Skip to main content
x

अंबपकर दत्तात्रेय सखाराम

     त्तात्रेय सखाराम अंबपकर यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील वारणाकाठच्या अंबप या गावी झाला. लहानपणापासूनच त्यांना नकला करण्याची सवय होती, त्यातून निर्माण होणाऱ्या भांडणांना कंटाळून त्यांच्या घरच्यांनी त्यांची कोल्हापूरला रवानगी केली. कोल्हापूर विद्यापीठ हायस्कूलमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले. त्यांनी राजाराम महाविद्यालयामधून त्यापुढील शिक्षण घेतले. शिकत असतानाही नकला करण्याची सवय कमी झाली नाही, उलट त्यातील गोडी वाढल्यामुळे त्यांनी नाटकांमधून कामे करायला सुरूवात केली. त्यातूनच त्यांच्यावर अभिनयाचे संस्कार झाले. महाविद्यालयात अंबपकर व मा. विनायक एकाच वर्गात शिकत होते. चित्रपटाच्या आवडीमुळे अंबपकर, बाबूराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीत जाऊ लागले. कंपनीत दाखल होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने पडतील ती कामे करण्याचे बंधन असल्यामुळे द.स. अंबपकरांनाही सुरूवातीच्या काळात सर्व कामे करावी लागली.

     अभिनयाची आवड असणाऱ्या अंबपकर यांना काम करावे लागले ते दिग्दर्शन विभागात, बाबूराव पेंढारकर यांच्या हाताखाली. त्याच बरोबरीने त्यांनी चित्रपट विपणन, प्रदर्शन आदी गोष्टीही येथे केल्या.

     पुढे महाराष्ट्र फिल्म कंपनी बंद पडल्यानंतर भालजी पेंढारकर यांच्या कोल्हापूर सिनेटोन कंपनीत अंबपकर दाखल झाले. त्या काळात भालजी पेंढारकर ‘आकाशवाणी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन करत होते. या चित्रपटात अंबपकर यांनी साहाय्यक म्हणून काम केले आणि छोटी भूमिकाही केली. याच काळात भालजी, कंपनीशी वाद झाल्यामुळे कंपनी सोडून गेले आणि दादासाहेब निंबाळकरांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्याचे ठरल्यावर अंबपकरांनी त्यांना साहाय्य केले. त्याने प्रभावित झालेल्या दादासाहेबांनी अंबपकरांना स्वत:च्या ‘स्वराज्य सीमेवर’ या चित्रपटासाठी आपल्याकडे बोलावले. पुढे भालजींच्या ‘पार्थकुमार’ चित्रपटातही त्यांनी काम केले. भालजी पेंढारकर यांनी कोल्हापूर सिनेटोन सोडल्यानंतर ते सरस्वती सिनेटोन, अरुण फेमस इ. कंपन्यांचे चित्रपट करत होते आणि अंबपकर त्यांना साहाय्य करत होते. केवळ दिग्दर्शन नव्हे तर चित्रपटनिर्मिती क्षेत्रातले वेगवेगळे धडे घेत होते. हे चित्रपट होते ‘राजा गोपीचंद’, ‘नेताजी पालकर’, ‘गोरखनाथ’, ‘थोरातांची कमळा’, ‘सूनबाई’. पुढे भालजी पेंढारकर कोल्हापूरला गेले आणि त्यांनी ‘प्रभाकर चित्र’ ही स्वत:ची संस्था उभारली आणि ऐतिहासिक, पौराणिक आणि ग्रामीण चित्रपटांची निर्मिती केली. त्या चित्रपटात अंबपकर सहभागी झाले.

    १९४७ साली मा. विनायकांचे सहकारी व ज्येष्ठ ध्वनिमुद्रक विष्णुपंत चव्हाण आणि निर्मिती व्यवस्थापक वामनराव या दोघांनी बाबूराव पेंढारकर यांच्या नेतृत्वाखाली ‘मंगल चित्र’ ही संस्था स्थापन केली आणि ‘जय मल्हार’ (१९४७) चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटाचे दिग्दर्शक होते द.स. अंबपकर. बाबूराव पेंढारकर, ललिता पवार, चंद्रकांत, सुमती गुप्ते यांच्यासह अंबपकर यांनीही यात अभिनय केला. दिनकर द. पाटील यांच्या ‘वाघ्या मुरळी’ या कथेवर हा तमाशाप्रधान चित्रपट आधारलेला होता. प्रचंड लोकप्रिय ठरलेल्या या चित्रपटाने चित्रपट व्यवसायात नवचैतन्य आणले. हमखास पैसा देणारा मराठी चित्रपट काढायचा तर ‘ठसकेबाज लावण्यांचा तमाशा चित्रपट’ काढायचा, असा पायंडा या चित्रपटामुळे पडला. या चित्रपटानंतर अंबपकर यांना ‘पुढचं पाऊल’ या चित्रपटात ‘बारक्यानाना’ ही वैशिष्ट्यपूर्ण भूमिका मिळाली. त्यांची ही भूमिका रसिक प्रेक्षकांच्या चांगलीच स्मरणात राहिली. त्यानंतर त्यांनी माणिक स्टुडिओचा ‘कल्याण खजिना’ (१९५०), रत्नप्रभाने निर्मिती केलेला ‘संत कान्होपात्रा’ (१९५०) या चित्रपटांचे दिग्दर्शन केले. ‘संत कान्होपात्रा’ची कथा अंबपकर यांनीच लिहिली होती. १९५४ साली त्यांनी ‘कांचन चित्र’ ही स्वत:ची  निर्मिती संस्था स्थापन केली आणि ‘सासर माहेर’ या चित्रपटाची निर्मिती आणि दिग्दर्शनही केले. १९५७ साली ‘देवाघरचं लेणं’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले. कथा-पटकथा अंबपकर यांनीच लिहिली आणि संवाद पु.भा.भावे यांचे होते.

     चित्रपट दिग्दर्शनाबरोबरच अंबपकर यांनी ‘तांबडी माती’, ‘चाळ माझ्या पायात’, ‘आधार’, ‘अशी रंगली रात्र’, ‘बाईनं केला सरपंच खुळा’ अशा चित्रपटांत दिग्दर्शकांच्या आग्रहाखातर छोट्या भूमिकाही केल्या.

    द.स. अंबपकर यांनी मोलाचे योगदान दिले ते मराठी चित्रपट व्यवसायिकांची संघटना बांधण्यामध्ये. पुढे १ नोव्हेंबर, १९६६ च्या संमेलनात या संस्थेची ‘मराठी चित्रपट महामंडळ’ अशी रीतसर स्थापना झाली. या संस्थेच्या कार्यकारिणीतही ते होते, तसेच या संस्थेचे कार्यवाह म्हणूनही त्यांनी काम केले. कोल्हापुरात चित्रनगरी स्थापन करण्यासाठी उभारलेल्या चळवळीत त्यांचा महत्त्वपूर्ण वाटा होता. या चळवळीच्या यशस्वितेसाठी त्यांनी निकराचा लढा दिला. तो लक्षात घेऊन त्या वेळचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांना ‘शेलार मामा’ ही पदवी दिली. कोल्हापूरच्या ‘करवीर नाट्य मंडळा’लाही त्यांनी योगदान दिले. ‘आंधळ्यांची शाळा’, ‘सुवर्णपदक’ अशा अनेक नाटकांचेही दिग्दर्शन त्यांनी केले.

- सुभाष भुरके

अंबपकर दत्तात्रेय सखाराम