Skip to main content
x

बिनीवाले, शंकर गोपाळ

शंकर गोपाळ ऊर्फ अप्पासाहेब बिनीवाले यांचा जन्म पुण्यातील सरदार बिनीवाले यांच्या घराण्यात झाला. ते  केवळ चौदा वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे शालेय शिक्षण मध्येच थांबले आणि ते पिढीजात सराफी दुकानावर बसू लागले. पण त्यांचे मन मात्र दुकानात रमत नव्हते. वडिलांनी आणलेले एक व्हायोलिन त्यांच्या घरात होते. ते कसे स्वरात लावायचे हे शंकर यांनी एच.व्ही. मेहेंदळ्यांच्या दुकानात जाऊन विचारले. नंतर त्यांनी हळूहळू त्यावर स्वर वाजवायला सुरुवात केली. आधी एका गाण्याची एक ओळ वाजवली, मग हळूहळू सबंध गाणे बसवले. अशा प्रकारे अनेक गाणी बसवली.

प्रख्यात व्हायोलिनवादक गजाननराव जोशी यांचा एके ठिकाणी कार्यक्रम होता. तेव्हा शंकरचे मोठे बंधू त्यांना कार्यक्रमाला घेऊन गेले. कार्यक्रम झाल्यावर गजाननरावांशी त्यांनी शंकरची ओळख करून दिली. गजाननरावांच्या सांगण्यावरून शंकरने व्हायोलिनवर एक गाणे वाजवले. गजाननराव जोशी यांनी त्यांस व्हायोलिनवादन शिकवण्याचे मान्य केले.

अशा तऱ्हेने त्यांचे शिक्षण सुरू झाले. दोन-चार महिने झाल्यावर आपला वर्ग शंकरवर सोपवून गजाननराव औंध संस्थानात गेले. नंतर त्यांनी शंकरला औंधला बोलावून घेतले. पाचसहा महिने औंधला राहून शंकर पुण्याला परत आले. नंतर ते काही स्वतंत्र कार्यक्रमांमध्ये व्हायोलिन वादनाची साथ करू लागले. मग त्यांना काही मूकपटांच्या संगीताचे काम मिळाले. प्रभात कंपनीच्या ‘अयोध्येचा राजा’ या चित्रपटाचे प्रसिद्ध संगीत दिग्दर्शक गोविंदराव टेंबे यांनी चित्रपटाच्या पार्श्वसंगीतात व्हायोलिन वादनाकरिता त्यांना बोलावून घेतले.  

पाश्चात्त्य संगीताचा अभ्यास करायला आपण परदेशी जावे असे त्यांच्या मनात आले. त्यांनी ‘कॉन्टे रोस्सो’ या बोटीने परदेशी प्रस्थान केले. त्यांना बोटीवर फेरेदेन्ने मरिआनो नावाचे इटालियन गृहस्थ भेटले. तेही व्हायोलिनवादक होेते. त्यांनी शंकररावांना पाश्चात्त्य संगीत शिकवायचे व त्या बदल्यात शंकररावांनी त्यांना भारतीय संगीत शिकवायचे असे त्यांच्यात ठरले. पाचसहा महिने शंकरराव इटलीत राहिले. इटलीत असताना इटलीचे शासक मुसोलिनी यांना व्हायोलिन ऐकवण्याची संधी शंकररावांना मिळाली. हा मान मिळालेले ते पहिले आणि एकमेव भारतीय होते.

पुढे शंकरराव इंग्लंडला गेल्यावर त्यांचे अनेक थिएटरांमध्ये कार्यक्रम झाले. ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनच्या प्रसारण सेवेवरही शंकररावांचा व्हायोलिनवादनाचा कार्यक्रम झाला. असा मान मिळालेले ते पहिलेच भारतीय होत.

वर्षभराने ते भारतात परत आले. त्यानंतर ‘श्यामसुंदर’, ‘अयोध्येचा राजा’, ‘सत्यवान सावित्री’ अशा अनेक चित्रपटांसाठी त्यांनी व्हायोलिन वाजवले, तसेच ‘राधामाई’, ‘कुलवधू’ या नाटकांमधून व्हायोलिनवादन केले. त्यानंतर मुंबईत एका रेकॉर्डिंग कंपनीत आणि आकाशवाणीवर ते काम करत होते.

१९४२ साली ते पुण्याला आले. शांता आपटे, पंडितराव नगरकर, सुलोचना पालकर, शाहू मोडक, पु.ल. देशपांडे, ज्योत्स्ना भोळे इत्यादी अनेकांना त्यांनी व्हायोलिन वादनाची साथ केली. त्याच सुमारास त्यांनी अनेक स्वतंत्र वादनाचे कार्यक्रमही केेले. नंतर ते पं. विनायकबुवा पटवर्धन यांच्याबरोबर नेपाळला साथ करण्यासाठी गेले होते.

गजानन खेर, व्हायोलिना उमराणीकर, रमाकांत परांजपे हे त्यांचे शिष्य पुढे नावारूपाला आले. शंकररावांचे पुणे येथे निधन झाले.

व्हायोलिना उमराणीकर

बिनीवाले, शंकर गोपाळ