Skip to main content
x

आमोणकर, किशोरी रवींद्र

जयपूर घराण्याच्या विख्यात गायिका गानतपस्विनी मोगूबाई कुर्डीकर व वडील माधवदास भाटिया यांच्या ज्येष्ठ कन्या असणार्‍या किशोरी रवींद्र आमोणकर यांचा जन्म मुंबईत झाला. त्यांचे शालेय शिक्षण बालमोहन शाळेत झाले व नंतर जयहिंद महाविद्यालयात त्यांनी विज्ञान शाखेचे शिक्षण घेतले.

अगदी बालवयापासूनच उ.अल्लादिया खाँसाहेब मोगूबाई कुर्डीकरांना गायनाची जी तालीम देत असत, तिचा खोल संस्कार त्या अबोध वयातही किशोरीताईंवर झाला. माधवदास यांचे १९३९ साली निधन झाल्यावर मोगूबाईंवर स्वत: अर्थार्जन करून तीन मुलांच्या संगोपनाची जबाबदारी आली.  मोगूबाईंनी आपल्या या कन्येस जयपूर घराण्याची शिस्तशीर तालीम दिली. किशोरी यांचा १९५५ साली रवींद्र आमोणकर यांच्याशी विवाह झाला.

किशोरी आमोणकरांनी अण्णा पर्वतकर, आग्रा घराण्याचे अन्वर हुसेन खाँ, जयपूर घराण्याचे मोहनराव पालेकर, भेंडीबाजार घराण्याच्या अंजनीबाई मालपेकरांचे व अगदी अल्पकाळासाठी मास्तर कृष्णराव फुलंब्रीकरांचेही मार्गदर्शन घेतले. हिंदी चित्रपटसृष्टीतील हुस्नलाल-भगतराम या प्रसिद्ध संगीतकार जोडीपैकी हुस्नलाल यांच्याकडे त्या पंजाबी ढंगाची ठुमरी, गझल, लोकगीतेही शिकल्या. त्यांनी संतसाहित्य, विशेषत: संत ज्ञानेश्वरांच्या साहित्याचे वाचन-मनन केले. उपजत अत्यंत कुशाग्र सांगीतिक व सौंदर्यबुद्धी, अपेक्षित असणारी सांगीतिक अभिव्यक्ती स्वत:च्या गळ्यातून साकारण्यासाठी अट्टाहास करण्याची ईर्ष्या यांमुळे किशोरी आमोणकरांनी अल्पवयातच रागगायनात व ख्याल, ठुमरी, भजन अशा गानप्रकारांत प्राविण्य मिळवले.

पुढे १९६० च्या दशकात सुमारे ७-८ वर्षे आवाजाची अनुकूलता न राहिल्याने, त्या सक्तीच्या विश्रांती काळात त्यांनी चिंतन करून, त्यांना वारशाने मिळालेल्या जयपूर गायकीला एक निराळे परिमाण दिले. मूलत: बिकट तानक्रिया व अनवट, जोड  रागांवर भर देणार्‍या जयपूर गायकीत संथ आलापचारीसारख्या अन्य घटकांद्वारे या गायकीस त्यांनी अधिक विस्तृत, पसरट, भावाविष्कारजनक केले. व्याकरण व घराण्याच्या शिस्तीच्या चौकटीतून स्वत:स मोकळे करून बुद्धी व भावना दोन्हींस चालना देणारा गायकीचा घाट त्यांनी तयार केला. काही प्रसंगी ठराविक रागांत त्या विशुद्ध जयपूर गायकीचे दर्शन घडवतात, मात्र त्यांचा भर स्वनिर्मित गायकी मांडण्याकडेच राहिला.

