ठोमरे ,त्र्यंबक बापूजी
त्र्यंबक बापूजी ठोमरे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील धरणगाव येथे झाला. वडील पोलीस खात्यात फौजदार असल्याने, त्यांच्या फिरतीच्या नोकरीमुळे बालकवींचे शिक्षण रखडले. तत्कालीन क्रांतिकारक व देशभक्तीपर वातावरणामुळे इंग्रजी शिक्षणाकडे दुर्लक्ष झाले. एरंडोल, यावल, जामनेर, बेटावर येथे त्यांचे शिक्षण जेमतेम इंग्रजी तिसरीपर्यंत झाले. त्यानंतर एक वर्ष ते धुळे येथे समर्थभक्त कै.शं.कृ. देव यांच्या प्रिपरेटरी इंग्रजी शाळेत शिकले. तेथे त्यांचा दासबोधाचा अभ्यास झाला.
मोठी बहीण जीजी यांचा त्यांच्यावर मोठा प्रभाव होता. त्यांनी लहानपणापासून पोथ्या-पुराणे, महाभारत, मोरोपंत वगैरेंचे वाचन केले. वयाच्या पंधराव्या वर्षी राष्ट्रीय कीर्तनकार रा.कृ.वैद्य ऊर्फ ‘वनवासी’ यांच्याबरोबर त्यांनी उत्तरभारतात प्रवास केला. कीर्तनासाठी गीतांचे लेखन केले. बडोदे येथेही त्यांनी शिक्षणासाठी काही काळ वास्तव्य केले. तेथे त्यांना सुप्रसिद्ध गुजराती कवी ‘कलापी’ यांच्या काव्याचा परिचय झाला. वयाच्या तेराव्या वर्षी त्यांनी पहिली कविता लिहिली. तिचे नामकरण पुढे त्यांच्या कवितांचे पहिले संपादक प्रा.भा.ल.पाटणकर यांनी ‘वनमुकुंद’ असे केले.
१९०७ साली जळगाव येथे भरलेल्या पहिल्या कविसंमेलनात त्यांनी धीटपणे कविता सादर करून तत्कालीन कवींचे व रसिकांचे लक्ष वेधून घेतले. संमेलनाध्यक्ष कर्नल कीर्तिकर यांनी त्यांचा ‘बालकवी’ म्हणून गौरव केला व तेव्हापासून ‘बालकवी’ हे नाव रूढ झाले. तेथेच रेव्हरण्ड नारायण वामन टिळक यांच्याशी ओळख झाली. व त्यांच्या घरच्या नगर येथील वास्तव्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला नवे पैलू पडले व त्यांची कविता बहरली. लक्ष्मीबाई टिळकांच्या ‘स्मृतिचित्रे’मध्ये बालकवींचे हृद्य चित्र आहे. ‘ठोमरे हा कवीपेक्षा ‘बाल’ अधिक होता’, असे त्यांनी म्हटले, आहे.
वडिलांच्या मृत्यूनंतर तत्कालीन प्रथेप्रमाणे एका वर्षाच्या आतच पार्वतीबाईंशी त्यांचा विवाह झाला. पण दोघांचे सूर शेवटपर्यंत जुळले नाहीत. त्यानंतर नगर येथील मिशन स्कूलमध्ये त्यांचा इंग्रजी पाचवीत प्रवेश झाला. पुण्यातल्या वास्तव्यात सुप्रसिद्ध कवी व नाटककार राम गणेश गडकरी यांच्याशी त्यांचा परिचय व घनिष्ठ मैत्री झाली. पुढे पुण्यात मिशन स्कूलमध्ये, तसेच महाबळेश्वर येथे शिक्षक म्हणून त्यांनी मिशनच्या शाळेत नोकरी व मडमांना मराठी शिकवण्याचे काम काही काळ केले. वडील भाऊ क्रांतिकारकांच्या चळवळीशी संबंधित होते. त्यांच्या आग्रहामुळे नोकरी सोडून खेड्यात वास्तव्य करण्याचा प्रयोग फसल्यावर ते नगरच्या शाळेत नोकरीसाठी परत आले.
