Skip to main content
x

बेंडाळे, गोपाळ दोधू

बेंडाळे अण्णासाहेब

गोपाळ दोधू उर्फ अण्णासाहेब बेंडाळे यांचा जन्म जळगाव जिल्ह्यातील सावद्यासारख्या एका छोट्याशा खेड्यात झाला. अण्णांचे वडील दोधू बेंडाळे व्यवसायाने शेतकरी होते. त्यावेळी त्यांच्या उपजत ज्ञानामुळे व बहुश्रुतपणामुळे गावाच्या कारभारातदेखील त्यांचा सल्ला घेतला जायचा. त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटलेले होते. अण्णांच्या शिक्षणात त्यांनी लक्ष घातले.

सावद्याच्या प्राथमिक शिक्षणानंतर जळगावच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माध्यमिक शिक्षण झाले. १९३६ मध्ये ते मॅट्रिकच्या परीक्षेत खानदेशात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. जमखेडी संस्थानची १४ रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली व विल्सन महाविद्यालयात जाण्याची संधी मिळाली. त्यानंतर ते एम. बी.बी.एस. आणि एम. एस. झाले.

एक कुशल शल्यचिकित्सक म्हणून अण्णा खानदेशच्या परिसरात प्रसिद्ध झाले. रूग्णाच्या रोगाचे अचूक निदान करण्यात आणि त्यावर सुयोग्य उपाययोजना करण्यात त्यांचा हातखंडा होता. १९५१ मध्ये त्यांनी क्ष-किरण यंत्र आणले. सुरुवातीला हाताला हातमोजे न घालता, क्ष-किरण पट्टीका केल्या त्यामुळे त्यांच्या दोन्ही हातांची बोटे भाजली. त्याचा परिणाम काही बोटे काढावी लागली. त्यामुळे शल्याचिकित्सा करताना त्रास होऊ लागला. तरी त्यांची वैद्यकीय क्षेत्रात प्रगतीच झाली.

जळगाव येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करावे अशी त्यांची तीव्र इच्छा होती. त्यांनी एक चिकित्सा केंद्र सुरू केले. एक अचूक निदान करणारा सिद्धहस्त शल्यचिकित्सक म्हणून नावलौकिक प्राप्त केला. खानदेशातूनच नव्हे तर खानदेश बाहेरचे रुग्ण ही त्यांच्याकडे  येत. त्यावेळी आजच्यासारखे वेगवेगळे तज्ञ नव्हते. सर्व प्रकारच्या केसेस हाताळाव्या लागत. ५० ते ६० खाटांचे रुग्णालय ही झाले. दोन प्रथितयश शिक्षण संस्थांचे अध्यक्ष घेऊनही तांत्रिक अडचणीमुळे वैद्यकीय महाविद्यालयाचे अण्णांचे स्वप्न पुरे होऊ शकले नाही. अण्णांचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे योगासन, योगसाधना. ते नियमाने योगासने करीत. अण्णांना पोहण्याची आवड होती. पोहण्याचा व्यायाम एक उत्तम व्यायाम ही त्यांची धारणा होती. त्यासाठी जळगावला हिंदुस्तान सिल्क मिल समोर एक मोठा प्लॉट घेऊन त्यांनी मोठा तलाव बांधला. तो सर्वांना उपयोगात येत आहे.

अण्णांची शिक्षणप्रेमी म्हणून खरी ओळख झाली ती खानदेश कॉलेज एज्युकेशन सोसायटीचे १९५५ पासून अध्यक्ष झाल्यापासून. १९४५ मध्ये या सोसायटीची स्थापना झाली. के जी टू पी जीही संकल्पना साकार झाली. कला, वाणिज्य, विज्ञान, सामाजिक शास्त्रे, शिक्षणशास्त्र, शारीरिक शिक्षण, व्यवस्थापन, अभियांत्रिकी, विधी या सर्व विद्याशाखांची महाविद्यालये सुरू झाली.

एम्. जे. महाविद्यालय जळगाव ही खानदेशातील विद्यानगरी. महाराष्ट्रातल्या नावाजलेल्या महाविद्यालयांपैकी एक महाविद्यालय नॅक, बंगळुरू तर्फे या महाविद्यालयाला श्रेणी मिळाली व यू.जी.सी. ने एक्सलंस अ‍ॅवॉर्डम्हणून ६० लाख रुपयांचे अनुदान दिले.

अण्णांनी उत्तम शिक्षक लाभावेत म्हणून बी. एड., डी. एड. महाविद्यालय काढले. शिक्षणातील संशोधनही मोठ्या प्रमाणात सुरू झाले. तसेच विधी महाविद्यालय, व्यवस्थापन महाविद्यालय व अभियांत्रिकी महाविद्यालय काढले.

एज्युकेशनल युनियन या खास स्त्रीशिक्षणाला प्राधान्य देणार्‍या संस्थेचे अध्यक्ष म्हणून १९५२ पासून पद स्वीकारले. पहिल्यांदा सुरू झाले फकिरा हरी सेवा बोर्डिंग हाऊस हे मुलींचे वसतिगृह. बालविकास मंदिर, श्रीमती शांताबाई खडके प्राथमिक विद्यामंदिर, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय विविध कला विभाग, प्रेरणा महिला मंडळ या शाखा सुरू केल्या. मुलांसाठी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सुरू झाले.

अण्णांच्या सन्मानार्थ डॉ. बेंडाळे कला, वाणिज्य, विज्ञान महिला महाविद्यालय हे नामकरण करण्यात आले. जळगावला उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ व्हावे ही अण्णांची इच्छा १५ ऑगस्ट १९९० रोजी पूर्ण झाली. कुलगुरु डॉ. एन. के. ठाकरेंच्या समवेत असलेल्या पहिल्या कार्यकारिणी परिषदेत अण्णांचा समावेश झाला. विद्यापीठाच्या आर्थिक निर्णयांमध्ये अण्णांचा मौलिक वाटा होता. 

मितभाषी असलेले अण्णा स्पष्टवक्ते होते. महाविद्यालयांच्या स्थानिक चौकशी समिती च्या वेळी संस्थाचालकांना अटीसंबंधी स्पष्टपणे सांगताना महाविद्यालयांच्या भौतिक सुविधा, प्राध्यापक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, प्रयोगशाळा उपकरणे, ग्रंथालय, क्रीडांगण यांत सुव्यवस्थापन असावे असे त्यांचे स्पष्टमत होते.

केंद्रीय प्रवेश प्रक्रिया असावी या मताचे ते असल्यामुळे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात बी.एड. प्रवेश केंद्रीय पद्धतीने सुरू झाले.         

- म. ल. नानकर

बेंडाळे, गोपाळ दोधू