Skip to main content
x

भावे, विनोबा नरहर

आचार्य विनोबा भावे

चार्य विनोबा भावे यांचे पूर्ण नाव विनायक नरहर भावे. महाराष्ट्राच्या कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात गागोेदे नावाचे छोटेसे खेडेगाव आहे. त्या गावातील एका चित्पावन ब्राह्यण कुटुंबात  गणेश चतुर्थीच्या दिवशी त्यांचा जन्म झाला. वडिलांचे नाव नरहर शंभुराव भावे आणि आईचे नाव रुक्मिणी. विनोबांचे आजोबा शंभुराव भावे अत्यंत धर्मशील, नित्य पूजा-अर्चा आणि विविध व्रते आचरणारे होते. त्यांची आई प्रेमळ, परोपकारी आणि संस्कार संपन्न होतीे. विनोबांवर लहानपणी त्यांची आई आणि आजोबा यांचे उत्तम संस्कार झाले.

 इंटरमिजिएटपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्यांची महात्मा गांधी यांच्याशी भेट झाली व ते साबरमती आश्रमात राहून तेथील सेवा-कार्यात रमले. १८९७ मध्ये गांधीजींची अनुमती घेऊन विनोबा एका वर्षासाठी आश्रमाबाहेर पडले. सातारा चिल्ह्यातील वाई येथे श्री नारायण शास्त्री मराठे यांच्याकडे त्यांनी उपनिषदे, ब्रह्यसूत्र शांकरभाष्य, मनुस्मृती, पातंजल योगदर्शन, याशिवाय प्राज्ञ पाठशाळेत न्याय, वैशेषिक, याज्ञवल्क्य स्मृती इत्यादी अभ्यास केला. हे करीत असतानाच गीता व ज्ञानेश्‍वरी यांचे वर्ग चालविले, विद्यार्थी मंडळ स्थापन करून एक वाचनालयही काढले. यानंतर महाराष्ट्राच्या चार—पाच जिल्ह्यांत ४०० मैलांची पदयात्रा केली. ठिक-ठिकाणी गीतेवर प्रवचने केली आणि वर्ष संपताच ते साबरमती आश्रमात परतले.

वर्धा येथे महिलाश्रमात काही काळ निवासाला असताना विनोबांनी त्यांच्या आईच्या इच्छेनुसार, ‘गीतेचे सुबोध, सर्वांना समजेल असे मराठी पुस्तक’ म्हणजेच ‘गीताई’ याचे लेखन केले.त्याचे प्रकाशन जून १९३२मध्ये झाले. पुढे १९३२ मध्येच धुळे येथील कारागृहात असताना जमनालाल बजाज यांच्या इच्छेनुसार विनोबांनी २१ फेब्रुवारी १९३२ ते ११ जून १९३२ या काळात गीतेवर प्रवचने दिली. ती सर्व प्रवचने साने गुरुजींनी लिहून काढली. त्यांचे ‘गीता—प्रवचने’ हे पुस्तक निघाले. या देशातील अनेक भाषांत पुस्तकाच्या भाषांतरित आवृत्त्या निघाल्या. ‘गीता — प्रवचने’ च्या सर्व भाषांतील आवृत्त्यांचा खप १५ लाखांच्यावर असून ‘गीताई’चा खप  १० लाखाच्या जवळपास आहे. ‘गीता—प्रवचने’ तर २१—२२ भाषांतून प्रसिद्ध झाले आहे. १९३८ मध्ये विनोबा वर्ध्यापासून १० किलोमीटर अंतरावरील पवनार गावाजवळून वाहणार्‍या धाम नदीच्या काठावरील जमनालालजींच्या लाल बंगल्यात हवा पालटासाठी आले आणि तेथेच त्यांनी ‘परंधाम’ आश्रमाची स्थापना केली.

१९४० मध्ये गांधीजींनी व्यक्तिगत सत्याग्रहातील पहिला सत्याग्रही म्हणून विनोबांची निवड केली. त्यानुसार विनोबांनी सत्याग्रह केला.

विनोबांनी आध्यात्मिक, रचनात्मक आणि शैक्षणिक या क्षेत्रांत सतत नव विचार आणि नवनवीन कर्मक्षेत्रे यांची पेरणी केली. त्यांच्या १३ वर्षांच्या पदयात्रेत त्यांनी देशात ७ ठिकाणी नवीन आश्रमांची स्थापना केली. १) समन्वय आश्रम, बोधगया २) ब्रह्यविद्या मंदिर, पवनार ३) प्रस्थान आश्रम, पठाणकोट ४) विश्‍वनीड आश्रम, बंगलोर ५) विर्सजन आश्रम, इंदूर ६) मैत्री आश्रम, उत्तर लखीमपूर ७) वल्लभ निकेतन, बंगलोर.

समाजातील शिक्षक आणि अन्य विचारवंत यांच्या ज्ञाननिष्ठा, विद्यार्थिनिष्ठा आणि समाजनिष्ठा वृद्धिंगत होऊन देशात धनशक्ती आणि शस्त्रशक्ती यांपेक्षा विचारशक्तीचा प्रभाव अधिक असावा, यासाठी त्यांनी आचार्यकुल ही संस्था काढली. पण तिला फारसा प्रतिसाद लाभला नाही.

विनोबांची ग्रंथसंपदा विपुल आहे. त्यातील काही प्रमुख आणि जास्तीत जास्त वाचक लाभलेले ग्रंथ असे सांगता येतील — गीताई, गीता—प्रवचने, उपनिषदांचा अभ्यास, ईशावास्यवृत्ती, मधुकर, अहिंसा की तलाश, तिसरी शक्ती, सर्वोदय विचार आणि स्वराज्य शास्त्र, नामदेवांची भजने, आत्मज्ञान आणि विज्ञान, स्थितप्रज्ञदर्शन, संतांचा प्रसाद, विष्णुसहस्त्रनाम, अध्यात्म तत्त्वसुधा, महाराष्ट्रीयांशी हितगुज, ज्ञानदेवांची भजने, तुकारामांची भजने, रामदासांची भजने, पांडुरंगाच्या चरणी, जपुजी, कुराणसार, सप्तशक्ती, साम्यसूत्रे, जीवनदृष्टी, सर्वोदयाचे आधार इत्यादी ग्रंथ आणि त्यांच्या प्रवचनांचे १३ खंड, ‘विनोबा सन्निधी’चे खंड. असे त्यांचे विपुल विचारधन आहे.

  —दि.भा. घुमरे

भावे, विनोबा नरहर