Skip to main content
x

भांडारकर, रामकृष्ण गोपाळ

       भारतीय संस्कृतीवर पाश्चात्त्यांचा प्रभाव पडू लागल्याच्या संक्रमणकाळात, आपल्या देशाच्या इतिहासाला नवे वळण देण्याचे काम करणारे रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म मालवण येथे सारस्वत ब्राह्मण घराण्यात झाला. त्यांच्या घराण्याला मालवणमध्ये जकात गोळा करण्याचे अधिकार मिळाले होते. वडिलांच्या बदलीच्या नोकरीमुळे सर्वच कुटुंबास फिरावे लागे, परंतु त्यामुळेच रामकृष्णांना उच्च शिक्षणाच्या चांगल्या संधीही प्राप्त झाल्या. इ.स. १८४७मध्ये इंग्रजी शिक्षणास सुरुवात करून, इ.स. १८५४मध्ये ते मुंबईच्या एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटच्या माध्यमिक शाळाविभागातून पहिल्या वर्गात उत्तीर्ण झाले. इंग्रजी, इतिहास, तत्त्वज्ञान आणि गणित हे त्यांचे अत्यंत आवडते विषय होते. या अभ्यासाचा त्यांना प्राचीन भारतीय विद्याशाखांच्या चिकित्सक व तुलनात्मक अभ्यासासाठी अतिशय उपयोग झाला.

     डॉ. रा.गो. भांडारकर यांच्या जीवनचरित्राचे चार स्पष्ट भाग दिसतात. १) शिक्षणतज्ज्ञ, २) प्राच्यविद्याविशारद, ३) समाजसुधारक आणि ४) धर्मसुधारक. या प्रत्येक भागात त्यांचे कार्य महनीय आहे.

शिक्षणतज्ज्ञ -

     इ.स. १८५८मध्ये एलफिन्स्टन महाविद्यालयातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले आणि नंतर प्राचार्यांचे साहाय्यक म्हणून व एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये अध्यापक म्हणून काम केले. लगेच पुढच्याच वर्षी त्यांना विशेष प्रतिष्ठेची दक्षिणा फेलोशिप मिळाली. विद्याभ्यासासाठी अशी फेलोशिप मिळवणारे भांडारकर हेच पहिले अभ्यासक होय. या साडेपाच वर्षांच्या काळात त्यांनी संस्कृतचा सखोल अभ्यास केला. एवढेच नव्हे, तर त्यांनी संस्कृत व्याकरणावर आपले पहिले पुस्तकही लिहिले. या अभ्यासात त्यांनी एवढे प्रावीण्य मिळविले की, इ.स. १८६४मध्ये डॉ. ह्यूूग यांच्या रजेच्या काळात त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक म्हणून काम पाहिले. त्यांची या विषयातील गती पाहून डॉ. हॉवर्ड यांनी त्यांना असे स्पष्ट सांगितले की, ‘आपल्यासारख्या संस्कृतच्या गाढ्या विद्वानाने शासकीय नोकरीच्या भानगडीत पडू नये, शिक्षणखाते हेच तुमचे योग्य स्थान आहे.’ इ.स. १८६५मध्ये ते रत्नागिरीच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक झाले. इतके महत्त्वाचे पद मिळवणारे भांडारकर हे पहिलेच भारतीय होत. त्यांच्या येथील कारर्किदीमध्ये शालान्त परीक्षेचा निर्णय १००टक्के लागला आणि याच शाळेचे विद्यार्थी सन्मानाची जगन्नाथ शंकरशेट संस्कृत शिष्यवृत्ती मिळवू लागले. याच काळात त्यांनी संस्कृत व्याकरणावरील दुसरे पुस्तक लिहिले. ही दोन पुस्तके पुढे संस्कृतच्या अभ्यासाची मानदंड ठरली.

     शिक्षणक्षेत्रात अतिशय मोलाची कामगिरी करत ते क्रमाने मुंबई विद्यापीठाचे परीक्षक, फेलो व सभासद, कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष आणि उपकुलगुरू झाले. भारतीय असल्यामुळे ते कुलपती होऊ शकले नाहीत, परंतु महर्षी कर्वे यांच्या महिला विद्यापीठाचे कुलपती मात्र झाले. त्यांच्यामुळेच आधुनिक संस्कृत पंडितांची संलग्नता मुंबई विद्यापीठाशी झाली आणि त्यामुळेच विद्यापीठालासुद्धा अखिल भारतीय दर्जा प्राप्त झाला. ही त्यांची फार मोठी देणगी आहे. अभ्यासक्रमामध्ये नवनवीन विषयांचा समावेश करण्यासाठी त्यांनी खूप मेहनत केली. संस्कृत, लॅटिन, इतिहास यांसारख्या विषयांचा विद्यापीठीय अभ्यासक्रमामध्ये समावेश होणे, हे त्यांच्या परिश्रमाचे फळ आहे. याशिवाय हंटर शिक्षण समितीला उपयुक्त शिफारसी करणे, स्त्री-शिक्षणाला उत्तेजन देणे, विद्यार्थ्यांसाठी नीतिबोधपर पुस्तके लिहिणे किंवा तशी शिफारस करणे अशी अनेक शिक्षणविषयक कामे त्यांनी केली आहेत.

