Skip to main content
x

तर्खड, नलिनी आत्माराम

     भारतीय चित्रपट जेव्हा शैशवावस्थेत होता, तेव्हा स्त्रियांनी चित्रपटात भूमिका करणे निषिद्ध मानले जायचे. हिंदी उच्चशिक्षण घेतलेल्या पहिल्या अभिनेत्री होत्या मीनाक्षी रामराव आणि दुसऱ्या अभिनेत्री नलिनी तर्खड. नलिनी मराठा समाजातील होत्या. त्यांचे वडील डॉ. आत्माराम पांडुरंग तर्खड सामाजिक कार्यकर्ते होते आणि ब्रिटिश काळात मुंबईचे पहिले हिंदू शेरीफ होते. दिग्दर्शक मोहन भवनानींनी नलिनी तर्खड यांचे सौंदर्य पाहून ‘वसंतसेना’ (१९३१) या मूकपटात त्यांना भूमिका दिली. या मूकपटाच्या नायिका होत्या मीनाक्षी रामराव, तर नलिनी सहभूमिकेत होत्या. त्यानंतर दिग्दर्शक जे.के. चंदा यांच्या ‘पवित्र गंगा’ चित्रपटात नायिका म्हणून नलिनी चमकल्या. चित्रपटात काम केल्यामुळे वृत्तपत्रांनी त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली.

     नंतर नलिनी यांनी प्रभात फिल्म कंपनीत प्रवेश केला. शांतारामबापूंनी त्यांना ‘अमृतमंथन’ (१९३४) मध्ये भूमिका दिली. त्यानंतर केशवराव धायबर दिग्दर्शित ‘रजपूत रमणी’मध्ये त्यांनी नायिकेची भूमिका केली. केशवराव धायबरांशी त्यांची घनिष्ठ मैत्री जमली. कालांतराने दोघे विवाहबद्ध झाले. नलिनी यांनी विवाहानंतर चित्रपटसृष्टीला रामराम ठोकला. नलिनी यांची चित्रपटकारकिर्द छोटी होती. पण चांगल्या घरातील मुलींना चित्रपटात काम करणे निषिद्ध नाही, हा आदर्श नलिनी यांनी घालून दिला.

- श्रीराम ताम्रकर

तर्खड, नलिनी आत्माराम