Skip to main content
x

भांडारे, लक्ष्मीकांत सदानंद

         लक्ष्मीकांत सदानंद तथा भाचूभाई भांडारे हे मुंबईतील सुखवस्तू सारस्वत कुटुंबात जन्मले. त्यांचे वास्तव्य झावबाच्या वाडीत होते व भाचूभाईंनी आपल्या अवघ्या बत्तीस वर्षांच्या अल्पायुषी कारकिर्दीत एक हौशी पायपेटी वादक म्हणून पुष्कळ नाव मिळवले होते.

          त्या काळात पायपेटी हे वाद्य सर्वसामान्य घरांत पोहोचले नव्हते, त्यामुळे काही मोजक्याच सधन घरांत पायपेटी असे व त्याचा एक फॅशन म्हणूनही वापर होई. अशा परिस्थितीत भाचूभाई यांनी पायपेटी वादन सुरू केले. रूढ अर्थाने त्यांनी संगीताचे शिक्षण घेतल्याचा उल्लेख आढळत नाही. ठाकूरद्वारचे शेणव्यांचे राममंदिर हे भांडारे कुटुंंबाच्या मालकीचे होते व कीर्तनकार ह.भ.प. विनायकबुवा ठाकूरदास यांची तेथे कीर्तने होत. त्यांच्या कीर्तनांची साथ करत भाचूभाईंनी वादनकला साध्य केली.

           त्यांना वादनाची देणगी व उपजत सौंदर्यदृष्टी होती. त्यांच्या वादनात नाजूकपणा, गोडवा होता; सर्व थरांतील लोकांना आकर्षून घेईल असे त्यांचे वादन होते. साधारणत: ‘पांढरी दोन’ या स्वरपट्टीत ते एकलवादन करत. यमन वा भूपासारख्या प्रचलित रागांतील गत दहा-पंधरा मिनिटे वाजवून खमाज, पिलू यांसारख्या धुनरागांतील ठुमरी वा धून वाजवावी, एखादी नाचाची वा बॅण्डची धून, मग एखादे रंजक, विनोदी असे उर्दू वा कर्नाटकी पद आधी गायचे व तसेच वाजवून दाखवायचे असा त्यांच्या मैफलीचा थाट असे.

          त्यांची साधनसामग्री मर्यादित होती, वाजवण्यात मजकुराचा विस्तार फारसा नसे; पण त्यांनी जे काही वाजवले, त्यात लोकांना खुश करण्याची तरकीब होती. तत्कालीन मुंबईतील कलाकार व रसिकांचे ते आवडते वादक होते. त्यांचा लौकिक महाराष्ट्रभर पसरला होता.

         अनेक हौशी नाटक मंडळींच्या ‘बलसिंह-तारा नाटक’सारख्या नाटकांची पदे बसवणे, चाली बांधणे यांसाठी भाचूभाई उत्साहाने सांगीतिक साहाय्य देत असत. ‘शाहू क्रिकेट क्लब’ने ‘रत्नपाल-शशिकला’ या नाटकाची पदे बसवण्यासाठी पाचारण केले असता, कोल्हापूर येथे रावबहादूर शिरगावकर यांच्याकडे त्यांचा दीड-दोन महिने मुक्काम होता.

           या काळात गोविंदराव टेंबे यांना भाचूभाईंचा सहवास मिळाला, त्यांचे वादन जवळून ऐकायला, पाहायला मिळाले. त्यामुळे गोविंदराव भाचूभाईंना वादनातले गुरू मानत असत. भाचूभाईंच्या वादनापासून प्रेरणा घेऊनच पुढे गोविंदराव टेंबे यांनी हार्मोनियमचे एकलवादन सुरू केले व त्याचा प्रभाव पूर्ण महाराष्ट्रावर दीर्घकाळ पडला.

            — चैतन्य कुंटे

भांडारे, लक्ष्मीकांत सदानंद