सरपोतदार, विश्वास नरहर
मूकपटापासून चित्रपटसृष्टीत वावरलेले लेखक-दिग्दर्शक नानासाहेब सरपोतदार यांचे चिरंजीव विश्वास नरहर सरपोतदार यांनी मराठी चित्रपट प्रतिकूल परिस्थितीत असतानाही आपल्या वडिलांचा चित्रपटाचा वारसा पुढे नेला. पुण्याच्या फर्गसन महाविद्यालयामधून बी.कॉम. झाल्यावर विश्वास उर्फ बाळासाहेब यांनी व्यवसायासाठी मराठी चित्रपट हेच क्षेत्र निवडले. प्रथम त्यांनी पुण्याच्या अलका टॉकीजमध्ये रविवारी सकाळी इंग्रजी चित्रपटांचे खेळ (मॉर्निंग शो) लावायला सुरुवात केली. नंतर पुण्यातील दैनिकांत चित्रपटाच्या जाहिराती देण्यासाठी स्वत:ची जाहिरात संस्था सुरू केली. त्याचबरोबर ‘अजय फिल्म डिस्ट्रिब्यूटर’ ही वितरण संस्था काढून मराठी चित्रपटांचे वितरण सुरू केले. त्यासाठी सारा महाराष्ट्र फिरून त्यांनी चित्रपटगृहांचा अभ्यास केला. वितरणात कौशल्य मिळविल्यावर त्यांनी चित्रपट निर्मिती सुरू केली. पण स्वत:च्या बॅनरऐवजी त्यांनी ‘अवघाची संसार’, ‘रंगपंचमी’ इ. चित्रपटात सूत्रधार राहून निर्मितीतले खाचखळगे समजावून घेतले. त्यांनी ‘पाहुणी’, ‘हीच खरी दौलत’, ‘कुलस्वामिनी अंबाबाई’ इ. चित्रपट निर्माण केले. नंतर त्यांनी मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. निधनापूर्वी त्यांनी आपल्या सर्व संस्था बंद केल्या.
- सुधीर नांदगांवकर