Skip to main content
x

बर्न्स, विल्यम

      विल्यम बर्न्स हे वनस्पतिशास्त्राचे प्राध्यापक होते. त्यांचे ऑक्टोबर १९०८मध्ये पुण्यातील कृषी महाविद्यालयात आगमन झाले. ते १९०८पासून १९१२पर्यंत महाविद्यालयाचे पहिले प्राचार्य डॉ.हॅरॉल्ड एच.मॅन यांच्यासोबत त्यांच्याच बंगल्यात राहत होते. ते १९२२पासून १९३३पर्यंत म्हणजे डॉ.मॅन यांच्याप्रमाणेच दीर्घकाळ कृषी महाविद्यालयाच्या प्राचार्य पदावर होते. त्यांनी दीर्घकाळ मुंबई सरकारचे आर्थिक वनस्पतिशास्त्रज्ञ (इकॉनॉमिक बॉटनिस्ट) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यांनी कृषी महाविद्यालयात रोप-पैदाशीचा कार्यक्रम प्रभावीपणे राबवला आणि बऱ्याच रोप-पैदासकारांना प्रशिक्षण दिले.

      विल्यम बर्न्स यांच्या बऱ्याच विद्यार्थ्यांनी कोट्टूर, प्रयाग इत्यादींनी रोप-पैदासकार म्हणून यशस्वीपणे कार्य केले. बरेच विद्यार्थी त्या काळात वेगाने विकसित होणाऱ्या साखर उद्योगातही दाखल झाले. काहींनी स्वतःचा दुग्ध व्यवसाय सुरू केला. काही रासायनिक उद्योगातही शिरले. डॉ. विल्यम बर्न्स यांनी तत्परतेने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमुळे कृषी महाविद्यालयाला महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशभरात मानाचे स्थान प्राप्त झाले. नंतरच्या काळात त्यांनी भारत सरकारचे कृषी-आयुक्त म्हणूनही जबाबदारी सांभाळली होती. ते निवृत्त होईपर्यंत याच पदावर कार्यरत होते.

- संपादित

बर्न्स, विल्यम