     शिक्षणविषयक अतिशय मूलभूत विचार हे भांडारकरांचे मोठेच योगदान आहे. अचूक दृष्टिकोन तयार होण्यासाठी मार्गदर्शन करणे ही त्यांच्या मते शिक्षणाची व्याख्या आहे. सदसद्विवेकबुद्धीने किंवा नैतिक निर्णयशक्तीने क्रियांना प्रेरणा मिळणे, हे शिक्षणाचे ध्येय असले पाहिजे असे त्यांचे मत होते. शिवाय आपल्यामधील उणिवांची जाणीव असणे खर्‍या प्रगतीसाठी आवश्यक आहे, असे त्यांना वाटे. शिक्षणाने होणारा मानसिक प्रवृत्तीचा विकास आणि भावनांमधील नैतिक सुसंगती यांमुळे देशाची निश्चित प्रगती होईल, असा त्यांना विश्वास होता. सत्य व न्याय यांवर आधारित शिक्षण हेच समाजातील रूढींना व चालीरितींना वळण लावते आणि देशाच्या विकासाला मदत करते, यावर त्यांचा दृढ विश्वास होता. अशा रितीने केवळ वैयक्तिक शिक्षणापुरते आपले विचार मर्यादित न ठेवता त्यांनी संपूर्ण समाजासाठी शिक्षणाचा उपयोग कसा होईल, याचा विचार केला त्यामुळे त्यांची गणना थोर शिक्षणतज्ज्ञांमध्ये होते.

प्राच्यविद्याविशारद -

     वास्तविक प्राचीन भारताची अनेक विद्याशाखांच्या अभ्यासाची थोर परंपरा होती. तथापि काळाच्या ओघात त्यांच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ लागले होते. परंतु पाश्चात्य विचारांचा भारतात शिरकाव झाल्यापासून अभिजात विद्यांकडे पाहण्याची नवीन दृष्टी तयार झाली आणि डॉ. भांडारकरांनी तिचा मोकळेपणाने स्वीकार करून प्राच्यविद्यांच्या अभ्यासाची एक नवीन पद्धत निर्माण केली. सर विल्यम जोन्स, हेन्री थॉमस कुक, कोलब्रुक आणि जेम्स प्रिन्सेप या युरोपीय विद्वानांनी भारताचा इतिहास, प्राचीनत्व, कला, साहित्य व शास्त्र यांचा शोध घेण्याची मोहीमच सुरू केली होती. त्यांच्या हातात हात मिळवून आघाडीच्या भारतीय विद्वानांनीसुद्धा या दिशेने काम करण्यास सुरुवात केली. डॉ. भांडारकरांना विल्सन, कीथ, मॅक्डोनल, फर्गसन या व अशासारख्या विद्वानांबरोबर चर्चा व काम करण्याची संधी मिळाल्यामुळे त्यांची दृष्टी आणि कार्यक्षेत्र व्यापक झाले. मॅक्सम्यूलरने या क्षेत्रातील भारतीयांच्या प्रगतीविषयी काढलेले उद्गार फार बोलके आहेत. ते म्हणतात, ‘युरोपीय प्राध्यापकांकडून शिक्षण मिळालेली नव्या व अतिशय होतकरू अशा संस्कृत अभ्यासकांची एक पिढी उदयास येत आहे आणि ते आमच्या विद्वानांपुढे अधिक भक्कम प्रतिस्पर्धी म्हणून उभे राहतील.’ ‘प्राध्यापक भांडारकर, शंकर पांडुरंग पंडित यांनी मुंबईत प्रकाशित केलेल्या संस्कृत पाठ्यपुस्तकाच्या आवृत्त्या युरोपीय विद्वानांच्या उत्तमोत्तम पुस्तकांच्या बरोबरीने सहज बसू शकतील.’ याचा उघड अर्थ असा आहे की, भांडारकर करत असलेले काम व त्यांची लेखनपद्धती पाश्चात्य संशोधकांच्याही पसंतीस उतरली होती.