एच.एम.व्ही.ने १९६७ साली काढलेल्या  आमोणकरांच्या पहिल्या ध्वनिमुद्रिकेतील जौनपुरी, पटबिहाग हे राग ऐकताना त्यांना मोगूबाईंकडून मिळालेल्या तालमीतील जयपूर घराण्याचे शिस्तशीर गायन दिसते. नंतर १९७१ साली प्रसिद्ध झालेली त्यांची राग भूप व बागेश्रीची ध्वनिमुद्रिका अतीव लोकप्रिय झाली. त्यात त्यांची स्वतंत्र विचाराने परिवर्तित झालेली ‘भाववादी’ गायकी दिसते. यानंतरही त्यांची अनेक व्यावसायिक ध्वनिमुद्रणे प्रसिद्ध व लोकप्रिय झाली.

गायकीच्या ढाच्यास अपेक्षित अशी अभिव्यक्ती करणार्‍या अनेक भावपूर्ण बंदिशींची त्यांनी सौष्ठवयुक्त रचना केली. उदा. भूप (प्रथम सूर साधे, सहेला रे, मैं तेरी रे), यमन (मो मन लगन लागी, तोसे नेहा लागा, सब बन प्रीत री होई, तराना), बागेश्री (बिरहा ना जरा, आज सह्यो ना जाए बिरहा, एरी माई साजन नहीं आए), मालकंस (तुम बिन कौन सवारे, मन सुमिरन कर तू रामनाम), नंद (आजा रे बालमवा), खंबावती (रे निर्मोही सजना), खंबावती : झिंझोटी अंग (एरी जुग बीते), भूपनट (तराना), रागेश्री (आली री पलक न लागी), बिहारी (लागे ना जिया मोरा), हंसध्वनी (गणपत विघनहरन, आज सजनसंग मिलन, तराना), भिन्नषड्ज (उड जा रे कागा, अंगना मोरे आजा), ललितपंचम (छैला ना रंग डारो), ललितबिभास (चलो री सखी सौतन घर जैये), बिलासखानी तोडी (आली री मैं तो जागी, सजनी कवन देस गए), अहिरभैरव (नैनवा बरसे), हिंडोलबहार (आए हो नंदलाल), मधमाद सारंग (जबते मन लाग्यो, श्यामरंग मन भीनो), भीमपलास (रंग सो रंग मिला), श्री (परमपुरुष नारायण), मारवा (छांडो लंगर मोरी बैंया), जयत (नई रे लगन लागी बलमा), खेमकल्याण (मोरा मनहर ना आयो), भूपप्रकार (नवरंग बहार आयो), बिलावल प्रकार (डगर चलत मोरी छीन लई गगर), गौड मल्हार (बरखा बैरी भयो), तिलक मल्हार (रे बिरहा मैं तो जागी), अडाना मल्हार (छाई रे बदरिया कारी कारी), बरवा मल्हार (बरखा बैरन हमार) इ. तसेच आनंद मल्हार (बरसत घन आयो), सावन मल्हार (रे मेघा ना बरसो) हे रागही त्यांनी निर्माण केले आहेत.

‘गीत गाया पत्थरों ने’ (१९६४) या केवळ एकाच हिंदी चित्रपटासाठी किशोरी आमोणकरांनी पार्श्वगायन केले. त्यांनी गायलेल्या ‘हे श्यामसुंदर राजसा’ व ‘जाईन विचारित रानफुला’ (गीत : शांता शेळके व संगीत : हृदयनाथ मंगेशकर) या भावगीतांची एच.एम.व्ही.ने काढलेली ध्वनिमुद्रिका (१९६८) खूपच रसिकप्रिय झाली.

तसेच, त्यांनी स्वरबद्ध केलेल्या व गायलेल्या हिंदी भजनांच्या (म्हारो प्रणाम, घट घट में पंछी बोलता) व मराठी अभंगांच्या (रंगी रंगला श्रीरंग, पडिले दूर देशी)  ध्वनिफितीही गाजल्या. त्यांच्या आवाजात व्यंकटेश सहस्रनाम, राघवेंद्रस्वामींची कानडी भजनेही (१९८८) ध्वनिमुद्रित झाली आहेत.