जळगाव येथील सुप्रसिद्ध वकील सोनाळकर यांच्याशी बालकवींची मैत्री झाली. त्यांच्यामुळेच आयुष्यातील ‘रमाई’ हे एक गूढ प्रकरण ठरले.! ५मे रोजी ‘आई (रमाई) आली, भेटायला या’, अशी सोनाळकरांची तार मिळाल्यावर आणि घरी पत्नी व भाऊ यांच्याशी काही खटका उडालेला असतानाच, रमाईला भेटण्यासाठी ते घाईघाईने जळगावला निघाले. भादली स्टेशनजवळ विमनस्क स्थितीत रेल्वेचे रूळ ओलांडत असताना त्यांना इंजिनाची धडक बसून त्यांचा मृत्यू झाला. तो अपघात होता की, आत्महत्या, याचे रहस्य अजूनही गूढ आहे. रमाईचेही गूढ तसेच!
आधुनिक मराठी कवितेचे कुलगुरू केशवसुत यांचा प्रभाव ज्यांच्यावर पडला, त्यांत रेव्हरण्ड टिळक, गोविंदाग्रज, विनायक व बालकवी हे प्रमुख होत. मात्र, केशवसुत परंपरेचा परिणाम बालकवींवर अल्प प्रमाणात झाला.! तो ‘धर्मवीर’सारख्या ‘तुतारी’च्या क्षीण पडसादापुरताच जाणवतो. निसर्गकविता हेच बालकवींचे सामर्थ्य! केशवसुतांची सामाजिक दृष्टी, रे.टिळकांची आध्यात्मिकता, गोविंदाग्रजांची प्रणयप्राधान्यता यांहून बालकवींची सुरुवातीची निसर्गकविता सौंदर्याने व निसर्गातील दिव्यत्वाच्या साक्षात्काराने रसरसलेली, तर उत्तरायुष्यातील कविता निराशेने, परिस्थितीचे चटके बसून काळवंडलेली आहे. ‘काव्यदेवता अंतरली मज गरिबाला आज’ असे खिन्न उद्गारही ती काढते.‘कविबाळे ती खेळत होती,’ तेव्हा कोठूनतरी तीव्र विषारी वारा आला आणि ती स्वप्नसृष्टी जळाली व मग एक ‘अंधारयात्रा’ सुरू झाली.‘काय बोचते हृदयाच्या अंतर्हृदयाला’ हे कळेनासे झाले. याचे तीव्र पडसाद ‘खेड्यातील रात्र’सारख्या कवितेत व ‘औदुंबर’ या गाजलेल्या कवितेत आहेत.
पहिल्या खंडातील निसर्गकविता अनेक अंगांनी फुलली, बहरली. १९१० सालानंतरचे बालकवींचे नगर, पुणे येथील वास्तव्य, रेव्हरण्ड टिळक पति-पत्नी, तात्यासाहेब केळकर, श्री.कृ.कोल्हटकर, गडकरी यांचा सहवास; यांमुळे त्यांनी ‘अरुण’, ‘बालविहग’, ‘आनंदी आनंद गडे’, ‘फुलराणी’, ‘निर्झर’, ‘श्रावणमास’ अशी मराठीतील अजरामर गीते त्यांनी लिहिली. आजही मराठी निसर्गकविता ग्रेस, महानोर यांसारख्या कवींनी समृद्ध केली असली, तरी बालकवींच्या वरील गीतांचे महत्त्व अबाधित आहे. “मराठीतील खर्या अर्थाने नवकवी एकच व तो म्हणजे बालकवी” असे बा.सी.मर्ढेकरांनी म्हटले व त्यामुळे पुन्हा एकदा बालकवींच्या कवितेने रसिकांचे लक्ष वेधून घेतले. खुद्द मर्ढेकरांनाही बालकवींप्रमाणेच दोन मर्ढेकर दिसतात, हाही एक योगायोग. मात्र, मर्ढेकरांची कविता पुढे वेगळ्या वाटेने गेली. बालकवींचे तसे झाले नाही. त्यांचे कविताविश्व मर्यादितच राहिले. ‘आनंदी आनंद गडे’ म्हणत निसर्गात रंगून गेलेले व ‘खेड्यातील रात्र’सारख्या कवितांत निसर्गाची भयाण रूपे रंगवणारे बालकवींचे व्यक्तिमत्त्व दुहेरी व दुभंगलेले वाटते.
केशवसुतांप्रमाणे त्यांचा पिंड वैचारिक नव्हता. १९१४ साला पर्यंतचा काळ निसर्गात रंगून जाऊन एकरूप होण्याचा, तर पुढचा १९१६ साला नंतरचा काळ भयाण आर्थिक परिस्थितीचा काढा गळ्याखाली उतरल्यानंतर आलेली निराशा, औदासीन्य व विमनस्कतेचा आहे. त्यांच्या कवितेतील निसर्गचित्रणाबद्दलही समीक्षकांचे मतभेद आहेत. त्यांच्या निसर्गाच्या स्थलकालाविषयी काहींनी शंका व्यक्त केलेली आहे.
