Skip to main content
x

भातखंडे, विष्णू नारायण

भारताच्या इतिहासात एकोणिसाव्या शतकाचा उत्तरार्ध हा नवजागृतीचा, अत्यंत उज्ज्वल असा एक कालखंड मानला जातो. साधारणत: १८५० ते १९०० या अर्धशतकाच्या कालावधीत भारताच्या क्षितिजावर राष्ट्रकार्याला जीवन अर्पण करणाऱ्या अनेक स्वार्थत्यागी व्यक्तींचा उदय झाला. नवे विचार, नवे ध्येयवाद आणि नवे वैज्ञानिक दृष्टीकोन यांच्यामुळे सुशिक्षित वर्गाच्या मनात नव्या जाणिवा निर्माण होत होत्या, तेव्हा अशा या सर्वांगीण वैचारिक मंथनापासून संगीतकलेचे क्षेत्र अलिप्त राहणे शक्य नव्हते. त्या काळाची परिस्थिती लक्षात घेता, संगीतक्षेत्रातील आपली पूर्वकालीन प्रगती व प्रतिष्ठा पुन्हा साध्य करणे आवश्यक झाले होते. आणि म्हणून नवे विचार व जाणिवा, त्याचप्रमाणे जागृती व सुधारणा यांच्याद्वारे स्थित्यंतर घडवून आणणे अपरिहार्य झाले होते. ईश्वरकृपेने हे महान व अवघड कार्य पार पाडण्यासाठी या भूतलावर दोन विष्णूंनी (पं. विष्णू नारायण भातखंडे व पं. विष्णू दिगंबर पलुसकर) जन्म घेतला आणि संगीतोद्धाराच्याच कार्याला जीवनसर्वस्व वाहून घेतले.

पं. विष्णू नारायण भातखंडे यांचा जन्म शके १७८२ च्या श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभदिनी, अर्थात इ.स. १८६० च्या शुक्रवार, दि. १० ऑगस्ट रोजी सकाळी साडेआठ वाजता बाणगंगा, वाळकेश्वर येथे झाला. त्यांचे वडील श्री.नारायणराव भातखंडे हे मुंबईतील एका मोठ्या मालमत्तेचे वहिवाटदार व हिशेब तपासनीस होते. त्यांना तीन पुत्र व दोन कन्या अशी पाच अपत्ये झाली. थोरले चिरंजीव अप्पाजी हे मुंबई प्रांताच्या पोलीस खात्यात अधिकारी होते. दुसर्‍याचे नाव गजानन असे होते; परंतु ते विष्णू या नावाने ओळखले जात.

भातखंडे कुटुंब कोकणातील नागाव या खेड्यातून मुंबईस आले होते. येथील समुद्रकिनार्‍यालगत असलेल्या ‘मलबार हिल’ नावाच्या टेकडीच्या पायथ्याशी, वालुकेश्वर नावाने प्रसिद्ध असलेल्या पवित्र देवस्थानी ते राहत असत. कुटुंबाचे कुलदैवत दत्तात्रेय असल्यामुळे नारायणरावांच्या घरी छोटेसे दत्तमंदिर होते. 

लहानग्या विष्णूमध्ये संगीताचे बीज बाल्यावस्थेपासून उत्कटतेने रुजले होते व लहानपणी सुस्वर कंठाने बालगीते व कविता गाऊन त्याने शाळेत बक्षिसेही मिळवली. पुढे त्यास बासरी वाजविण्याचा नाद लागला. वाळकेश्वरच्या वस्तीत तेथील रहिवासी धार्मिक उत्सव साजरे करीत. अशा उत्सवांतील कार्यक्रमांत लहानसा विष्णू आपले गायन व बासरीवादन करीत असे.

