Skip to main content
x

ऊर्ध्वरेषे, प्रभाकर वामन

प्रभाकर ऊर्ध्वरेषे यांचा जन्म इंदूर येथे झाला. १९३३ साली मॅट्रिक झाल्यावर त्यांनी विज्ञान शाखेकडे जायचे ठरविले. त्याप्रमाणे इंदूरच्या होळकर महाविद्यालयातून ते इंटर सायन्स झाले. पण विज्ञान विषयात गोडी वाटेना. लहानपणापासून त्यांना वाचनाची आवड होती. इंग्रजी विषय घेऊन ते बी. ए. झाले.

धर्म व राजकारण या विषयांचा त्यांचा  अभ्यास होताच.  नोकरीच्या शोधात ते ब्रह्मदेशात गेले. त्याच वेळी १९३९मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले आणि ते संकटात सापडले. चारशे मैलांचा पायी प्रवास करून भारतात परत आले. १९४१ साली इंग्रजी घेऊन एम. ए. झाले. वडील मराठीचे शिक्षक तर ते नागपूर विद्यापीठात इंग्रजीचे रीडर. इंग्लिश ट्रेनिंग टिचिंग- भाषाशास्त्र शिकवीत. मराठी भाषेवर चांगले प्रभुत्व होते. ‘प्रतिभा’ आणि ‘किर्लोस्कर’ यांमधून लेखनास त्यांनी  सुरुवात झाली. १९४२ मध्ये ‘किर्लोस्कर’मधून ‘आम्ही हिंदू आहोत का?’ हा पहिला लेख लिहिला. ‘प्राध्यापकांनो, शिक्षक व्हा’ हा लेख त्या काळी गाजला होता.

इंदूर-माळवा भागात त्या वेळी कम्युनिस्टांचा जोर होता. त्या काळात साम्यवादाचा सुशिक्षितांवर पगडा असायचा. त्यामुळे ऐन उमेदीत कार्यकर्ते म्हणून कम्युनिस्ट पार्टीत शिरले. पत्नी उषाताई व ते स्वतः असे दोघेही सात वर्षे कम्युनिस्ट पक्षाचे काम करीत होते. ‘हरवलेले दिवस’ या आत्मचरित्रात ब्रह्मदेशातून परतीच्या प्रवासाचे वर्णन आहे.

तसेच मुंबई येथे कम्युनमध्ये राहताना तेथे आलेले अनुभव, कम्युनिस्टांची कार्यप्रणाली, त्यांची मुखपत्रे, त्यातील लेखनप्रक्रिया, स्वतःचा झालेला कोंडमारा, मानसिक त्रास, स्वतःचा भ्रमनिरास इत्यादी गोष्टींचे इत्थंभूत वर्णन व प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टींचे सविस्तर चित्रण केलेले आहे. मराठीतील एक वाचनीय असे ते आत्मचरित्र आहे. कोणी दुखावले, जातील या भीतीमुळे आत्मचरित्रामध्ये खर्‍या घटना लिहिणे, ही फार कठीण गोष्ट असते. अतिशय नितळ व पारदर्शी व्यक्तिमत्त्वाने ते लिहिल्याचे जाणवते. ‘समृद्धीच्या मार्गावरः टाटा उद्योग समूहाची यशोगाथा’ ह्या आर. एन. लालांच्या पुस्तकाचा अनुवाद ऊर्ध्वरेषेंनी केलेला आहे.

अनेकविध चिनी व रशियन पुस्तकांचे त्यांनी अनुवाद केले. माओ, स्टालिन, पुश्कीन, गॉर्की यांच्या ग्रंथांचे तसेच रशियन आणि युक्रेनियन लोककथांचे अनुवाद त्यांनी केले. सुस्वभावी, विद्यार्थीप्रिय, उत्साही आणि इंग्रजीचे निष्णात प्राध्यापक म्हणून प्रभाकर ऊर्ध्वरेषे ओळखले जात. एक मार्क्सवादी विचारवंत, चांगल्यापैकी समीक्षक, पत्रकार, रशियन साहित्याचे अनुवादक अशीही त्यांची ओळख होती.

- डॉ. उषा कोटबागी

 

ऊर्ध्वरेषे, प्रभाकर वामन