श्री.म.माटे, रा.शं.वाळिंबे इत्यादींनी त्यांच्या निसर्गाला प्रादेशिकतेचे रंग नसल्याचा आक्षेप घेतलेला आहे. “त्यांचा निसर्ग वास्तव सृष्टीपेक्षा कल्पनांचे रंगरूप घेऊन आलेला दिसतो. त्यांच्या कवितेत निसर्गावर मानवी भावनांचा आरोप करणारी चेतनोक्ती नाही. त्यांचा निसर्ग स्वतःच बालरूप घेतो. निसर्गाची आकृती तीच ठेवून त्याचा आकार बदलवणारा आहे. तो प्रतिनिसर्ग आहे, जपानी ‘बॉनसाय’ केलेला आहे”, असे प्रा.द.भि.कुळकर्णी यांनी म्हटले आहे. मात्र, कुळकर्ण्यांनी बालकवींच्या निसर्गाची बॉनसायशी केलेली तुलना पटण्यासारखी नाही. कारण, निसर्गाची कापाकापी व मोडतोड करून व त्याला खुरटवून टाकण्याची क्रूरता बॉनसायमध्ये आहे. “बालकवींचा निसर्ग बालरूप असला, तरी तो चैतन्याने रसरसलेला व जिवंत आहे. तो त्यांच्या ताणलेल्या ‘इमॅजिनेशन’मधून निर्माण झालेला आहे”, असे प्रा.कृ.ब.निकुम्ब यांनी म्हटलेले आहे.
त्यांचे साम्य अंगणात दाणे टिपणार्या चिमण्या पाहून आपणही चिमणी आहो असे वाटणार्या कीट्स या कवीशी आहे. त्यांची निसर्गसृष्टी ही मनःकल्पित मायानगरी आहे. तिथे दुःख व हीन भावना ह्यांना स्थान नाही. ते त्यांच्या निसर्गसृष्टीशी पूर्णतः एकरूप झालेले वाटतात. बहुचर्चित ‘औदुंबर’ या कवितेतील पाण्यात पाय टाकून स्थितप्रज्ञ बसलेल्या औदुंबराप्रमाणे त्यांची कविप्रकृती आहे.
त्यांच्या अन्य प्रकारच्या कवितेची फारशी समीक्षा झालेली नाही, याचे कारण त्यांच्या निसर्गकवितेची रसिक मनावर पडलेली जबरदस्त मोहिनी हेच आहे. मात्र, डॉ. माधवराव पटवर्धन यांनी म्हटल्याप्रमाणे त्यांची उदासीनतेची गाणीही जिव्हाळ्याची व हृदयाच्या अंतर्हृदयातून आलेली असल्याने काळजाला भिडतात. त्यात एक प्रकारचे वृत्तिगांभीर्य जाणवते.
मराठी कवितेत बालकवींचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. “केशवसुतांचे मन सृष्टीच्या गोचर सौंदर्यापेक्षा तत्त्वाचा शोध घेण्यात रंगलेले, तर बालकवींचे सौंदर्यपिपासू मन क्षणोक्षणी नित्यनूतन रूप धारण करणार्या सृष्टीच्या गोचर सौंदर्यात रंगलेले होते; परंतु, शिवाय त्यातील चैतन्यतत्त्वाचाही एकसारखा शोध घेत होते,” असे वा.ल.कुलकर्णी यांनी म्हटले आहे, तर गंगाधर गाडगीळ यांनी म्हटले आहे की, “ज्यांना खरोखरच कलात्मक मूल्य नाही, पण ज्यांच्यामुळे मनाला भुरळ पडते, मन वेडावून जाते, असे काही गुण बालकवींमध्ये आढळतात.”
पण बालकवी हे सुंदरतेच्या सुमनावरचे दव चुंबून घेणारे व त्यात पलायनवाद शोधणारे केवळ स्वप्नाळू कवी नव्हेत. ‘आनंदी आनंद गडे’ म्हणून नाचणारे बालकवी जितके खरे, तितकेच ‘पारव्या’त खिन्न, निरस एकांतगीत गाणारे बालकवीही खरे वाटतात.