त्यांचे शालेय शिक्षण घरापासून पाच-सहा मैल दूर, परळनजीक एल्फिन्स्टन हायस्कूलमध्ये झाले. पुढे १८८० मध्ये त्यांनी एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला व १८८५ मध्ये ते बी.ए.ची परीक्षा आणि १८८७ मध्ये एल.एल.बी.ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

कॉलेजमध्ये असताना त्यांना सतार वाजविण्याचा छंद लागला. वाळकेश्वर येथे राहणार्‍या एका अंध सतार व बीनवादनकार वल्लभदास दामुलजी यांच्याकडे त्यांनी सतारवादनाचे शिक्षण घेतले. घरी आई-वडिलांचा विरोध असणार हे ओळखून त्यांच्या नकळत, रात्री उशिरा विष्णू वल्लभदासांकडे तालमीला जात असत. कॉलेजचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्यांनी सतारवादनात बरीच प्रगती केली होती व बर्‍याच लहान, खाजगी बैठकांत विष्णू सतारवादन करीत असत.

१८८७ ते १८८९ या दोन वर्षांत त्यांनी कराची येथे वकिली केली. वकिलीच्या व्यवसायात ‘क्रिमिनल लॉ’ व ‘अ‍ॅक्ट ऑफ एव्हिडन्स’ ही त्यांची विशेषता होती. त्यानंतर १८८९ ते १९१० पर्यंत त्यांनी मुंबईत वकिली चालविली व त्याचबरोबर ते कायदे-शिक्षणाचे वर्गही घेत असत. उलटतपासणीत त्यांचा हातखंडा होता व प्रत्येक खटला ते हमखास जिंकत असत. त्यांनी एव्हिडन्स अ‍ॅक्टची कलमे श्लोकबद्ध रचून वर्गात शिकविली. त्यामुळे विद्यार्थी ती कलमे व पोटकलमे चटकन तोंडपाठ करू शकत.

मुंबईतील पारशी लोकांनी स्थापन करून चालविलेल्या ‘गायन-उत्तेजक मंडळी’ नामक संस्थेत इ.स. १८८४ मध्ये त्यांनी प्रवेश मिळवला. या मंडळात शिकवणारे एक गायक रावजीबुवा बेलबागकर यांच्याकडून भातखंडे यांनी जवळजवळ ३०० धृपदांची तालीम घेऊन ती कंठस्थ केली. याच मंडळात नोकरी करीत असलेले उस्ताद अली हुसेनखाँ व त्यांचे मामा विलायत हुसेनखाँ यांच्याकडून त्यांनी अदमासे १५० ख्यालांची तालीम घेतली व त्या सर्व बंदिशी स्वरबद्ध करून ठेवल्या.

१८९० पर्यंत त्यांनी गायन-उत्तेजक मंडळीत शिक्षण घेतले. इ.स. १८९० ते १९०५ या काळात त्यांनी जर्मन, ग्रीक, इंग्रजी, संस्कृत, हिंदी, तेलुगू, बंगाली आणि गुजराती भाषांमधील उपलब्ध प्राचीन व अर्वाचीन संगीत विषयक साहित्याचा संग्रह करून मनन व पठण केले. १८९६ मध्ये त्यांनी पश्चिम भारत यात्रा केली आणि सुरत, भडोच, बडोदा, नवसारी, अहमदाबाद, राजकोट, भावनगर इ. प्रमुख शहरांतील ग्रंथसंग्रहालयांना भेटी देऊन महत्त्वाची ऐतिहासिक माहिती मिळवली.

१९०० मध्ये धर्मपत्नी श्रीमती मधूबाई आणि  १९०३ मध्ये त्यांची कन्या सीताबाई यांचे निधन झाले. त्यामुळे प्रापंचिक जबाबदारीतून मुक्त होऊन विरक्ती निर्माण झाली. याच काळात भातखंडे यांनी जयपूर घराण्याचे प्रसिद्ध गायक उ.आशिक अलीखाँ व उ. महम्मद अलीखाँ यांच्याकडून गीतांचा संग्रह करण्यास आरंभ केला. त्यांनी भारतीय संगीतातील साहित्याचा  अभ्यास व संकलन करण्याच्या उद्देशाने देशव्यापी भ्रमण करण्याची योजना केली.

