Skip to main content
x

वडेर, प्रल्हाद बापूराव

     प्रल्हाद वडेर ह्यांचा जन्म निपाणी (जि.बेळगाव) येथे झाला. तेथेच त्यांचे प्राथमिक शिक्षण झाले. १९४७ साली निपाणीपासून सात मैलांवर कणगले या गावातल्या म्युनिसिपल हायस्कूलमधून ते मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे राजाराम महाविद्यालयामधून बी.ए. झाले (१९५१). पदवीनंतर ते ए.जी. ऑफिसमध्ये नोकरी करू लागले. १९६६मध्ये रुईया महाविद्यालयातून ते एम.ए व मुंबई विद्यापीठातून ना.सी.फडके यांच्या साहित्याचा अभ्यास करून १९९०मध्ये पीएच.डी झाले. गोव्यातील चौघुले महाविद्यालयात ते प्राध्यापकपदी रुजू झाले (१९६२). १९७३नंतर गोवा विद्यापीठात ते मराठीचे प्राध्यापक म्हणून काम करू लागले.

     १९६१मध्ये मंगला राजहंस यांच्याशी त्यांचा विवाह झाला. प्रारंभापासून त्यांचा ओढा कथा-लेखनाकडे होता. ‘चढण’ (१९६२) व ‘वीज’ (१९७७) हे सुरुवातीचे कथासंग्रह असून ‘कोणीकडून कुणीकडे’ (१९७५) हा अनुवादित कथासंग्रह आहे. नंतर ते समीक्षेकडे वळल्याचे दिसते. ‘अनुभव आणि आविष्कार’ (१९६८) हा त्यांचा पहिला समीक्षा-संग्रह होय. त्यांनी देशीवाद, कलावाद, मराठीतील चरित्रात्मक कादंबरी अशा अनेक साहित्य प्रकारांची समीक्षा केली आहे. ‘प्रतिभा आणि प्रतिमा’ (१९९७) यात त्यांनी साहित्यातील सर्व प्रकारांत वाङ्मयीन विचारप्रणालीतील रसपूर्ण समीक्षा केली आहे. डॉ.सुभाष भेण्डे यांच्या समग्र साहित्यावर समीक्षा दृष्टिकोनातून समीक्षा-संपादनही त्यांनी केले आहे.

     वडेर यांची समीक्षा पूर्णपणे कलावादी आहे, असे नाही. ही सामाजिक, आस्वादक समीक्षा आहे. कथा, कादंबरी, ललित लेखन, काव्य अशा निरनिराळ्या वाङ्मय प्रकारांवर त्यांनी चिकित्सक समीक्षा केली आहे. साहित्यात वैशिष्ट्यपूर्ण स्थान असणार्‍या नव्या-जुन्या लेखकांच्या उत्कृष्ट वाङ्मयावर परखडपणे टीका-समीक्षा केली आहे. ही समीक्षा करताना ते आपल्यातील लेखकत्व जागृत ठेवतात. ‘प्रमेय आणि प्रबंध’ (१९९७) हा त्यांचा आणखी एक समीक्षाग्रंथ. सगळ्यात महत्त्वाचा ग्रंथ म्हणजे ‘प्रा.ना.सी.फडके: एक चिकित्सक अभ्यास’ (१९९०) हा त्यांचा पीएच.डीचा प्रबंध होय. प्रा.फडक्यांच्या यथासांग वाङ्मयाचा समीक्षक व अभ्यासू दृष्टिकोनातून त्या-त्या वाङ्मय प्रकाराच्या संदर्भात ते अभ्यास करतात व जे निष्कर्ष हाती आले, ते स्पष्टपणे व बारकाईने मांडण्याचा प्रयत्न करतात. फडक्यांच्या वाङ्मयावर व समीक्षेवर प्रकाश टाकणार्‍या अनेक दुर्मीळ व इतर ग्रंथांचा संदर्भ ते देतात. त्यामुळेच त्यांची समीक्षा एका वेगळ्या प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण आहे, हे जाणवते.

     बोरकरांच्या कादंबऱ्या, गोमंतक मराठी साहित्य संमेलनातील अध्यक्षीय भाषणांतील वैशिष्ट्ये, त्यांतील भाषा, त्यातील साहित्यविचार, मुक्तिपूर्व गोमंतकातील स्त्री साहित्य आणि मुक्तीनंतरचे मराठी साहित्य यांचाही त्यांनी लक्षणीय व वैचारिक परामर्श आपल्या समीक्षेतून फार वेधकपणे आणि अभ्यासपूर्वक घेतला आहे.

     नवबौद्धांची समीक्षा करताना त्या समाजाचा जिवंत अनुभव त्यांच्याकडूनच घडला पाहिजे, असा ते जाणीवपूर्वक आग्रह धरतात. वडेरांचा पाश्चात्त्य साहित्याचा प्रचंड व्यासंग आहे. एकूणच त्यांचे वाचन वैविध्यपूर्ण आणि अफाट आहे. त्यांच्या गाढ व्यासंगाचा परिणाम त्यांच्या समीक्षा-लेखनावर झालेला जाणवतो. साहित्याचे मूल्यमापन करताना ते आपल्या भूमिकेवर ठाम असतात. विरोधी मतांचा ते तटस्थपणे परामर्श घेतात. म्हणूनच त्यांची समीक्षा मोलाची व उंची गाठणारी वाटते. ‘साहित्य शब्द व अर्थ’ (२००८) यात त्यांची विचारी, परखड भूमिका स्पष्टपणे दिसते.

     - रागिणी पुंडलिक

वडेर, प्रल्हाद बापूराव