Skip to main content
x

ठाकरे, रमेश भाऊराव

            मेश भाऊराव ठाकरे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील इसापूर येथील एका शेतकरी कुटुंबात झाला. त्यांचे वडील भाऊराव यांच्यावर गांधीजींच्या विचारांचा प्रभाव होता. म्हणून ते शेती व्यवसाय सोडून सेवाग्राम येथील गांधीजींच्या आश्रमात गेले. तेथील शाळेत मुख्याध्यापकाचे काम भाऊरावांकडे सोपवले गेले. त्यामुळे रमेश ठाकरे यांचे प्राथमिक शिक्षण इसापूरच्या हनुमान मंदिरात आणि सेवाग्राम येथील शाळेत झाले. त्यांनी माध्यमिक शिक्षणासाठी अकोल्याच्या राष्ट्रीय शाळेत प्रवेश घेतला. ते अमरावती येथील शिवाजी कृषी महाविद्यालयातून १९६७मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी पहिल्या श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांनी नवी दिल्ली येथील भा.कृ.अ.सं.तून आनुवंशशास्त्र व रोपपैदास या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले (१९६९).

            ठाकरे यांनी १९७४मध्ये अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातून आनुवंशशास्त्र या विषयात पीएच.डी. पदवी संपादन केली. ‘इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रॉपिकल अ‍ॅग्रिकल्चर’ या अमेरिकन संस्थेतर्फे नायजेरिया येथे त्यांची संशोधन कार्यासाठी विशेष नेमणूक करण्यात आली. याशिवाय जागतिक बँक प्रोजेक्ट्स (युगांडा), इंटरनॅशनल फंड फॉर अ‍ॅग्रिकल्चर डेव्हलपमेंट (रोम), ब्रिटन-युरोपीयन इकॉनॉमिक कमिशन कंपनी जी.एम.वी.एच. जर्मनी, अहमेदोबेलो आणि बॉयरो युनिव्हर्सिटी (नायजेरिया) आणि गोविंद वल्लभ पंत विद्यापीठ येथेही त्यांना संशोधनात्मक काम करण्याची संधी मिळाली.

            डॉ. ठाकरे यांनी १५०हून अधिक शोधनिबंध व लेख लिहिलेले आहेत. भारतातील आणि विदेशातील शेतीविषयक संस्था त्यांचा सल्ला घेतात. 

            जागतिक व्यापारी संघटनेत ठाकरे महाराष्ट्र शासनाचे प्रतिनिधी म्हणून गेले होते. त्यांना ‘मॅन ऑफ द इयर’चा (१९९८) पुरस्कार देण्यात आला. कृषिरत्न व डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार (२००२) मिळाला. त्यांना ‘मेडल ऑफ ऑनर’ ताम्रपत्र, भारत कृषक समाज कृषी ‘नवजीवन’ मॅग्नम अ‍ॅवॉर्ड (२०००) मिळाला आहे. परदेशातील संस्थांमध्ये विविध पदांवर काम केल्यानंतर ठाकरे नागपूरमध्ये स्थायिक झाले.

- समीर जगन्नाथ कोडोलीकर

ठाकरे, रमेश भाऊराव