     पौर्वात्य विद्यांच्या संदर्भात प्राध्यापक भांडारकर यांनी पाच प्रकारची कामगिरी केली आहे. भारतीय इतिहासाचा सखोल अभ्यास, धर्म आणि तत्त्वज्ञान यांविषयी मूलभूत संशोधन, संस्कृत पाठ्यपुस्तकांचे चिकित्सक संपादन, भाषाशास्त्र आणि व्याकरणाच्या क्षेत्रात विशेष अभ्यास आणि इतरांच्या ग्रंथांचे अचूक परीक्षण ही ती कामगिरी होय.

     भारताचा पहिला इतिहासकार म्हणून डॉ. रा. गो. भांडारकर यांचेच नाव घेतले जाते. दख्खनचा प्राचीन इतिहास (‘अर्ली हिस्ट्री ऑफ दि डेक्कन’) आणि प्राचीन भारतीय इतिहास - एक दृष्टिक्षेप (‘अ पीप इन टु अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया’) या त्यांच्या दोन पुस्तकांनी इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत मोलाची भर घातली आहे. पहिल्या पुस्तकात आर्यांच्या वसाहत काळापासून ते १३१८मधील हिंदू राजवटीच्या अंतापर्यंतचा दक्षिणेचा इतिहास प्रथमच लिहिला गेला आहे. दुसर्‍या पुस्तकात बौद्ध धर्माच्या उदयापासून ते गुप्त राजवटीत घडलेल्या ब्राह्मण धर्माच्या पुनरुज्जीवनापर्यंतच्या प्राचीन भारतीय इतिहासाचा संपूर्ण मागोवा घेतला गेला आहे. याखेरीज विविध विषयांवर त्यांचे अनेक लेख प्रकाशित झाले आहेत. ‘वेदज इन् इंडिया’ हा इंडियन अँटिक्वरीतील लेख आणि ‘नासिक केव्ह इन्स्क्रिप्शन्स’ हा लंडन येथील प्राच्यविद्यापरिषदेत सादर केलेला लेख हे त्यांचे विशेष गाजलेले लेख. शिवाय चिकित्सक, तुलनात्मक व ऐतिहासिक संशोधनपद्धती या त्यांच्या लेखाने ऐतिहासिक संशोधनास एक वेगळीच दिशा प्राप्त करून दिली आहे. त्यांनी मांडलेली संशोधनाची तत्त्वे अशी - इतिहासकार नि:पक्षपाती असला पाहिजे. त्याने न्यायाधीशाच्या पद्धतीने पुराव्यांचा अवलंब केला पाहिजे. त्याच्या मनात पूर्वग्रह असू नये, तसेच संशोधन करत असताना आपल्या देशाचा मोठेपणा सांगणे हा हेतू असू नये. वस्तुनिष्ठ सत्यदर्शन हे एकमेव उद्दिष्ट त्यासमोर असले पाहिजे. पुराव्यांची विश्वसनीयता आणि आपल्या विधानांची संभाव्यता त्याने पारखून घ्यायला हवी.

     यावरून हे स्पष्ट होते की, भांडारकरांनी इतिहास संशोधनाचा अत्यंत मूलगामी विचार केला होता. आपल्या देशाच्या संस्कृतीवरील बाह्य प्रभाव नाकारणे आणि आपल्या इतिहासातील घटना अतिप्राचीन मानणे या भारतीय विद्वानांच्या प्रवृत्तीवर त्यांनी टीका केली तसेच आपल्या संस्कृतीवर ग्रीक, रोमन आणि ख्रिश्चन लोकांचा अधिक प्रभाव दाखवणे आणि वस्तुत: प्राचीन असलेल्या भारतीय घटना व साहित्य हेतुत: आधुनिक ठरवणे या पाश्चत्य प्रवृत्तीवरही त्यांनी कडाडून टीका केली. सातवाहन राजांच्या पुराणातील नामावली चिकित्सकपणे हाताळून शिलालेख, नाणी व इतर पुरावे यांच्या आधारे एक निश्चित कालनिर्णय करण्यात भांडारकरांना यश आले. त्यांच्या इतिहासविषयक विचारात दैवी हस्तक्षेप किंवा कल्पना यांना अजिबात प्रवेश नव्हता.

     प्राच्यविद्यांच्या क्षेत्रातील आणखी एक महत्त्वाची कामगिरी म्हणजे संस्कृत पाठ्यपुस्तकांच्या चिकित्सक आवृत्त्या. त्यातील सर्वांत उल्लेखनीय म्हणजे मालतीमाधवाची आवृत्ती. याशिवाय विद्याधराची एकावली आणि मल्लिनाथाची त्यावरील टीका, बल्लालसेनाचे अद्भुतसागर, जल्हणाचे सूक्तिमुक्तावली व सोमेश्वराचे सुरतोत्सव यांचाही निर्देश करावयास हवा. ते इतर विद्वानांनी लिहिलेल्या पुस्तकांचेही सुजाण व निर्भय टीकाकार होते. मार्टिन हॉगचे ऐतरेय ब्राह्मण, गोल्डस्ट्यूकरचे पाणिनि व व्हिसेंट स्मिथचे अर्ली हिस्ट्री ऑफ इंडिया या पुस्तकांच्या परीक्षणांवरून ही गोष्ट स्पष्ट होते. युरोपमध्येही डॉ. भांडारकरांचे लेखन अधिकृत म्हणून उद्धृत केले जात होते आणि त्यांचा शब्द अखेरचा मानला जात असे. प्रा. कीलहॉर्न यांनी म्हटले आहे की, ‘आधुनिक काळात भारतात जन्माला आलेल्या सर्वश्रेष्ठ संस्कृतपंडितांपैकी ते एक होत.’

