Skip to main content
x

भागवत, श्रीधर केशव

भागवत गुरुजी, स्वामी भागवत

     श्रीधर केशव भागवत यांचा जन्म चिपळूण येथील एका मध्यम परिस्थितीत वावरणाऱ्या कुटुंबात झाला. सर्व शिक्षणच मुळी मराठी सातवीपर्यंत. त्यापुढे शिक्षण घेणे हे त्या काळी बऱ्याच कुटुंबांना शक्य नसे. त्यामुळे सातवी उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी चिपळूणलाच प्राथमिक शिक्षकाची नोकरी पत्करली. त्यांनी शिक्षकी पेशा स्वीकारला. त्या वेळी देशभर स्वदेश-स्वधर्म-स्वसंस्कृती व स्वराज्य यांसारख्या विचारांचा समाजावर फार खोलवर परिणाम झाला होता. वर्गखोलीच्या चार भिंतीच्या मर्यादेत केवळ पुस्तकी शिक्षण देऊन विद्यार्थ्यांना कारकुनी पेशा देणारे शिक्षण हे त्यांना कधीच रुचले नाही. देशप्रेमाने व देशभक्तीने भारलेले व शरीराने सुदढ असे विद्यार्थीच देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याच्या कामी उपयोगी पडतील, असे विद्यार्थी आपण घडविले पाहिजेत हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी आपणही या विषयात पारंगत झाले पाहिजे हे मनाशी पक्के केले. त्या काळी पुणे येथे महाराष्ट्र मंडळात कॅप्टन शि. वा. दामले असे शिक्षण देत असत. प्रत्येक दिवाळीच्या व उन्हाळी सुट्टीत ते पुण्याला जाऊन, मल्लखांब, डबलबार, सिंगलबार, वेत्रचर्म, खङ्ग यांचे प्रशिक्षण घेत असत व आल्यावर ते सर्व विद्यार्थ्यांना देत असत. चार भिंतीतून शाळा मैदानावर आली. अनेक विद्यार्थी लाठीकाठी, लेझीम, योगासने, सूर्यनमस्कार यांचा उत्तम सराव करू लागले. त्यांच्या या उपक्रमांमुळे, परिसरातील सर्व खेड्यांत त्यांचा उल्लेख “लाठीकाठी” भागवत असा होऊ लागला.

     चिपळूण हे अगदी छोटेसे गाव असूनही ‘सतत प्रगतिशील’ असा लौकिक असल्यामुळे याच काळात नागपूर येथील डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी रा. स्व. संघाचे काम रुजविण्यासाठी ही चांगली भूमी आहे हे हेरले. कोकणातीलच एक विद्यार्थी  माधवराव मुळे यांना संघकार्यासाठी चिपळूण येथे पाठवले. त्यांचा भागवत यांच्याशी परिचय झाला व भागवत गुरुजींचे लाठीकाठी वर्गाचे रूपांतर १९३४ मध्ये संघ शाखेमध्ये झाले. पत्की कुटुंबाने दिलेल्या जागेतील  इमारतीच्या तळमजल्यावर हिंदू विद्यार्थी वसतिगृह व पहिल्या मजल्यावर संघ कार्यालय सुरू झाले.

      ही इमारत तशी खूपच जुनी होती. दरवर्षी दुरुस्तीसाठी खूपच खर्च येई. त्यामुळे तिची नवीन उभारणी करण्याची जबाबदारी भागवत गुरुजींवर सोपवली गेली. १९४५ मध्ये लोकसहाय्यातून एक नवे कार्यालय उभे राहिले. श्री. के. भागवत यांनी शेजारीच एक इमारत उभी केली व तिला ‘समर्थ व्यायामशाळा’ असे नाव दिले. तेथे वर्षभर मल्लखांब, सिंगलबार व डबलबार याचे प्रशिक्षण दिले जाई. काही काळ येथे कुस्तीचा हौदा सुद्धा होता. समर्थांच्या शिकवणुकीचा भागवत गुरुजींवर एवढा परिणाम झालेला होता की त्यांच्या तोंडी “श्रीराम जयराम जयजयराम” हे नाम भिनले ते अखेरपर्यंत राहिले. त्यांचा तेरा कोटीहून अधिक रामनामाचा जप झाला होता. आजही त्यांच्या कुटुंबियांनी ते व्रत पुढे चालवले आहे.