१९०४ मध्ये त्यांनी दक्षिण भारत यात्रा केली. त्या यात्रेत त्यांनी अनेक शहरांतील ग्रंथालयांना भेटी दिल्या व ग्रंंथसंग्रह केले. अनेक विद्वानांशी चर्चा केली व दक्षिणोत्तर संगीतपद्धतींच्या एकात्मतेचे सूत्र, थाट-मेल, तज्जन्य रागवर्गीकरणाच्या उपयुक्ततेबद्दल आपले विचार मांडले. या यात्रेत त्यांनी ‘चतुर्दण्डिप्रकाशिका’ नावाच्या ग्रंथाचा निर्माता पं.व्यंकटमखी यांचे वंशज सुब्राम दीक्षितार यांची भेट घेऊन उपयुक्त माहिती मिळवली व ‘चतुर्दण्डिप्रकाशिका’ची हस्तलिखित प्रत मिळवली. त्याचबरोबर ग्रंथालयातून पं.रामामात्य लिखित ‘स्वरमेलकलानिधि’, ‘संगीत सारामृत’ व ‘रागलक्षण’ या ग्रंथाच्या नकला करवून घेतल्या. मुंबईस परत आल्यावर त्यांनी ते सर्व ग्रंथ छापून घेऊन प्रसिद्ध केले.

१९०६ व १९०७ मध्ये त्यांनी पूर्व भारताची यात्रा केली. या यात्रेत पं.भातखंडे यांनी नागपूर, कलकत्ता, जगन्नाथपुरी इ. प्रमुख शहरांतील ग्रंथालयांना भेटी दिल्या आणि उपयुक्त सांगीतिक साहित्याचा संग्रह केला. विशेष म्हणजे या यात्रेत पं.काशिनाथ ऊर्फ अप्पा तुलसी आणि राजा सर सौरेंद्रमोहन टागोर यांच्याबरोबर विस्तृतपणे विचारांचे आदान-प्रदान केले. १९०८ मध्ये त्यांनी उत्तर भारतात भ्रमण करून अनेक महत्त्वाच्या ग्रंथसंग्रहालयांना भेटी दिल्या. विशेेष करून बिकानेर येथील प्रसिद्ध अनुप ग्रंथसंग्रहालयामधून पुष्कळ महत्त्वाचे साहित्य संग्रहित केले आणि अलाहाबाद येथील पं.श्रीकृष्ण जोशी यांच्या मदतीने लोचन पंडितांच्या ‘रागतरंगिणी’ या ग्रंथाची एक प्रत मिळवली.

इ.स. १८९६ ते १९०८ दरम्यान भारताचे सर्व दौरे संपविल्यावर संग्रहित केलेले प्राचीन व अर्वाचीन ग्रंथ, महत्त्वाचे हस्तलिखित साहित्य, प्रवासांची दैनंदिन तारीखवार हकिकत, त्याचप्रमाणे अनेक कलाकार व संगीतज्ञांशी केलेली विस्तृत चर्चा या सर्वांचे त्यांनी सूक्ष्म अध्ययन करण्यास सुरुवात केली. त्यातून काही प्रश्न उद्भवले. प्राचीन ग्रम-मूर्च्छना, जाति-राग- पद्धतीशी पुढील काळातल्या राग-रागिणी व मेल-रागपद्धतीचा काही मेळ जमतो का हे शोधून काढण्याचा त्यांनी खूप प्रयत्न केला. संपूर्ण भारतात या शंकांचे समाधान करणारा कोणीही विद्वान त्यांना आढळला नाही.

आपल्या सर्व मुद्यांबाबत एक विस्तृत प्रश्नपत्रिका ते आपल्याजवळ नित्य बाळगीत असत व दौर्‍यावर असताना भेटलेल्या गायक-वादकांशी व शास्त्री-पंडितांशी त्याविषयी चर्चा करीत असत. शारंगदेव लिखित ‘संगीत रत्नाकर’ या ग्रंथापूर्वी व नंतरच्या काळातील प्रचलित संगीतपद्धतींचा परस्पर मेळ बसविणे अशक्य आहे अशी पक्की खात्री झाल्यावर त्यांनी नवीन संगीतशास्त्र लिहिण्यास सुरुवात केली.

