Skip to main content
x

शुक्ल, सदाशिव अनंत

     साहित्याच्या कथा, कादंबरी, काव्य, नाटक अशा विविध क्षेत्रांत सदाशिव अनंत शुक्ल सुमारे चाळीस वर्षे कार्यरत होते. ‘भरारी’ (१९३७), ‘कागदी बदाम’ (१९४२), ‘आठवा सर्ग आणि इतर लघुकथा’ (१९४६) आणि ‘असत्याचे प्रयोग’ (१९५९) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. ‘शेठ! एक सिंगल’सारखी एखादीच कथा चांगली, परिणामकारक उतरली आहे असा समीक्षक अ.ना. देशपांडे यांचा त्याबाबत अभिप्राय आहे. ‘कमलेची कहाणी’ या कादंबरीव्यतिरिक्त त्यांनी ‘तीन आणे माला’मधून लघुकादंबर्‍या लिहिल्या.

     शुक्ल यांची विशेष प्रसिद्धी कवी व गीतकार म्हणून आहे. श्री.ग.त्र्यं. माडखोलकरांच्या मते, ‘शुक्ल यांच्या ‘काळाचा खेळ’ या खंडकाव्याला सोडून बहुधा सर्वच कविता भावनात्मक आहे.... आनंदाच्या व उद्वेगाच्या फार सूक्ष्म नव्हेत, अशा भावनामात्र ते चांगल्या रितीने रेखाटतात... स्वतःचे आणि समाजाचे दुःख तीक्ष्ण शब्दांनी बोलून दाखविण्याची त्यांना फार हौस आहे... ‘काळाचा खेळ’ या खंडकाव्याची भाषा शुक्ल सफाईने व सहज लिहितात.’

     जुनी मराठी वृत्ते वापरण्याच्या फंदात ते पडले नाहीत. त्यांची ‘वंदे मातरम्’, ‘प्रेमाची फसवणूक’, ‘भवानी तलवार’, ‘बा कदंबा!’ वगैरे अनेक गीते प्रमुख नियतकालिकांतून प्रकाशित झाली. शुक्ल म्हणतात, ‘१९३४ पासून ध्वनिमुद्रणासाठी आणि पुढे चित्रपटांसाठीही मी गीते लिहू लागलो, आणि गेल्या वीस वर्षांत तीच माझ्या हातून शेकडो लिहिली गेली (१९५५).’

     ‘सौभाग्यलक्ष्मी’ या शुक्लांच्या पहिल्या स्वतंत्र, सामाजिक नाटकाविषयी प्रिं. गोविंद चिमणाजी भाटे लिहितात,‘ते विधवाविवाहाला जनमत अनुकूल करून घेण्याच्या बुद्धीने लिहिले आहे.’ याच विषयावर गडकरी यांनी लिहिलेल्या नाटकासही भाटे यांनीच प्रस्तावना लिहिली होती. त्यांनी ‘सिंहाचा छावा’ हे अभिमन्यूच्या वधासंबंधी नाटक; ‘स्वर्गावर स्वारी’, ‘साक्षात्कार’ (आम्ही एकशे पाच -१९३०), ‘सत्याग्रही’ ही पौराणिक व ‘साध्वी मीराबाई’ (ऐतिहासिक) अशी नाटके लिहिली. त्यांतली पदे अतिशय लोकप्रिय झाली.

     प्रचलित, राजकीय व सामाजिक विचारांचा धागा गुंफण्याची प्रवृत्ती शुक्लांच्या पौराणिक नाटकांत दिसते. दैवी चमत्कारांचा आश्रय घेतल्याने, ‘नाट्यरूप प्रयत्नातली परिणामकारकता कमी झालेली आहे’ असे श्री.अ.ना. देशपांडे यांनी म्हटले आहे. शालेय जगतातल्या त्यांच्या काही (‘जंगल्या भिल्ल’, ‘नवलनगरची राजकन्या’) नाटकांनी रमविले यात शंका नाही. जातिभेद नष्ट करण्याची जरुरी पटविण्यासाठी शुक्लांनी ‘झुणका भाकर’सारखी प्रचारकी स्वरूपाची नाटिका लिहिली.

     शुक्ल यांनी जॉन स्टाइनबेकच्या ‘द मून इज डाउन’ या कादंबरीचा ‘नवी राजवट’ हा अनुवाद केला होता. ख्यातनाम गायकांच्या ध्वनिमुद्रिकांनी शुक्लांच्या गाण्यांना घरोघर पोहोचवले होते; कारण तो भावगीतांच्या बहराचा काळ होता. ‘हर हर महादेव’ या तीन अंकी संगीत पौराणिक नाटकाच्या आत्तापर्यंत सात आवृत्त्या निघाल्या. याचा पहिला प्रयोग विजयानंद नाट्यगृह, पुणे येथे १९२८मध्ये झाला होता. या नाटकाच्या कथानकावरून ‘मिनर्व्हा मुव्हिटोन’ने सोहराब मोदी दिग्दर्शित भव्य हिंदी चित्रपट ‘नृसिंहावतार’ १९४७ साली प्रकाशित केला.

      ‘कुमुदबांधव’ या टोपणनावाने कविता लेखनास आरंभ करणार्‍या सदाशिव अनंत शुक्लांनी ‘प्रेम मरता काय उरले हाय संसारी आता’ असे उद्गार काढूनही, ‘देशभक्त मोक्षदाता मंत्र वंदे मातरम्। हिंदवीरा सत्त्वधीरा! बोल वंदे मातरम्॥’, असा अमोल व प्रेरक मंत्र जनतेला दिला.

- वि. ग. जोशी

शुक्ल, सदाशिव अनंत