      त्यांची दृष्टी एवढी दूरदर्शी होती की याच काळात त्यांनी प्रौढ शिक्षणाचे वर्गही सुरू केले. चिपळूणच्या नगरपरिषदेमध्ये जे झाडूवाले व सफाई कामगार होते ते अशिक्षित होते. त्यांना साक्षर करणे गरजेचे आहे हे ओळखून त्यांनी याच काळामध्ये या लोकांच्या वसाहतीत रात्री जायचे व त्यांना साक्षर करण्याचे व्रत घेतले.

      रात्री प्रौढ शिक्षणाचे वर्ग चालायचे व सकाळी लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात सूर्यनमस्काराचे वर्ग चालायचे. सूर्यनमस्कार घालणाऱ्या मुलांना आकर्षण व प्रोत्साहन म्हणून ते खारका देत असत. त्या खारकांच्या आठवणी सांगणारे व ‘आम्हाला त्यामुळे उत्तम आरोग्य लाभले आहे’ असे सांगणारे विद्यार्थी आजही भेटतात.

      महात्मा गांधींनी त्याच दरम्यान प्रत्येक भारतीयाला हिंदी आलेच पाहिजे, असा आग्रह धरला होता.

त्याला अनुसरून गुरुजींनी स्वत: हिंदीच्या परीक्षा दिल्या व प्राथमिक शाळेतील शिक्षकांनाही ते हिंदी शिकवत असत. नंतर त्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांनाही हिंदी शिकवण्यास सुरुवात केली. मधल्या सुट्टीनंतर ते शहरातील इतर शाळांमध्येही विद्यार्थ्यांना खास हिंदी शिकविण्यासाठी जात असत. याच काळात त्यांनी उर्दू भाषेचाही अभ्यास केला.

      स्त्रियाही या समाजाचा एक महत्त्वाचा घटक आहेत. पुरुषांइतक्याच त्या प्रगत असाव्यात यासाठी स्त्रियांसाठी पोहणे, सायकल चालविणे, घोड्यावर बसणे यासारखे उपक्रम त्यांनी राबवले. त्या काळी कर्मठ वृत्तीचे लोक फार असत. काळाची पावले ओळखून भावी काळात काय करावे लागेल याची जाणीव त्यांना नसे. सनातनी प्रवृत्तीचा पगडा समाजावर फार होता. अशा वेळी स्वा. सावरकर यांची मते सहजासहजी पचनी पडणारी नव्हती. सावरकरांनी त्या वेळी सहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला होता. समाज संघटनासाठी त्याची आवश्यकता कशी आहे याची खात्री झाल्यामुळे  गुरुजींनी आपल्या धाकट्या बंधू समवेत (रघुनाथ केशव भागवत) या सहभोजनाच्या कार्यक्रमात स्वत: भाग घेऊन तो यशस्वी केला होता. या त्यांच्या कृतीचा परिणामही त्यांना सहन करावा लागला होता. ते पागेवर (चिपळूणची एक पेठ) राहात होते. तेथील ब्रह्मवृंदाने एक खास सभा बोलावून या दोन्ही भागवत बंधूंवर बहिष्कार घातल्याचा ठराव मंजूर करून घेतला. कालांतराने लोकांच्या लक्षात आपली चूक आली आणि पुढे सर्व सुरळीत झाले.

