तोरो, अनंत रामचंद्र
अनुवादक डॉ.अ.रा.तोरो यांचा जन्म मेनापूर (कर्नाटक) येथे झाला. सोलापूरच्या दयानंद महाविद्यालयामध्ये त्यांचे एम.ए.पर्यंतचे शिक्षण झाले. ‘मराठी प्रादेशिक कांदबरी’ या विषयावर त्यांनी १९७४ साली पीएच.डी. प्राप्त केली. प्रा.अनंत तोरो यांनी वारणानगर, आजरा, पुणे येथील विविध महाविद्यालयांतून मराठी विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली व ते प्राचार्य म्हणून निवृत्त झाले.
अनंत तोरो यांनी ‘कन्नड नवकथा’, ‘पु.ल. व्यक्ती आणि विचार’, ‘कन्नड शिकू या’, ‘महाराष्ट्र-कर्नाटक सांस्कृतिक अनुबंध’, ‘कन्नड साहित्य: काही निरीक्षणे’ इत्यादी पुस्तके लिहिली असून मराठी-कन्नड साहित्याचा सेतू बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. मराठी, कन्नड, कोकणी या भाषा एकमेकांना पूरक अशी साहित्य-निर्मिती करू शकतात. या भाषा-भगिनींचे संवर्धन करण्यासाठी अनंत तोरो यांनी सतत काम केले. त्यांच्या प्रयत्नांतून कोकणी, कन्नड आणि मराठी या तिन्ही भाषांचे ‘कोकम’ साहित्य संमेलन शिवराय कारंथ व गंगाधर गाडगीळ यांच्या उपस्थितीत ठाणे येथे झाले. या संमेलनाचे कार्याध्यक्षपद प्रा.अनंत तोरो यांनी भूषवले होते.
मराठी-कन्नड भाषांचा स्नेहबंध अधिक घट्ट व्हावा यासाठी मराठी साहित्याचे कन्नडमध्ये व कन्नड साहित्याचे मराठीमध्ये अनुवाद व्हावेत, नवे अनुवादक तयार व्हावेत यासाठी ‘मराठी-कन्नड स्नेहवर्धन केंद्र’ पुण्यात सुरू झाले. त्याचे ते अध्यक्ष होते. साहित्य अकादमीने आयोजित केलेल्या ‘अनुवादसाहित्य’ या चर्चासत्रात अनंत तोरो यांनी सहभाग घेतला. दिल्ली येथे झालेल्या कन्नड साहित्य संमेलनात कवी अनिल यांच्या कवितांचे कन्नडमध्ये अनुवादित केलेल्या कवितांचे वाचन अनंत तोरो यांनी केले.
प्रा.अनंत तोरो यांना महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ह्या संस्थेच्या वतीने डॉ.वि.कृ.गोकाक पुरस्कार (२०००) प्राप्त झाला. त्याचप्रमाणे डिसेंबर २००१मध्ये सोलापूर येथे झालेल्या चौथ्या समरसता साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले. या संमेलनाचा विषय ‘अनुवादित साहित्य आणि समरसता’ असा होता. प्रा.अनंत तोरो हे समरसता साहित्य परिषदेचे संस्थापक अध्यक्ष होते. त्यांच्या नेतृत्वाखाली संस्थेची वैचारिक व संघटनात्मक बांधणी झाली. २००४ साली ते समरसता साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदातून मुक्त झाले.
अनुवादाची गरज प्रतिपादन करताना प्रा.अनंत तोरो म्हणतात, “एक भाषा, एक संस्कृती हा पाश्चात्त्य विचार आहे. तर अनेक भाषा एक संस्कृती हा भारतीय विचार आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत भाषा भिन्न-भिन्न असतील, पण त्यांचा आत्मभाव एकच आहे. याचा प्रत्यय पुनः एकदा नव्याने या देशाला करून देण्याची आवश्यकता आहे. भाषेमुळे आपण एकमेकांजवळ येण्याऐवजी दूरदूर जात आहोत की काय, असे वाटू लागले आहे. त्यामुळे शेजारच्या भाषांतील साहित्याचे अनुवाद व्हावेत व नव्या तरुण पिढीला आपल्या भाषेबरोबर सारा भारत कळावा यासाठी अनुवादाची आवश्यकता आहे.”
प्रा.अनंत तोरो यांनी अध्यापन, अध्ययन आणि अनुवाद या क्षेत्रांत कार्य केले. तोरो यांच्या लेखनामुळे पु.ल.देशपांड्यांचा मराठी विनोद कन्नड भाषेत अनुवादित झाला.