व्यवहारे, विश्वनाथ दामोदर
नाशिक जिल्ह्यातील निफाड गावात एका शेतकरी कुटुंबात विश्वनाथ दामोदर व्यवहारे यांचा जन्म झाला. निफाड इंग्लिश स्कूल या माध्यमिक शाळेतून ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी ते नाशिकच्या एच.पी.टी. कला व विज्ञान महाविद्यालयामध्ये दाखल झाले. महाविद्यालयीन शिक्षण चालू असताना एस. टी. सी. ही शिक्षणशास्त्रातील पदविका परीक्षा उत्तीर्ण झाले. १९६० ते १९६२ ही दोन वर्षे नवभारत विद्यालय, पंचवटी, नाशिक या प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून नोकरी केली. १९६२ मध्ये त्यांनी बी.ए. पदवी मिळविली आणि नवीन इंग्रजी शाळा, ओझर मिग या माध्यमिक शाळेत शिक्षक म्हणून ते रुजू झाले. ही नोकरी करीत असतानाच ते बी. एड. झाले आणि एम.ए. पदवीही त्यांनी मिळविली. कर्मवीर भाऊराव पाटील यांची ‘कमवा आणि शिका’ ही योजना त्यांनी प्रत्यक्षात आणली.
याच काळात न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांच्या निफाड या जन्मगावी त्यांच्या कार्याला साजेसे शैक्षणिक स्मारक असावे या विचारातून ‘न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे विद्या प्रसारक मंडळाची’ स्थापना झाली. या कामात व्यवहारे यांचा मोठा सहभाग होता. सन १९६४ मध्ये या मंडळाच्या वतीने निफाडमध्ये वैनतेय विद्यालय व उच्चमाध्यमिक विज्ञान महाविद्यालय या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची स्थापना झाली.
सन १९६७ मध्ये व्यवहारे यांनी या विद्यालयाच्या मुख्याध्यापक पदाची जबाबदारी स्वीकारली. विद्यालयाची प्रगतीच्या दिशेने वेगाने वाटचाल सुरू झाली. लहानपणी झालेले साने गुरुजी व राष्ट्रसेवादलाचे संस्कार, स्वत:चे वाचन, चिंतन व लेखन यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून त्यांनी विविध शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन केले. ब्रिलियंट अकादमी, हरित ग्राम प्रकल्प, योगाभ्यासवर्ग, आरोग्य शिबिरे, मातृपितृस्मृतिदिन हे त्यांच्या अनेक उपक्रमांमधील काही वैशिष्ट्यपूर्ण उपक्रम. विद्यालयातीलच, नव्हे तर शाळाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी ‘रानफुले’हा विशेष उपक्रम त्यांनी अनेक वर्षे राबविला. शाळासमूह योजना प्रत्यक्षात आणली व परिसरातील शिक्षकांना नवी प्रेरणा व दिशा दिली.
निफाड तालुक्यातील शाळांसाठी ‘नीतिमूल्यशिक्षण’ शिबिराचे आयोजन केले. या विविध उपक्रमांमुळे वैनतेय विद्यालय ‘उपक्रमांचे मोहोळ’ म्हणून ओळखू जाऊ लागले.
सन १९८७ मध्ये निफाड येथे ‘सामाजिक परिषदे’ चा शताब्दी महोत्सव महाराष्ट्र पातळीवर साजरा झाला. त्याच्या नियोजनात त्यांचा यशस्वी सहभाग होता, तर सन २००१ मध्ये न्या. रानडे स्मृती वर्षाच्या सांगता समारंभाचे नियोजनही व्यवहारे यांचे होते.
त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी नाशिक जिल्हा परिषद व महाराष्ट्र शासनाने ‘आदर्श शिक्षक पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव केला. सन १९९९ मध्ये ते निवृत्त झाले. सेवानिवृत्तीच्या काळात करावयाच्या कार्याचे नियोजन केलेलेे असल्याने आजही महाराष्ट्र पातळीवर बाल संस्कार व युवा संस्कार योजनेच्या निमित्ताने समाजाच्या जडणघडणीचे त्यांचे कार्य चालू आहे.