मंगेश पाडगावकर लिखित व पु.ल. देशपांडे यांनी संगीत दिलेल्या ‘बिल्हण’ या संगीतिकेतही त्यांनी गायन केले होते. कर्नाटक संगीतातील विद्वान गायक बालमुरली कृष्णन यांच्याबरोबर गायनाची जुगलबंदी, तसेच हरिप्रसाद चौरासिया यांच्यासह बासरीबरोबर केलेले सहगायन असे काही वेगळे प्रयोगही त्यांनी केले. त्यांनी स्वरबद्ध केलेल्या संत मीराबाईंच्या भजनांचा ‘मगन हुई मीरा चली’ हा कार्यक्रम, तसेच मराठी संतांच्या अभंगांचा ‘तोचि नादू सुस्वरू झाला’ हे कार्यक्रमही त्यांनी सादर केले. किशोरी आमोणकरांनी मराठी नाट्यसंगीतास आपल्या मैफलींत क्वचित अपवादात्मक स्थान दिले, मात्र रणजित देसाई लिखित ‘तुझी वाट वेगळी’ (१९७८) या एकाच मराठी नाटकासाठी त्यांनी संगीत दिले होते. गोविंद निहलानी दिग्दर्शित ‘दृष्टी’ (१९९०) या हिंदी चित्रपटासही त्यांनी संगीत दिले.

अरुण द्रविड, सुहासिनी मुळगावकर, माणिक भिडे, मीना जोशी, मीरा पणशीकर, आरती अंकलीकर, देवकी पंडित, नंदिशी बेडेकर, विद्या भागवत, व्हायोलिनवादक मिलिंद रायकर, नात तेजश्री आमोणकर हे त्यांचे काही शिष्य; तसेच रघुनंदन पणशीकर हे शिष्योत्तम त्यांच्या गायकीचा वारसा पुढे नेत आहेत. किशोरी आमोणकरांंनी निर्माण केलेल्या खास गानमुद्रेचा प्रभाव नंतरच्या सुमारे तीन पिढ्यांवर पडला असून विशेषत: गायिकांनी त्यांचे अनुकरण केले.

बालवयात झालेल्या हलाखीच्या परिस्थितीचा, माईंच्या सामाजिक स्थानामुळे गोव्यात त्यांना मिळणारी हीन वागवणूक यांचा परिणाम म्हणून की काय, ताईंचा स्वभाव काहीसा हट्टी, एककल्ली व आक्रमक बनला असावा. किशोरी आमोणकरांचे वैयक्तिक आचारविचार न पटणारे लोकही त्यांच्या गायनाने मोहित होतात, हे सामर्थ्य त्यांच्या सांगीतिक कर्तृत्वात आहे. 

देश-विदेशांतील महत्त्वाच्या सर्व स्वरमंचांसह आकाशवाणी, दूरदर्शन अशा माध्यमांतून किशोरी आमोणकरांचे गायन रसिकप्रिय झाले. त्यांचे सांगीतिक विचार, भरतनाट्यशास्त्रातील रससिद्धान्ताचा पाठपुरावा स्वत:च्या रागगायनाच्या संदर्भात करणारा त्यांचा ‘स्वरार्थरमणी’ हा ग्रंथ २००९ साली प्रसिद्ध झाला.

‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार (१९८५), ‘पद्मभूषण’ (१९८७), ‘सनातन संगीत सन्मान’ (१९९७), ‘गोदावरी गौरव’ (१९९८), ‘पद्मविभूषण’ (२००२), ‘आय.टी.सी.एस.आर.ए.’ पुरस्कार (२००३), संगीत नाटक अकादमी रत्नसदस्यत्व (२००९), ‘पु.ल. देशपांडे बहुरूपी पुरस्कार’ (२००९) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले गेले. तसेच ‘गानसरस्वती’ (१९८७), ‘संगीत सम्राज्ञी’ (१९९७), भारत गानरत्न (२००१) असे किताबही त्यांना देण्यात आले. २०११ साली अमोल पालेकर व संध्या गोखले यांनी त्यांच्या सांगीतिक कारकिर्दीवर ‘भिन्नषड्ज’ हा अनुबोधपट केला.

— चैतन्य कुंटे

आमोणकर, किशोरी रवींद्र