१९०९ मध्ये त्यांनी ‘श्रीमल्लक्ष्यसंगीतम्’ नावाचा श्लोकबद्ध ग्रंथ संस्कृत भाषेत लिहिण्यास आरंभ केला व १९१० मध्ये तो प्रकाशित केला. पुढे त्याचीच टीका म्हणून ‘हिन्दुस्थानी संगीत-पद्धती’ भाग १ ते ४ हे मराठी भाषेत लिहिले व प्रकाशित केले. या ग्रंथांत हिंदुस्थानी संगीताचे मूळ सिद्धान्त परंपरागत घराणेदार चिजांच्या आधारावर मांडले आहेत. कल्याण, बिलावल, खमाज वगैरे दहा थाटांच्या रागांचे नियम व विस्तारपूर्वक वर्णन, प्रत्येक रागाच्या पूर्वपीठिकेसहित, प्राचीन ग्रंथांतील त्या-त्या रागांची वर्णने व ते राग कालानुसार बदलत जाऊन आपापल्या प्रचलित स्वरूपांपर्यंत कसकसे पोहोचले इत्यादी माहिती व त्याचे आजचे स्वरूप, शेवटी थोडक्यात रागविस्तारासह दिले आहे.

 १९१० मध्ये त्यांनी वकिलीचा पेशा सोडून दिला व उर्वरित सर्व जीवन संगीत सेवेसाठी अर्पण केले. १९११ मध्ये आपले शिष्य श्रीकृष्ण नारायण रातंजनकर यांना त्यांनी प्रत्यक्ष तालीम देण्यास आरंभ केला.

१९११ मध्ये रतनसी लीलाधर व वाडीलाल शिवराम यांच्या मदतीने भातखंडे यांनी ‘संगीत रत्नाकर’ व ‘संगीत दर्पण’ या ग्रंथांच्या स्वराध्यायांच्या मूळ पाठासहित गुजरातीमध्ये भाषांतर करून प्रकाशित केले. याच वर्षात स्वत: रचलेली सर्व रागांतील लक्षणगीते त्यांनी प्रकाशित करण्यास सुरुवात केली. याच काळात त्यांनी स्वरचित ‘अष्टोत्तरशतताललक्षणम्’ या शीर्षकांतर्गत तालशास्त्रावर संस्कृत भाषेत एक पुस्तिका प्रकाशित केली, तसेच अप्पाशास्त्री तुलसी रचित ‘रागकल्पद्रुमांकुर’ या ग्रंथाचे प्रकाशनही केले.

१९१२ साली त्यांनी उत्तर भारतीय संगीतावर आधारित पुण्डरीक विठ्ठल लिखित ‘सद्राग-चंद्रोदय’ या ग्रंथाचे प्रकाशन केले. पुढे १९१३ मध्ये त्यांनी ‘हिन्दुस्थानी संगीतपद्धतीचे भाष्य’ या ग्रंथाचे लेखन व प्रकाशन केले. १९१४ मध्ये त्यांनी अप्पा तुलसी लिखित ‘अभिनव-ताल-मंजिरी’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. त्याबरोबर ‘रागलक्षणम्’, पुण्डरीक विठ्ठल लिखित ‘रागमाला’ तथा ‘रागमंजिरी’ या ग्रंथांचे प्रकाशन केले. त्याशिवाय सर्व लोकप्रिय रागांत तालबद्ध स्वररचना अथवा सरगमींची ‘स्वरमालिका’ या नावाने एक छोटी पुस्तिकाही प्रसिद्ध केली. त्यात सुमारे १०० स्वररचना आहेत.

सुमारे १९१५ मध्ये बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी विष्णू भातखंडे यांची प्रथम भेट झाली. या भेटीत संगीताच्या शिक्षणाबद्दलची प्रगती होण्यासाठी चर्चा झाली. संगीतातील पारंपरिक गुरु-शिष्य पद्धतीच्या तत्त्वानुसार विद्यालयीन शिक्षण योजना आखण्यासाठी व त्याकरिता पाठ्यपुस्तकांची आवश्यक निर्मिती करणे आणि मुख्यत: घराण्या-घराण्यांतील रागरागिण्यांचे नियम, चिजांचे पाठ यांतील मतभेद मिटवण्यासाठी भारतातील सर्व घराणेदार गायक-वादक व संगीत शास्त्रज्ञांना एकत्र बोलावून चर्चा करणे यासाठी अखिल भारतीय संगीत परिषदेचे आयोजन करण्याची आवश्यकता पं. भातखंडे यांनी सयाजीरावांना पटवून दिली. १९१६ च्या मार्च महिन्यात, होळीच्या दिवसांत पहिली अखिल भारतीय संगीत परिषद भरविण्याचे संपूर्ण श्रेय पं.भातखंडे यांना देण्यात आले.

