायरॉलॉजी). यांतही त्यांचे कार्य प्रामुख्याने विषाणुशास्त्र या शाखेत होते. त्यांनी खालील विषयांवर संशोधन केले :

     १) श्वानदंश (रेबीज): श्वानदंशावरील रोगप्रतिबंधक लस पुढारलेल्या पश्चिमी देशांत व भारतातही प्रचलित होती. डॉ.सोमण यांनी भारतीय वातावरणात नायपेरिम्यून लसीची उपयुक्तता दाखवून दिली. त्यांनी श्वानदंशविरोधी प्रचलित लस व नायपेरिम्यून लस या दोन्हींचा एकत्रित वापर संशयित रोग्यावर करून त्यांचा जीव वाचविता येतो हे दाखवून दिले.

     २) इन्फ्ल्युएन्झा : १९५१ साली जागतिक आरोग्य संघटनेने हाफकिन संस्थेत इन्फ्ल्युएन्झा केंद्र स्थापन केले. त्या वेळी मुंबईत किंवा भारतात कुठेही इन्फ्ल्युएन्झाची साथ नव्हती. त्यामुळे इन्फ्ल्युएन्झाच्या केसेस मिळणे अवघडच होते. मिळेल त्या केसेसच्या साहाय्याने त्यांनी इन्फ्ल्युएन्झा रोगाचा अभ्यास करून काही निष्कर्ष काढले. इन्फ्ल्युएन्झा विषाणु अनेक प्रकारचे आहेत. त्यांतही इन्फ्ल्युएन्झा ए, बी, आणि सी हे जागतिक संशोधनातले प्रमुख. डॉ. सोमण यांनी भारतात प्रथमच इन्फ्ल्युएन्झा बी टाइप हा प्रयोगशाळेत वेगळा करून, वाढ करून त्याचे अस्तित्व सिद्ध केले.

     ३) क्यू फीवर : दुसर्‍या महायुद्धापूर्वी फक्त ऑस्ट्रेलिया खंडात या रोगाचा प्रादुर्भाव होता व तुरळक केसेस उत्तर अमेरिकेत सापडल्या होत्या. हा रोग गुरे, मेंढ्या, बकरी, कुत्रे यांत आढळतो. डॉ.सोमण यांनी या रोगावर काम करताना मानवी सिरोलॉजिकल चाचण्या केल्या व सिद्ध केले की हा रोग मुंबईत कधीकधी आढळतो. हा रोग मानवाला घातक होऊ शकतो. क्यू फीवर जनावरातील गोचिडांमार्फत ‘रिकेट्सिया कॉक्सिला बर्नेट’ यामुळे होतो, त्या काळी रिकेट्सिया हे विषाणुच्या जवळपास आहेत असा प्रचलित समज होता; पण नंतर हे सिद्ध करण्यात आले, की रिकेट्सिया म्हणजे अतिशय सूक्ष्म जीवाणुच आहेत.

     ४) स्क्रब टायफस : या रोगावरही डॉ. सोमणांचे संशोधन आहे. भारतीय वातावरणात, किंबहुना मुंबईत व उपनगरात या रोगाचे अस्तित्व त्यांनी दाखवले. रिकेट्सिया ओरिएंटालीस हा जनावरांत आढळणारा जीवाणु पोरकिड्यांच्यामार्फत माणसांत येऊ शकतो.

     ५) लेप्टोस्पायरोसिस : हा रोग माणसांत यकृत व रक्ताला घातक आहे. हा जीवाणु उंदरांमध्ये असतो. मुसळधार पावसात पाणी साचून पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली, की उंदीर बाहेर येतात. त्यांच्या मूत्राद्वारे हे जीवाणु पाण्यात सोडले जातात. मनुष्य या पाण्यातून चालला की जीवाणु त्याच्या शरीरात प्रवेश करतात. या रोगावरही डॉ.सोमण यांनी महत्त्वाचे संशोधन केले.

     ६) पटकी (कॉलरा) : १९४५ साली त्यांनी पटकीवर संशोधनकार्य करून या जीवाणुचे वेगवेगळे प्रकार (सबटाइप) यांचे पृथक्करण केले व प्रयोगशाळेत त्यांची वेगवेगळी वाढ केली. या जीवाणुच्या संदर्भात प्रचलित असलेल्या चाचण्यांतही सुधारणा केल्या. पटकीवर उपचार म्हणून प्रतिजैविके (अ‍ॅन्टिबायॉटिक्स) वापरून त्यांची उपयुक्तता दाखवली. १९५२ साली हे संशोधन ‘अ‍ॅन्टस ऑफ द न्यूयॉर्क अकॅडमी ऑफ सायन्सेस’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले.

     ७) विषमज्वर : (टायफॉइड किंवा एन्टेरिक फीवर) : डॉ.सोमण यांनी १९५३ साली विषमज्वराचा दहा वर्षांचा आढावा घेणारा लेख प्रसिद्ध केला. विषमज्वराच्या जीवाणूवर जगणारे विषाणू (व्हायरस) यांचाही त्यांनी अभ्यास केला.

     ८) आपल्या संशोधनकार्यात डॉ.सोमण यांनी अनेक प्रचलित रोगनिदान चाचण्यांचा वापर केला. त्यांनी त्यांतही संशोधन करून, कधी भर घालून सुधारणा केल्या. एकंदरीत, या चाचण्यांचा दर्जा उंचावला. फार खोलात न जाता, थोडक्यात यांची नामावली खालीलप्रमाणे :

     १) रूटिन विडाल टेस्ट व क्लॉट कल्चर टेस्ट : या दोघांचे एकत्रीकरण करून चाचणीचा दर्जा उंचावला. (विषमज्वरासाठी)

     २) व्हायरस आयसोलेशन टेस्ट करताना त्यांनी माइस (उंदीर), गिनिपिग ऑफ चिक एम्ब्रायो (कोंबडीचा गर्भ) यांचा वापर केला. घटसर्पाच्या जीवाणूची ‘विष निवारण चाचणी’ ही गिनिपिगमध्ये केली, तसेच विषाणू निवारण चाचणी करतानाही वरील प्राणी वापरले.

     ३) त्यांच्या इन्फ्ल्युएन्झाच्या संशोधनात डॉ.सोमण यांनी पूरक निर्धारण चाचणी व हिमॅग्लुटिन अवरोध चाचणी या दोन्ही चाचण्यांचा सढळ वापर केला.

     ४) विषाणूंवर संशोधन करताना त्यांनी उती संवर्धित लस चाचणीचा थोडाफार वापर केला. नुकत्याच झालेल्या एचवन-एनवन विषाणूचे उदाहरण पाहिले, तर विषाणूचा केव्हाही उद्रेक होऊ शकतो व मानवजातीपुढे ज्वलंत प्रश्‍न उभे राहू शकतात, हे स्पष्ट होते.  त्या दृष्टीने सोमण यांचे हे संशोधन फारच मोलाचे आहे.

डॉ. म. वि. ना. शिरोडकर

सोमण, दत्तात्रेय वामन