Skip to main content
x

अवचट, अनिल त्र्यंबक

डॉ. अनिल अवचट यांचा जन्म पुणे येथे झाला. त्यांचे वडील डॉक्टर होते आणि ओतूर (जिल्हा-पुणे) येथे वास्तव्य करीत असल्याने अवचटांचे आठवीपर्यंतचे शिक्षण ओतूरलाच झाले. पहिला मुलगा असल्याने त्याने डॉक्टर व्हावे ही वडिलांची तीव्र इच्छा होती. ओतूरसारख्या गावात राहून हे जमणे कठीण म्हणून वडिलांनी त्यांना पुण्याच्या मॉडर्न हायस्कूलमध्ये (वसतिगृहामध्ये) शिक्षणासाठी ठेवले. नंतर १९५९मध्ये मॅट्रिक झाल्यावर फर्ग्युसन महाविद्यालयातून ते इंटर झाले. पुढे बी.जे.मेडिकल महाविद्यालय (पुणे) येथून एम.बी.बी.एस. झाले. याच महाविद्यालयामधील त्यांची मैत्रीण सुनंदा ही लग्नानंतर डॉ.अनिता अनिल अवचट झाली. मुक्ता आणि यशोदा या त्यांच्या दोन मुली होत. डॉक्टरांचे वास्तव्य पुणे येथे राहिले . ‘मुक्तांगणचे कार्य आणि लेखन हेच त्यांचे खरे कार्य होते. कारण डॉक्टर होऊनही डॉक्टरी न केलेले ते अतिशय संवेदनशील लेखक होते.

अवचट डॉक्टर झाल्यावर त्यांचा समाजकार्याकडे कल असल्याने त्यांनी वैद्यकीय व्यवसाय न करता, सामाजिक चळवळींमध्ये सहभाग घ्यायला सुरुवात केली. सामाजिक क्षेत्रातील अनुभवांशी निगडित अशा प्रकारचे लेखन साधनासाप्ताहिकातील वेधया सदरातून ते सातत्याने लिहीत राहिले. एवढेच नाही तर साधनापुरोगामी सत्यशोधकया त्रैमासिकांचे संपादनही काही वर्षे त्यांनी केले. युक्रांदला अर्पण केलेले पूर्णियाहे बिहारच्या समाजदर्शनाविषयीचे त्यांचे पहिले पुस्तक १९६९मध्ये प्रकाशित झाले. एका समाजवादी निष्ठेच्या तरुणाची प्रतिकारशून्य गुलामगिरीविषयीची प्रतिक्रिया यात त्यांनी व्यक्त केली.

वेध, ‘हमीद, ‘अंधेरनगरी निपाणी, ‘छेद, ‘माणसं, ‘संभ्रम, ‘वाघ्यामुरळी, ‘कोंडमारा, ‘गर्द, ‘धार्मिक, ‘कार्यरत अशी सारी पुस्तके त्या-त्या संदर्भातील प्रत्यक्ष पाहणीवर आधारलेली वृत्तान्तवजा, तीव्र सामाजिक भानातून लिहिलेली आहेत. याव्यतिरिक्त त्यांची सृष्टीत गोष्टीत’ 'मुक्तांगणच्या गोष्टी' ,'पुण्याची अपूर्वाई' ,'सुनंदाला आठवताना', 'मस्त मस्त उतार' , 'अमेरिका' , 'आप्त' , ‘मजेदार ओरिगामी’ इत्यादी त्यांची पुस्तके प्रसिद्ध आहेत. भोवतालच्या घटनांकडे आणि वृत्ती-प्रवृत्तींकडे बघण्याची चौकस शोधक नजर, उत्कट सामाजिक जाणीव, पांढरपेशा आणि बुद्धीजीवी वर्गाच्या दांभिकपणाविषयीची चीड, ह्या गोष्टी त्यांच्या लेखनातून वेळोवेळी व्यक्त होताना दिसतात. या सर्वांमागे समाज परिवर्तनाची आस जाणवते .समाजातील दुबळ्या व उपेक्षित आणि दारिद्र्यात रूढींच्या कचाट्यात व समाजाच्या ओझ्याखाली वाकून जगणाऱ्या सामान्य माणसांचे त्यांच्या अगतिक आयुष्याचे वेगळ्या अशा स्तरांवरचे जीवन जगणाऱ्यांची ओळख करून देणारे लेखन अवचट सातत्याने करताना दिसतात. दुष्काळग्रस्त माणसे, झोपडपट्टीतील माणसे, भटक्या जमातीची माणसे, तसेच विडी कामगारांचे अंधारमय शोषित जीवन या साऱ्यांचे विलक्षण दाहक दर्शन त्यांनी माणसंमधून घडवले आहे.