समाजसुधारक -

     पाश्चात्य विद्वानांच्या सान्निध्यात राहिल्यामुळे भांडारकरांची विचारधाराही परंपरेपेक्षा अधिक विवेकी आणि चिकित्सक बनली होती. भारतीय आचारपद्धतीतील दोष दूर करून हिंदू समाजाच्या परिस्थितीत सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रथम येथील समाजव्यवस्थेचा सखोल अभ्यास करून त्यांनी खूप प्रयत्न केले. दि सोशल हिस्ट्री ऑफ इंडिया हा लेख म्हणजे या दिशेने टाकलेले पहिले पाऊल होय. वास्तविक जातीय निर्बंध भारताबाहेरील अनेक देशांमध्येही होते परंतु भारतात त्यांना दृढ होण्यास अनुकूल भूमी मिळाली. पश्चिमेत उत्कट राजकीयत्वाच्या व राष्ट्रीयत्वाच्या भावनेची वाढ जातीय बंधने शिथिल करण्यास कारणीभूत झाली परंतु भारतात मात्र या भावनांच्या अभावामुळे ही बंधने अधिकच दृढ झाली, असे त्यांचे मत होते. परमहंससभा या संस्थेचे सभासदत्व स्वीकारून त्यांनी समाजसेवेसाठी पुष्कळ प्रयत्न केले. अंतर्गत जातिव्यवस्थेबरोबरच हिंदू-मुस्लिम-धर्मकलह दूर करण्याचासुद्धा त्यांनी कसून प्रयत्न केला. भारतीय स्त्रियांवर लादलेल्या अन्याय्य दु:खाविरोधात त्यांनी आवाज उठवला होता. पुरुषांना मिळणार्‍या अनेक विवाहविषयक सवलती आणि त्याचविषयी स्त्रियांवर घातलेल्या निर्बंधांमुळे स्त्रियांचे होणारे शारीरिक व मानसिक नुकसान यामुळे वास्तविक संपूर्ण समाजाचेच नुकसान होत असते, हे पटवून देण्याचा त्यांनी परोपरीने यत्न केला. बालस्त्रीहत्येची चाल, बहुपतित्व आणि बहुपत्नीत्व या सामाजिक दोषांचाही त्यांनी निषेध केला. देशाच्या सांस्कृतिक आणि धार्मिक विकासात स्त्रियांचे योगदान मोठे असते, हे त्यांनी इतिहासाचे दाखले देऊन सिद्ध करून दाखवले होते. या विषयावर त्यांचे लोकमान्य टिळकांशी मतभेदही झाले पण ते आपल्या मतावर ठाम राहिले. आपल्या लोकांचे बळ कमी करणार्‍या आणि त्यांच्या शक्तीला व सामर्थ्याला पुरेसा वाव न देणार्‍या दुष्ट रूढींचे निर्मूलन करणे, हे सामाजिक चळवळीचे मुख्य उद्दिष्ट आहे असे त्यांचे मत होते. याखेरीज शेतकर्‍यांचे दारिद्य्र व सावकारी पाश यांच्या विचाराने त्यांचे मन खिन्न होई आणि ते त्यावर उपाय शोधत. अशा थोर विचारांमुळेच त्यांची गणना राजा राममोहन रॉय, ईश्वरचंद्र विद्यासागर इत्यादींबरोबर होऊ लागली.

     आपल्या सखोल विद्वत्तेने, धार्मिक आणि सामाजिक सुधारकी वृत्तीने आणि सत्यावरील अतूट निष्ठेने डॉ. रा. गो. भांडारकर यांनी महर्षी ही पदवी प्राप्त केली आहे. भांडारकरांच्या मर्त्य अवशेषांवर एक स्तूप उभारला गेल्याची माहिती मिळते. परंतु पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूट हे त्यांच्या संशोधनाचे आणि प्राच्यविद्यांच्या अभ्यासासाठी केलेल्या अथक परिश्रमांचे प्रतीक आहे.

डॉ. उमा वैद्य

भांडारकर, रामकृष्ण गोपाळ