Skip to main content
x

आपटे मधुकर शंकर

         ‘धू आपटे के साथ काम करते वख्त अच्छी अ‍ॅक्टिंग करके कोई फायदा नही. लोग तो मधूकोहि देखेंगेंअसा हिंदी चित्रपटसृष्टीतील मातब्बर नट ओमप्रकाश यांच्याकडून अभिप्राय मिळवणाऱ्या मधू शंकर आपटे यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. घरच्या संपत्तीचे वाद चालू असतानाच्या काळातच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यावर त्यांच्या आई गंगूबाई आपल्या तीन मुलांना घेऊन आपल्या भावाच्या (ताम्हणकर यांच्या) आश्रयाला गेल्या. मुलांना सांभाळण्याच्या जबाबदारीमुळे त्यांनी लोणची, पापड, हलव्याचे दागिने, जरीच्या टोप्या इत्यादी गोष्टी करून विकण्याचा व्यवसाय केला व आपल्या मुलांचा सांभाळ केला. वयाच्या नवव्या वर्षी अतितापाने मधू आपटे यांची वाचा गेली. मिरजेच्या डॉ. वानलेस यांनी केलेल्या घशाच्या शस्त्रक्रियेमुळे त्यांना अडखळत का होईना, बोलता येऊ लागले. त्यांचा तोतरेपणा मात्र कायम राहिला.

घरची गरिबी असल्यामुळे शाळेची फी देणे परवडत नव्हते, त्यामुळेच बऱ्यापैकी हुशारी, चांगली स्मरणशक्ती व उत्तम हस्ताक्षर असूनही मधू आपटे यांचे शालेय शिक्षण पाचव्या इयत्तेपुढे जाऊ शकले नाही. मधू आपटे यांच्या मामांना १९२९ मध्ये प्रभातमध्ये नोकरी लागली व त्यांनी मधू आपटे यांच्या मोठ्या भावाला - अनंत आपटे यांना बालनट म्हणून काम मिळवून दिले.

पुढे मामांच्या ओळखीनेच मधू आपटे १९३४ मध्ये प्रभातच्या पेंटिंग खात्यात कामाला लागले. तेथे त्यांना खूप कष्टाची कामे करावी लागली. ती त्यांना झेपत नसत. तरी त्यांनी वर्षभर ती कामे केली. त्याच वेळेस त्यांचा साहेबमामा फत्तेलाल यांच्याशी ऋणानुबंध जुळला. याच काळात सोळा वर्षांच्या तरण्या मधूच्या तोंडाला बालनट म्हणून रंग लागला तो अपघातानेच. स्टील डिपार्टंमेंटमध्ये असताना शांतारामबापूंनी फोनवर मधू आपटे यांचे बोलणे ऐकल्यावर त्यांनी मधू आपटे यांना संत तुकारामया चित्रपटात सालोमालो या इरसाल व्यक्तिरेखेच्या भूमिकेत उभे केले.

प्रभात कंपनीचा १९५४ मध्ये लिलाव झाल्यावर मधू आपटे बेकार झाले, त्या वेळेस त्यांना सीताकांत लाड व चित्तरंजन कोल्हटकर यांच्या प्रयत्नांमुळे आकाशवाणीवर काम मिळाले. पण त्यात सातत्य नसे. येथे काम करत असतानाच त्यांनी नाटकांमध्येही कामे करायला सुरूवात केली. १९४४ मध्ये मा. दीनानाथ यांच्या पहिल्या पुण्यतिथीला भावबंधननाटकाचा प्रयोग करण्यात आला, त्यात मधू आपटे यांना लता मंगेशकर यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली. अधूनमधून ते बाबूराव गोखले यांच्या नाटकांमधून काम करीत असत. पण तेथे त्यांचा जम न बसल्यामुळे त्यांनी १९५६ मध्ये मुंबईत फिल्मिस्तान कंपनीत नोकरी स्वीकारली. दरम्यानच्या काळात ते सुलोचनादीदींबरोबर चित्रीकरणाला जात असत, तेथे वावरत असतानाच हिंदी निर्मात्यांनी त्यांना छोट्या-मोठ्या भूमिका द्यायला सुरूवात केली. तेथे त्यांनी राजेंद्रकुमार, ओमप्रकाश, मोहनकुमार, नरेशकुमार यांच्यासोबत काम केले. वसंत जोगळेकर यांच्या कारगीरया हिंदी चित्रपटातही त्यांना ओमप्रकाश व ललिता पवार या भांडकुदळ जोडप्याच्या इरसाल मुलाची भूमिका मिळाली. खरे तर मधू आपटे यांना तोतरे बोलण्याच्या ढंगावर भूमिका मिळत असल्या तरी ते तेवढ्यावरच आपली भूमिका वठवत नसत, तर विनोदी प्रसंगात दुसऱ्याच्या बोलण्यावर रिअ‍ॅक्ट होण्याचे तंत्रही ते वापरत असत. त्यामुळेच त्यांनी वठवलेल्या विनोदी भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात राहत. चार्ली चॅप्लीन, डॅनीके, बालगंधर्व, नानासाहेब फाटक यांच्याविषयी त्यांच्या मनात आदर होता.

मधू आपटे यांनी आपल्या ३६-३७ वर्षांच्या कारकिर्दीमध्ये २०० हिंदी-मराठी चित्रपटांमध्ये व २० नाटकांमध्ये कामे केलेली आहेत. वयाच्या ७५ व्या वर्षी त्यांचे पुणे येथे वार्धक्याने निधन झाले.    

- कांचन काशिनाथ घाणेकर

Add new comment

Restricted HTML

  • You can align images (data-align="center"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can caption images (data-caption="Text"), but also videos, blockquotes, and so on.
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].
  • You can use shortcode for block builder module. You can visit admin/structure/gavias_blockbuilder and get shortcode, sample [gbb name="page_home_1"].