भागवत, सखाराम जगन्नाथ
आचार्य सखाराम जगन्नाथ भागवत यांचा जन्म महाड येथे झाला. १९२० साली मॅट्रिक झाल्यावर उच्च शिक्षणासाठी त्यांनी मुंबईच्या विल्सन महाविद्यालयामध्ये प्रवेश घेतला. महात्माजींची असहकाराची हाक आल्याबरोबर १९२१मध्ये महाविद्यालयाला रामराम ठोकून त्यांनी राष्ट्रीय चळवळीत उडी घेतली. तेथपासून १९४७च्या १५ ऑगस्टला स्वातंत्र्य प्राप्त होईपर्यंत त्यांच्या जीवनात राजकीय चळवळीला पहिले स्थान होते, व अन्य सार्या गोष्टी दुय्यम होत्या.
१९२७ साली पुण्याला लोकमान्य टिळक विद्यापीठात अध्यापन करत असताना आचार्य शं.द. जावडेकर यांच्याशी आचार्य भागवतांचा स्नेह जुळला. या दोघांनी महाराष्ट्रभर महात्माजींच्या विचारांचा प्रसार करण्याचे व्रत घेतले. प्रखर बुद्धिमत्ता असूनही ध्येयवादाच्या ऊर्मीपोटी त्यांना उच्च शिक्षणाचा लाभ घेता आला नाही. मान्य विद्यापीठाची पदवी त्यांना मिळाली नाही. खरी पण ज्ञानाची लालसा व अध्यापनातील कौशल्य या त्यांच्या गुणांमुळे ‘आचार्य’ हे बिरुद त्यांना प्राप्त झाले. मनात नसताना त्यांना विवाहबंधनात पडावे लागले. दुर्दैवाने पत्नीचे निधन झाले. ऐन पस्तिशीत क्षयरोगाने शरीरात ठाण मांडले. निरामय आरोग्य त्यांना कधी लाभले नाही. असे असूनही त्यांची रसिकता व उत्साह सतत अबाधित राहिला. मनाने संन्यस्तमय वृत्तीने चैतन्याने रसरसलेले असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते.
आचार्य जावडेकरांच्या ‘आधुनिक भारत’ या विचारप्रवर्तक ग्रंथाला प्रस्तावना लिहिणार्या आचार्यांनी साने गुरुजींच्या ‘पत्री’ काव्यसंग्रहालाही मौलिक प्रस्तावना लिहिली. ‘नवभारत’ आणि ‘ग्रमीण शिक्षण’ मासिकांच्या संपादक मंडळात ते होते. कोल्हापुरात ‘मौनी विद्यापीठ’च्या स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. साने गुरुजींच्या निधनानंतर ‘आंतरभारती’चे काम त्यांनी पुढे नेले.
अश्लील कविता लिहिल्याबद्दल १९५१मध्ये मर्ढेकरांवर खटला झाला, तेव्हा आचार्य भागवतांनी न्यायालयात महत्त्वाची साक्ष दिली. मर्ढेकरांची निर्दोष मुक्तता झाली. याचे बरेचसे श्रेय आचार्यांच्या साक्षीला आहे. त्यांनी मंगेश पाडगावकरांच्या ‘धारानृत्य’ या पहिल्या काव्यसंग्रहाला लिहिलेल्या प्रस्तावनेत त्यांची सौंदर्यदृष्टी व रसिकता याचे हृद्य दर्शन घडते.
आचार्यांनी मोजके लेखन केले, त्या लेखनात सखोल, मूलगामी विचारांचे दर्शन होते. ‘चौफुला’ (१९४४), ‘जीवनशिक्षण’ (१९४५), ‘जीवन व साहित्य’ (१९४४), ‘जीवन चिंतन’ (१९५८) या पुस्तकांव्यतिरिक्त त्यांनी असंख्य लेख लिहिले आणि महत्त्वाच्या अनेक विषयांवर विस्तृत भाषणे केली.
लोकमान्य टिळकांच्या निष्काम कर्मयोग सिद्धान्ताचा वेध घेणारे, महात्मा गांधींच्या तत्त्वविचाराचे मूलग्रही विश्लेषण करणारे, महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनाचा परामर्श घेणारे त्यांचे लेख ‘आचार्य भागवत : संकलित वाङ्मय’ ग्रंथाच्या दोन खंडांत प्रसिद्ध झाले आहेत. शिक्षणासंबंधी मूलभूत विचार मांडणारे, आर्थिक विषमता निर्मूलनावर भर देणारे, साहित्याबाबत व्यापक जीवनवादी भूमिका घेणारे लेख या खंडांत समाविष्ट झालेले आहेत. ज्ञानाच्या क्षेत्राविषयीचे जागते प्रेम आणि समाजाविषयी असणारा उत्कट जिव्हाळा या दोहोंचे विलोभनीय मिश्रण आचार्यांच्या व्यक्तिमत्त्वात झालेले होते.
— डॉ. सुभाष भेंडे