अवचटांच्या जीवननिष्ठा आणि त्यांचा दृष्टिकोन गंभीर बांधिलकी हे मूल्य मानणारा आहे. त्यामुळे त्यांच्या लेखनातून एक सखोल, संवेदनशील दृष्टीकोन व्यक्त होतो. धागे आडवे-उभेह्या पुस्तकांत पुण्यामुंबईच्या वेश्यावस्त्या, थिएटर कामगार, तमाशा कलावंत, सांगली हळद कामगार ह्यांचे जीवन यथार्थपणे दर्शवले आहे.त्याचबरोबर स्वतःविषयी 'आप्त' ,'मस्त मस्त उतार ' ,'सुनंदाला आठवताना ' यासारख्या पुस्तकांतून त्यांचे आत्मपर ललित लेखन वाचायला मिळते.
  अवचटांच्या अनेक पुस्तकांचे विषय गंभीर असले, तरी लालित्यपूर्ण मांडणीमुळे ते वाचकप्रिय झाले आहेत. सूक्ष्म निरीक्षणे नोंदवीत, सामाजिक प्रश्नांवर भाष्य करणारे अवचटांचे लेखन प्रथम पुरुषी आत्मनिवेदनात्मक वाचकांच्या मनाचा ठाव घेणारे आहे. महाराष्ट्रीय समाजाच्या उपेक्षित स्तरातील जीवनाचा वेध घेणारे असे हे सामाजिक स्तरावरचे लेखन आणि दुसरीकडे स्वत:विषयीचे आत्मपर लेखन अशा दोन स्तरांवर अवचट लेखन करताना दिसतात.

अनिल अवचट हे एक अजब व्यक्तिमत्त्व ! ते डॉक्टर , लेखक,चित्रकार असे सर्वकाही होते. ओरिगामी आणि लाकडातील शिल्प करण्याची त्यांना हौस होती . त्यांना छायाचित्रणाचा छंद होता. तसेच त्यांना बासरीचा नाद आणि वाचनाचे, भ्रमंतीचे वेड होते . हे कमी की काय तर ते स्वयंपाकघरातही प्रयोगशील होते . पदार्थ बनविण्यासाठी लहान-सहान सूचना देण्यातही ते निपुण होते. प्रत्येकाला निसर्गाने कलागुण दिलेले असतात. त्यांच्याकडे बघणे, ते वाढवणे, त्याला अग्रक्रम देणे हे आपल्या हातात आहे. त्याचा निर्भेळ आनंद लुटण्यासाठी, त्याच्यातून पैसा मिळविण्यापासून किंवा कीर्तीच्या विचारापासून दूर राहिले पाहिजे. या वृत्तीने आपण शिकत, प्रयत्न करीत राहिलो तर वेगवेगळे गुरू भेटत राहतात आणि कसलीही अपेक्षा न ठेवता महत्त्वाचे असे काही देऊनही जातात. आपणही पुढच्यांना त्याच भावनेने देत राहायचे. या वृत्तीतून निखळ कलानंदातून ते सारे छंद जोपासतात आणि हे सारे अनुभवाचे संचित लेखनातून आपल्यापर्यंत पोचवतात. त्यांना अनेक पुरस्कार, सन्मान प्राप्त झाले आहेत.

अवचटांच्या माणसं’, ‘वेध’, ‘पूर्णिमाया पुस्तकांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार,कार्यरतला महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, कर्‍हाडचा रामशास्त्री प्रभुणे पुरस्कार, लाभसेटवार पुरस्कार, शं.वा.किर्लोस्कर पुरस्कार इत्यादी पुरस्कार त्यांना मिळाले. या व्यतिरिक्त १९८८ मध्ये आयोवा विद्यापीठातर्फे (USA) भरलेल्या आंतरराष्ट्रीय लेखक परिषदेसाठी भारतातर्फे त्यांची निवड झाली होती. २०११ साली महाराष्ट्र राज्य साहित्य पुरस्कार त्यांना मिळाला. 'मोर' या पुस्तकाला मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच 'सृष्टीत गोष्टीत' या पुस्तकाला  २००८ चा राज्य पुरस्कार मिळाला. व्यसनमुक्तीसाठी कार्यरत असणारी अवचट यांची संस्था ‘मुक्तांगण’अनेक व्यसनमुक्तांच्या आयुष्याचा आधार ठरली आहे . मुक्तांगणच्या सामाजिक कार्यासाठीही अवचट यांना २०१३ साली भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार लाभला. समाज व संस्कृती यांवर भाष्य करणारा लेखक अशीच अनिल अवचट यांची प्रतिमा , जी त्यांनी शेवटपर्यंत कायम ठेवली.

- प्रा. मंगला गोखले

 

 

संदर्भ
१. अवचट अनिल त्र्यंबक; ‘स्वतःविषयी’, मौज प्रकाशन गृह; मुंबई; १९९०.
२. अवचट अनिल त्र्यंबक; ‘आप्त’; मौज प्रकाशन गृह, मुंबई; १९९७.
३. अवचट अनिल त्र्यंबक; ‘छंदाविषयी’, मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई; २००१.
अवचट, अनिल त्र्यंबक