१९१७ मध्ये भातखंडे यांच्या मातु:श्री बालूबाई यांचे निधन झाले. या वर्षात गायन-उत्तेजक मंडळींच्या नव्या व्यवस्थापकांशी काही मतभेद झाल्यामुळे पंडितजींनी राजीनामा दिला आणि ‘गुड लाइफ लिग’ नावाच्या पारशी लोकांच्याच दुसर्‍या एका संस्थेच्या जागेत, फ्लोरा फाउण्टनजवळ ‘शारदा संगीत मंडळ’ नावाने स्वतंत्र मंडळ स्थापन केले व गायनाचे वर्ग चालविण्यास सुरुवात केली. यात वाडीलालजी त्यांना साहाय्य करू लागले. याच वर्षात ग्वाल्हेर नरेश माधवराव शिंदे यांच्याशी पंडितजींची ओळख व ऐतिहासिक भेट झाली. पुढे १९१८ मध्ये ग्वाल्हेर येथे पं. भातखंडे यांनी माधव संगीत महाविद्यालयाची स्थापना केली. शहराच्या मध्यभागी गोरखी नावाच्या इमारतीत हे विद्यालय सुरू झाले.

१९१८ च्या डिसेंबर महिन्यात दिल्ली येथील दुसर्‍या अखिल भारतीय संगीत परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्या परिषदेचे अध्यक्ष स्वत: रामपूरचे नवाब हमीद अली खाँसाहेब होते. या परिषदेत रामपूर परंपरेतील बंदिशींच्या आधारावर रागांच्या स्वरूपांवर खुली चर्चा झाली. याच कालावधीत ‘हृदयकौतुक’, ‘हृदयप्रकाश’, ‘राग-तरंगिणी’, ‘रागतत्त्वविबोध’, ‘सुगम रागमाला’, ‘चतुर्दण्डिप्रकाशिका’ इत्यादी ग्रंथांचे प्रकाशन पंडितजींनी केले.

 मध्यंतरी बडोद्याच्या गायनशाळेची पुनर्रचना पं. भातखंडे यांच्या नेतृत्वाने झाली होती. १९२० मध्ये बडोदा व ग्वाल्हेरच्या विद्यालयांकरिता पाठ्यक्रमाचे निर्धारण व पाठ्यपुस्तकांची व्यवस्था करण्यात आली. यानंतर १९१९ च्या नोव्हेंबर महिन्यात बनारस येथे तृतीय अखिल भारतीय संगीत परिषदेचे आयोजन झाले. १९२४ व १९२५ मध्ये क्रमश: चौथ्या व पाचव्या (अखेरच्या) अखिल भारतीय संगीत परिषदांचे आयोजन लखनौ येथे पं. भातखंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडले.

अखेरच्या संगीत परिषदेचा मुख्य उद्देश लखनौ येथे संगीताचे शिक्षण देणारी संस्था स्थापण्याबाबत ठराव पास करून घेणे हा होता व तो सर्वानुमते पास झाला. या ऐतिहासिक परिषदेत त्या वेळचे शिक्षणमंत्री राय राजेश्वर बली यांनी त्या वेळचे उत्तर प्रदेशचे गव्हर्नरसाहेब सर विल्यम मॉरिस यांच्याशी संपर्क साधून त्यांना त्या परिषदेचे अध्यक्ष होण्याची विनंती केली आणि त्यांनी ती आनंदाने मान्य केली. त्यानंतर दि. १६ सप्टेंबर १९२६ रोजी गव्हर्नर साहेबांच्या उपस्थितीत ‘मॉरिस कॉलेज ऑफ हिन्दुस्थानी म्युझिक’ या नावाने कैसरबाग बारादरीमध्ये गायनवर्ग सुरू झाले.

