Skip to main content
x

वाडेगावकर, वामन नारायण

     वामनराव वाडेगावकर यांचा जन्म नागपूर येथे झाला. वयाच्या १० व्या वर्षापर्यंत वामनराव वाडेगावकरांना दिसत होते. वयाच्या १० ते १३ वर्षांच्या कालावधीत त्यांची दृष्टी हळू हळू कमी कमी होत गेली. वयाच्या १३ व्या वर्षी त्यांना पूर्णपर्णे अंधत्व आले. ग्लुकोमा या आजारपणामुळे त्यांची दृष्टी गेली होती. कारण त्या काळात ग्लुकोमावर फारसे प्रभावी वैद्यकीय इलाज नव्हते. वामनरावांचे वडील नारायण दाजीबा वाडेगावकर हे त्याकाळी जिल्हा व सत्र न्यायाधीश होते. त्यांनी वामनरावांना दृष्टिलाभ व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. परंतु त्यात त्यांना यश आले नाही. वामनरावांची आई या प्रसिद्ध धोंगे घराण्यातील होत्या.

      १९१३ मध्ये वामनरावांनी ब्रेल लिपीचे शिक्षण घेतले. त्यानंतर औपचारिक शिक्षण सुरू झाले. अंध विद्यार्थ्यांमध्ये बोर्डामध्ये मॅट्रिकची परीक्षा देणारे वामनराव हे पहिलेच विद्यार्थी होते. त्यांची परीक्षा घेण्यासाठी स्वतंत्र शिक्षक नेमले गेले.

     पुढील शिक्षणासाठी वामनरावांनी मॉरिस महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. बी.ए.एलएल.बी. होऊन वकिली  करण्याची त्यांची इच्छा होती. एवढेच नव्हे तर पहिला अंध वकील म्हणून प्रथित यश संपादन करण्याची त्यांची महत्वाकांक्षा होती. परंतु बी. ए. च्या परीक्षेत लेखनिक घेण्याची त्यांना अनुमती मिळाली नाही.

     जीवनात आलेल्या अनुभवांनी वामनराव कधीच खचले नाहीत. आपल्या या आगतिक परिस्थितीमुळे १९२८ मध्ये त्यांच्यातील सुप्त कर्तृत्वशक्तीने एकदम उचल घेतली. श्री गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी नागपूर वर्धा मार्गावर एका इमारतीत ‘ब्लाईंड रिलीफ असोसिएशन’ या संस्थेचा श्रीगणेशा केला. येथे त्यांनी अंध विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाला सुरुवात केली. सुुरवातीला संस्थेत ६ विद्यार्थी होते. अशा प्रकारे त्यांचे निवासी अंध विद्यालय सुरू झाले. विद्यार्थी मिळविण्यासाठी त्यांनी गावोगाव दौरा केला. ‘अंध मुलांना जीवानिशी मारू नका. त्यांना माझ्या स्वाधीन करा. त्यांना मी माझ्या अंध विद्यालयात नेतो. त्यांच्या राहण्या खाण्यापासून तर शिक्षणापर्यंतची सर्व व्यवस्था करतो.’ अशी आश्‍वासने ते सतत देत असत. अंध मुलांना एकत्रित करून त्यांना आधार देण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले आणि अंध विद्यालयाची संकल्पना पूर्णत्वाला नेली.

     अनेक देशात अंधांसाठी राजाश्रयाने चालणारी मोठमोठी अंध विद्यालये आहेत. परंतु अंधत्वाचे दुःख अनुभवणाऱ्या एका तळमळीच्या कार्यकर्त्याने खिशात दिडकी नसतांना सुद्धा समदुःखी मुलांच्या कल्याणासाठी काढलेले अंध विद्यालय हे बहुधा जगातील एकमेव उदाहण असावे.

