त्रिवेदी, जयशंकर पितांबरदास
‘अहंभाव सोडून परोपकार करणारी जगात थोडी माणसे असतात. तुम्ही त्यांपैकी एक आहात’, असे उद्गार महात्मा गांधींनी ज्यांच्याबद्दल काढले, त्या जयशंकर पितांबरदास त्रिवेदी यांचा जन्म सौराष्ट्रातील भावनगर जिल्ह्यातील मोसण शिहोर या गावी झाला. जयशंकर यांचे वडील त्या वेळेस बडोद्यास होते, परंतु काका मूळशंकरभाईंनी अट्टहासाने त्यांना अमरेली येथे शिक्षणास नेले. ते अमरेली येथे उपजिल्हाधिकारी होते. प्राथमिक शिक्षण अमरेली येथे झाल्यावर त्यांच्या काकांची बदली झाली. तेव्हा त्यांनी जयशंकरची व्यवस्था एका मित्राकडे लावून दिली. जयशंकर १९०२ साली चांगल्या रीतीने मॅट्रिक उत्तीर्ण झाले. काठेवाडात त्यांचा शास्त्रामध्ये पहिला क्रमांक आणि चित्रकलेमध्ये दुसरा क्रमांक आला. जयशंकर यांचा विवाह १९०१मध्ये बडोदे येथील भगवानजी नागजीभाई त्रिवेदी यांची मुलगी हिरागौरी हिच्याबरोबर झाला. भगवानजी त्रिवेदी हे काठेवाडमधील पहिले एल.सी.ई. होते, तर गुजरात महाविद्यालयामधून उत्तीर्ण झालेले जयशंकर त्रिवेदी हे दुसरे एल.सी.ई. ठरले. त्यांची परदेशात जाऊन शिकण्याची खूप इच्छा होती, परंतु आर्थिक अडचणींमुळे त्यांना परदेशात जाता आले नाही. ते पुण्याच्या अभियांत्रिकी महाविद्यालयामधून १९०६मध्ये स्थापत्य अभियंता (सिव्हिल इंजिनिअर) झाले. नंतर जयशंकर त्रिवेदी यांनी वैकल्पिक विषय म्हणून सॅनिटरी इंजिनीअरिंगच्या विषयात परीक्षा दिली आणि त्यात ते दुसरे आले. काही काळ नाशिकजवळ नोकरी करून ते हडपसर येथे अॅफ्लुएंट अभियंता म्हणून नीरा कालव्यावर काम करू लागले. तेथे त्यांचा कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांबरोबर परिचय वाढला. त्यांची १९१९ साली कृषी महाविद्यालयात कृषी अभियांत्रिकी विभागात साहाय्यक प्राध्यापक म्हणून बदली झाली. कृषी अभियांत्रिकी विभागाची वाढ करत असताना त्यांनी इतर प्रकल्पातही लक्ष घातले. त्यांनी कृषी अभियांत्रिकी हा विभाग स्वतंत्र इमारतीमध्ये नेला. तिथे स्वतंत्र ड्रॉइंग हॉल आणि पदार्थविज्ञान प्रयोगशाळा होती. शिवाय प्राध्यापक व इतर कर्मचाऱ्यांसाठी स्वतंत्र इमारतीची सोय केली. त्यांच्या काळात कृषी अभियांत्रिकी विभागाची लक्षणीय वाढ झाली. ते कॉलेज रोव्हर चळवळीचे प्रणेते झाले आणि त्यांनी महाविद्यालयाची रोव्हर टीम तयार केली. पुण्यातील आंतरमहाविद्यालयीन क्रीडा स्पर्धा सुरू करणाऱ्यांपैकी प्रा. त्रिवेदी हे एक होते. ते दक्षिण विभागासाठी असिस्टंट प्रॉव्हिन्शिअल स्काऊट कमिशनर होते. त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये स्काऊट प्रवृत्ती जागृत करण्यात पुढाकार घेतला. त्यांच्या काळात बॉयस्काऊटची संख्या ३००० वरून १००००पर्यंत वाढली.
मुंबईला १९२७ साली हिंद बॉयस्काऊटची मोठी रॅली झाली होती. त्यात पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून ६० रोव्हर बालवीरांनी भाग घेतला होता. त्यामागची प्रेरणा प्रा. त्रिवेदी यांचीच होती. पुणे मुक्कामी महात्मा गांधी प्रा. त्रिवेदी यांच्याकडे राहत असत. ‘अतिथी देवो भव!’ अशी त्यांची वागणूक होती. महात्मा गांधींनी त्यांच्या याच गुणाचे गोडवे गायले होते. त्यांचा आणि महात्मा गांधींचा पत्रव्यवहार अतिशय हृद्य आहे. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची राहण्याची आणि जेवणाची सोय करायला ते कर्तव्यदक्ष असत. त्यासाठी त्यांनी विद्यार्थिनिवास बांधले. त्यांचा अनेक सार्वजनिक संस्थांशी संबंध होता. सार्वजनिक सभा, सर्व्हंटस् ऑफ इंडिया सोसायटी, रमाबाई रानडे यांची सेवासदन संस्था या सर्व सार्वजनिक कामांत ते सक्रिय सहभाग घेत असत. ते १९१० पासून १९४०पर्यंत कृषी अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक होते. नंतर त्यांची बदली आनंदला झाली. एक वर्षाने निवृत्त झाल्यानंतर असाध्य रोगावरील उपचारासाठी वर्धा येथे नेले असताना जयशंकर त्रिवेदी यांचा मृत्यू झाला.