त्या सुमारास पं. भातखंडे यांनी आपल्या जीवनातील बहुतेक कार्य संपविले होते. १९३० साली त्यांनी ‘हिंदुस्थानी संगीत पद्धती’चा चौथा भाग लिहून पूर्ण केला व १९३२ मध्ये प्रसिद्ध केला. मॉरिस कॉलेजमधून त्यांनी ‘संगीत’ या नावाचे एक त्रैमासिक १९३० साली प्रसिद्ध करण्यास सुरुवात केली. पं. भातखंडे स्वत: या मासिकात संगीतावर लेख लिहीत असत. पंधराव्या, सोळाव्या, सतराव्या व अठराव्या शतकांतील काही प्रमुख संगीत पद्धतींचे तुलनात्मक विवरण त्यांनी हप्त्याहप्त्याने या त्रैमासिकात प्रसिद्ध केले. पुढे १९४० नंतर ते सर्व लेख पुस्तकरूपात प्रसिद्ध झाले.

लखनौच्या मॉरिस महाविद्यालयातून कित्येक नामवंत व गुणसंपन्न पदवीधर बाहेर पडले असून ते इतर संगीत संस्थांमध्ये व अखिल भारतीय नभोवाणीमध्ये मोठ्या हुद्द्यांवर कार्य करीत आहेत. आपल्या उतारवयात पं. भातखंडे यांनी १९३३ मध्ये मॉरिस महाविद्यालयाला अखेरची भेट दिली. त्यांचे मुंबईत १९ सप्टेंबर १९३६ रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी पक्षाघाताच्या आजाराने देहावसान झाले.

एक संशोधक व ग्रंथकार या रूपांत त्यांची कामगिरी प्रचंड आहे. भरत नाट्यशास्त्रापासून एकोणिसाव्या शतकापर्यंतच्या सर्व संकलित ग्रंथांचे परिशीलन करून त्यांनी मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषांतून जवळजवळ ३००० पृष्ठांचे संगीत साहित्य निर्माण करून भावी पिढ्यांसाठी ज्ञानदानाची कायमची सोय करून ठेवली आहे. त्यांनी वर्तमान प्रचलित संगीताला पोषक अशा ज्या नवीन शास्त्राची मुळापासून उभारणी केली, त्याचा प्रचार-प्रसार करण्यासाठी प्रत्यक्ष गायन व शास्त्र यांचा समन्वय साधून संगीताची नवीन शिक्षणपद्धती तयार केली व त्यासाठी सुसूत्र असा अभ्यासक्रम आखला, पाठ्यपुस्तकेही तयार केली.

निरनिराळ्या घराण्यांच्या सुमारे २००० चिजा पं. भातखंडे यांनी शिकून घेतल्या व त्या क्रमिक पुस्तक मालिका भाग १ ते ६ मध्ये स्वरलिप्यांसहित छापून प्रकाशित केल्या. त्याव्यतिरिक्त त्यांत सर्व रागांचे वर्णन, राग-नियम आणि स्वर-विस्तारही दिले आहेत. त्यांनी प्रत्येक रागात स्वरमालिका व लक्षणगीते लिहिली. ‘चतुर’ व ‘हररंग’ या टोपणनावांनी त्यांनी एकूण ४०० बंदिशी रचल्या आहेत. या सर्व रचनांचा समावेश क्रमिक पुस्तक-मालिकांमध्ये झाला आहे. पं. भातखंडे यांनी पद्मभूषण पं. श्री.ना. रातंजनकर, पं. वाडीलाल शिवराम नायक, शंकरराव कर्नाड, सीताराम मोदी व खोरशेद मिनोचर होमजीसारखे शिष्य तयार केले. पं. विष्णू नारायण भातखंडे हे केवळ एक शास्त्रकार व ग्रंथकारच नव्हते, तर ते एक उच्च कोटीचे वाग्गेयकार, गायक व उत्तम गुरूही होते.

प्रा. यशवंत महाले

भातखंडे, विष्णू नारायण