Skip to main content
x

वैद्य, सुहास लक्ष्मण

सुहास लक्ष्मण वैद्य यांचा जन्म औरंगाबाद येथे एका सुशिक्षित व सुसंस्कृत शिक्षक कुटुंबात झाला. त्यांचे शालेय शिक्षण औरंगाबाद येथे सरस्वती भुवन शाळेत झाले. त्यांनी १९७७मध्ये शासकीय तंत्रनिकेतनमधून विद्युत पदविकेचा अभ्यास पूर्ण केला. त्याचप्रमाणे शेती अभ्यासक्रमही पूर्ण केला. दहावी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी रोपवाटिका व्यवसाय सुरू केला. सुरुवातीला घरून पाचशे रुपयांचे भांडवल म्हणून मिळाले. फुलझाडे, फळझाडे व शोभेची झाडे विकण्याची त्यांची योजना होती. तेव्हा औरंगाबाद शहर लहान होते. घराभोवती बागबगिचा करणे वा घरात झाडे लावून घर सुशोभित करणे या संकल्पनांचा प्रसार झालेला नव्हता. त्यामुळे लोकांच्यात वृक्षप्रेम वाढवणे हे काम त्यांना प्रथम करावे लागले. सुहास वैद्य यांनी सायकलवरून घरोघरी फिरून प्रचार केला व रोपांची विक्री केली. औरंगाबादमध्ये नव्याने उद्योगधंदे सुरू झाल्यावर मध्यमवर्ग व नवश्रीमंतवर्ग वाढीला लागला. यामुळे वृक्षवल्ली प्रेमही वाढू लागले व रोपांना मागणी येऊ लागली. वैद्य पुण्याहून विविध प्रकारची फुलझाडे व शोभेची झाडे आणून त्यांची विक्री करत. पुढे झाडांना कलम करणे व बियांपासून रोपे करण्याचे  तंत्र शिकले व रोपांची निर्मिती ते करू लागले. बाजारात येणारे नवीन वाण, नवीन तंत्रज्ञान, औषधे, यंत्रसामग्री यांची माहिती व्हावी म्हणून ते मोठ्या शहरांत भरणार्‍या पुष्प प्रदर्शनांना आवर्जून भेट देत व तेथे उपलब्ध असलेले साहित्य मिळवत. तसेच ते तेथे जमलेल्या तज्ज्ञांशी चर्चा करत व आधुनिक विचारांची ओळख करून घेत. सुरुवातीच्या काळात घराभोवती असलेल्या मोकळ्या जागेत त्यांनी व्यवसाय सुरू केला, पण ही जागा अपुरी पडू लागली. तेव्हा त्यांनी भाडेपट्ट्याने जमीन घेतली व तेथे रोपवाटिका सुरू केली. नंतर शहराच्या शेजारी नक्षत्रवाडी येथे एक एकर जमीन विकत घेतली. आज वैद्यांकडे सात एकर जमीन आहे. रोपवाटिकेसाठी दुसर्‍याच्या शेतात विहीर खणून त्यांनी पाण्याचा प्रश्‍न सोडवला तसेच अन्य उद्योगधंद्यातील मजुरी व सुविधा देण्याचे मान्य करून कुशल कामगारांचा प्रश्‍नही सोडवण्यात यश मिळवले. घराभोवती बागबगिचा विकसित करण्यासाठी रोपवाटिका मालकाला माती, बी, बियाणे व खते हे लहान वेष्टनात उपलब्ध करून द्यावे लागते, हे जाणून शेणखत, कंपोस्ट गांडूळ खत यांची निर्मिती त्यांनी आपल्या शेतावरच सुरू केली.बागेची हौस असणार्‍यांस कात्री, कोयता, खुरपे, करवत, फावडे, कुदळ इ. छोट्या आकाराची साधनेसुद्धा हवी असतात, हे जाणून त्यांनी या सर्व वस्तू उपलब्ध करून दिल्या व आपला व्यवसाय वाढवत नेला.

औरंगाबाद शहरातील व शहराबाहेरील बागकाम सुशोभीकरणाचे अनेक प्रकल्प वैद्यांनी पुरे केले. सिडकोचे नवीन प्रकल्प, हॉटेल ताज रेसिडेन्सी, गरवारे, ग्रीव्हज, बोरकार्ड या उद्योगांच्या परिसरांत बागा फुलवण्याचे कार्य त्यांनी पूर्ण केले. समारंभाच्या सुशोभनासाठी भाड्याने कुंड्या देणे, मंगलप्रसंगी हार, तुरे, गुच्छ पुरवणे असे पूरक उद्योग सुरू केले. गुलाब प्रदर्शनात भाग घेणे, रोपवाटिकांतर्फे प्रदर्शने भरवणे, आनंदनगरीत स्टॉल लावणे, अशा विविध माध्यमांतून वैद्यांनी आपल्या व्यवसायाची प्रसिद्धी घडवून आणली. सामाजिक वनीकरण, अवर्षण प्रतिबंध कार्यक्रम, रोटरी, लायन यांसारख्या संस्था, कंपन्यांचे व्यवस्थापक, बँका यांच्या सहकार्यामुळे व्यवसायाला स्थिरता लाभली. त्यात त्यांना पत्नी सुनीता यांचीही उत्तम साथ लाभली आहे.

- डॉ. निळकंठ गंगाधर बापट

 

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].