      त्या वेळी रा. स्व. संघाचा गणवेश खाकी शर्ट, खाकी अर्धी चड्डी, बूट, वगैरे होता. हा सर्व स्वखर्चानेच करावा लागतो. आपल्याला हे कसे परवडणार म्हणून त्यांनी त्या वेळेपासून आपला नेहमीचा वेष बदलला तो अखेरपर्यंत. ते कायमच खाकी शर्ट घालू लागले. तेव्हापासून “लाठीकाठी भागवतांचे” नामांतर होऊन ते ‘खाकी भागवत’ या नावानेच ओळखले जाऊ लागले.

      पुढे त्यांनी इतर सामाजिक कार्यांना सुरुवात केली. गावामधले लक्ष्मीनारायणाचे मंदिर (जेथे पूर्वी ते सूर्यनमस्काराचे वर्ग घेत) जीर्ण झाले होते. त्याचा जीर्णोद्धार करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले. हे देऊळ ब्राह्मण समाजाचे होतेे. म्हणून प्रत्येक ब्राह्मण कुटुंबाने महिना चार आणे वर्गणी द्यावी व त्यातून ते बांधावे असे ठरले. घरोघरी जाऊन हे पैसे गोळा करण्याचे काम त्यांनी केले. एखादा सधन जर वर्षाचे एकदम तीन रुपये घ्या म्हणाला तर ते स्वीकारत नसत.‘प्रत्येक महिन्याला तुमच्याशी संपर्क राहिला पाहिजे. मी दरमहा ४ आणेच घेऊन जाईन’ असे सांंगत. चिपळूणमधील काही ब्राह्मण कुटुंबे मुंबई-पुण्यात राहत असत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांच्याकडूनही वर्गणी गोळा करून लक्ष्मीनारायण मंदिराचे बांधकाम पार पडले. याच कालावधीत ते ‘पाग’ भागात सायंकाळी मल्लखांब शिकवणे व भगवद्गीतेचे अध्याय शिकवण्याचे काम करत. मल्लखांबामध्ये तरबेज असलेल्या त्यांच्या विद्यार्थ्यांना छत्रपती पुरस्कारही मिळालेला आहे आणि ते विद्यार्थीसुद्धा अद्याप मल्लखांब शिकविण्याचे कार्य करत आहेत.

     याच दरम्यान त्यांनी चिपळूण येथे ‘ब्राह्मण साहाय्यक संघ’ स्थापन करून तो नावारूपाला आणला. गरजू ब्राह्मण विद्यार्थ्यांना दरवर्षी पुस्तके, फी, गणवेश यासाठी मदत करणे, ब्राह्मण बटूंचे व्रतबंध संस्कार करणे आदी कार्ये त्या संघाद्वारे आजही चालतात.

      चिपळूणमधील ‘वाणीआळी’ मध्ये एक राममंदिर आहे. त्याचेही नूतनीकरण करण्याची जेव्हा गरज भासली तेव्हा वाणी समाजाने हे काम त्यांच्यावर सोपवले व तेही त्यांनी यशस्वीरीत्या पार पाडले.

      श्रीधर केशव भागवत आता भागवत गुरुजी म्हणून ओळखले जाऊ लागले होते.

       त्यांनी चालू केलेले शारीरिक शिक्षणाचे कार्य अद्यापही चालू आहे. श्रीमती सुमतीबाई जांभेकर यांनी त्यांच्या नावे स्वतंत्र व्यायामशाळा सुरू करून ते कार्य अद्याप चालू ठेवले आहे. चिपळूण येथील युनायटेड न्यू इंग्लिश स्कूल मध्ये ‘ श्री. के. भागवत गुरुजी व्यायामशाळा’ ही एक सर्व साहित्याने सुसज्ज अशी व्यायामशाळा चालू आहे.

       १९८२ पासून भागवत गुरुजी यांची पुण्यतिथी प्रतिवर्षी साजरी केली जाते व त्यांचे स्मृत्यर्थ सूर्यनमस्काराच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात. मल्लखांब, दोरीचा मल्लखांब यांची प्रात्यक्षिके सादर करून त्यांच्या स्मृतीला यथोचित अभिवादन केले जाते.

       - एन. सी भागवत

भागवत, श्रीधर केशव