     अंध विद्यार्थ्यांसाठी  वाडेगावकरांनी १ ते ७ या वर्गाचा अभ्यासक्रम तयार केला. त्यासाठी त्यांनी लाकडी चौकटीचा उपयोग केला. त्या लाकडी चौकटीत सहा छिद्रे तयार केली. त्या माध्यमातून अंध विद्यार्थ्यांना आकड्यांची ओळख होईल याची व्यवस्था केली. अक्षर ओळख होण्यासाठी दोन लोखंडी चौकटी तयार केल्या त्या चौकटी एकमेकात समाविष्ट होतील याची त्यात व्यवस्था केली. त्यात अनेक छिद्रे करून खिळ्यांच्या माध्यमातून आणि चौकटीत सेंचूरी बोर्ड ठेऊन त्याद्वारे त्यांनी अंध मुलांना अक्षर ओळख करून देण्याची व्यवस्था केली. या पद्धतीमुळे पहिली ते सातवी या वर्गातील अंध विद्यार्थ्यांना लिहिता- वाचता येऊ लागले. त्याचबरोबर त्यांनी अंध विद्यार्थ्यांना चरितार्थासाठी ‘व्यावसायिक प्रशिक्षण’ दिले. त्यात प्रामुख्याने खुर्च्यांचे केनिंग करणे, खडू तयार करणे इत्यादींचा समावेश होता. अशा प्रकारे अंध मुलांना आपल्या पायावर उभे राहण्याचा आणि सन्मानाने जीवन जगण्याचा मार्ग त्यांनी खुला करून दिला.

     १९३६ मध्ये त्यावेळचे आयुक्त स्टेन्ट साहेब यांनी स्वेच्छेने या अंध विद्यालयाला भेट दिली. स्वयंपाकघर, न्हाणीघर, भांडी घासण्याची मोरी, इंधनाची जागा, शौचकूप, अंगण हे सर्वच स्वच्छ, चकाचक असले पाहिजे हा वाडेगावकरांचा आग्रह डोळसांनी निश्‍चितच शिकण्यासारखा आहे. शौचकूपातील टमरेलाची जागासुद्धा त्यांनी निश्‍चित केली होती. त्याचे मुख्य कारण म्हणजे अंध मुलाला ते तत्परतेने सापडले पाहिजे. प्रत्येक वस्तू ठराविक जागेवर राहील यासाठी ते आग्रही असत.

     वामनराव हे अतिशय शिस्तप्रिय होते. वामनरावांचा व्यवस्थितपणा असा होता की दोन खिडक्यांच्या बरोबर मध्यभागी खुर्ची असली पाहिजे असा त्यांचा आग्रह होता.

     वामनरावांनी स्टेन्ट साहेबांना शाळा दाखविली, ब्रेल पुस्तकाचे वाचन, खिळ्यांच्या पाटीवरचे गणित, सुईत दोरा ओवणे, गंजीफ्याची पाने स्पर्शाने ओळखणे, सांगाल त्या क्रमांकाचे गीतेचे आणि मनाचे श्‍लोक सुरात गाऊन दाखविणे इत्यादी अंध विद्यार्थ्यांची वैशिष्ट्ये आणि संस्थेचे एकूण कार्य पाहून स्टेन्ट साहेब आश्‍चर्यचकीत झाले. त्यांच्याच पुढाकाराने त्याच वर्षी त्यांना “रावसाहेब” हा बहुमानाचा किताब सरकारतर्फे मिळाला. त्यांचा गौरव करण्यात आला. स्वतःच्या विधायक कर्तृत्वाने हा मानाचा किताब मिळविणारे वामनराव हेच पहिले भारतीय अंध कार्यकर्ते होते.

    अंध विद्यालय ही अंधांच्या कल्याणासाठी स्थापन झालेली एक मात्र संस्था असली तरी त्यासाठी विद्यार्थी मिळविण्यासाठी सुरुवातीला कित्येक वर्षे वामनरावांना खूप प्रचार करावा लागला. या शाळेत भरती होणाऱ्या अंध मुलांना बाटवून ख्रिश्‍चन केले जाते असा गैरसमज त्याकाळी अडाणी समाजात पसरला होता. वामनरावांनी ठिकठिकाणी व्याख्याने देऊन आपल्या कार्याचे स्वरूप पटवून देण्यासाठी अपरिमित परिश्रम घेतले.

     १९३६ ते १९३८ या काळात ८-१० विद्यार्थ्यांना घेऊन विदर्भातील अनेक गावी वामनरावांनी प्रचाराचा दौरा केला. नागपूरातही नेहमी कोठे ना कोठे अंध विद्यालयाचा मेळा जात असे. त्या प्रसंगी वामनरावांचे कळकळीचे आणि भारदस्त वक्तृत्व ऐकून श्रोते मंत्रमुग्ध होत असत. या प्रचार दौऱ्यात संस्थेविषयी समाजात पसरलेला गैरसमज वामनरावांनी आपल्या कार्याने, प्रभावाने आणि व्यक्तिमत्वाने दूर केला.

     नियतीने वामनरावांना जरी अंध केले असले तरी त्यांची बुद्धिमत्ता, व्यवहारचातुर्य, समजता, स्मरणशक्ती अत्यंत विलक्षण होती. संस्थेच्या सर्व कागदपत्रांची त्यांना खडान्खडा माहिती असे. संस्थेचा पत्र व्यवहार, गरजा, प्रगती या सर्व बाबींची माहिती आणि आकडेवारी त्यांना मुखोद्गत असे. त्यांच्याशी बोलायला आलेल्या व्यक्तीचे निश्‍चित वय कोणते हे सुद्धा ते नुसत्या त्याच्या आवाजावरून सांगत असत.

     एखाद्या नवीन खोलीत प्रवेश करताच त्या खोलीचे आकारमान ते बिनचूक पणे सांगत असत. परिचित लोक जेव्हा त्यांच्या घरी जाऊन स्वतःची ओळख न देता नुसती त्यांच्याशी हातमिळवणी करीत असत तेव्हा त्यांचा केवळ स्पर्श होताच वामनराव त्या व्यक्तिला न चुकता ओळखीत असत. आपला एखादा अवयव जरी कार्यरत नसला तरी ध्येय पूर्ततेसाठी त्यावर जिद्दीने मात करता येते याचा आदर्श वामनरावांनी समाजासमोर ठेवला आहे.

     सार्वजनिक कार्यासाठी वामनरावांनी लोकसंग्रह केला होता. नागपूरातले डॉक्टर, वकील, देशभक्त हे वामनरावांच्या निकट मित्र परिवारात होते. प. पू. सरसंघचालक श्री. गुरूजी, आचार्य दादासाहेब धर्माधिकारी असे अनेक मान्यवर वामनरावांचे परममित्र होते. अंध विद्यालयाच्या प्रारंभी त्यांना या दोघांचे विशेष सहकार्य लाभले.

      १९३७ मध्ये क्रांतीकारक ‘सेनापती बापट’ यांनी अंध विद्यालयास भेट दिली. अंध विद्यालयाचे कार्य पाहून सेनापती बापट अतिशय प्रसन्न झाले. त्यांनी वामनरावांच्या कार्याची मुक्तकंठाने स्तुती केली. “वाडेगावकर साहेब, आम्ही जन्मभर केली ती नुसती दांडगाई. तुम्ही करीत आहात तेच खरे कार्य होय”.

     वामनरावांनी अंध विद्यालयाचे कार्य अत्यंत निःस्पृहतेने केले. ते अंध विद्यालयाचे मुख्याध्यापक होते परंतु त्यांनी स्वतःचे मानधन मात्र घेतले नाही. शेवटी सर्व विश्‍वस्तांनी आग्रह केला तेव्हा ते दोन रुपये हे नाममात्र मानधन घ्यावयाचे आणि लगेचच ते अंध विद्यालयाच्या दान पेटीत टाकायचे. ही त्यांची प्रवृत्ती आणि कार्यावरील त्यांची निष्ठा स्पष्ट करते. सामाजिक कार्य करण्याचा एक परमोच्च आदर्श वामनरावांनी समाजासमोर ठेवला.

- मा. त्र्यं. पात्रीकर

वाडेगावकर, वामन नारायण