Skip to main content
x

भिडे, विद्याधर वामन

     विद्याधर वामन भिडे यांचे पाच इयत्तांपर्यंतचे प्राथमिक शिक्षण हुबळी, धारवाड या ठिकाणी झाले. १८७८मध्ये ते मॅट्रिक झाले. १८८३मध्ये ते बी.ए. झाले. सरकारी शाळा खात्यात नोकरी करून १९१२मध्ये ते निवृत्त झाले.

     काव्य, व्याकरण, साहित्यशास्त्र इत्यादींचा त्यांचा व्यासंग मोठा होता. मराठी भाषेतील शास्त्र आणि कविता यांच्या संयोगाने रचलेले त्यांचे आगळेवेगळे पुस्तक आहे. ‘साहित्यकौमुदी’ (१९३२). मम्मटाच्या काव्यप्रकाशच्या १,२,३,९,१० या पाच उल्लासांच्या आधाराने केले. पद्यरूप लक्षणांसह मराठीत संक्षिप्त निरूपण केलेले हे एक आगळेवेगळे प्रयोगशील पुस्तक आहे. या पुस्तकातील उदाहरणार्थ दिलेली बहुतेक पद्ये भिडे यांचीच आहेत हे विशेष होय.

     ‘मराठी भाषेचा सरस्वती कोश’: या २०६० पानांच्या कोशात मराठी भाषेतील शब्द, व्युत्पत्त्यांसह दिले आहेत.

     ‘मराठी भाषेचे व्याकरण आणि म्हणी’, आणि निबंध कसे लिहावेत, अनुवाद कसा करावा, याचे मार्गदर्शन करणारे पन्नास निबंध आणि वीस अनुवाद असे उदाहरणांसह लिहिलेले भिडे यांचे पुस्तक आहे ‘निबंधलेखन आणि अनुवाद’ (१९१०). ‘मराठी म्हणींविषयी चार शब्द’ (१८९१) या पुस्तकात म्हणींची मनोरंजक माहिती मिळते.‘अर्थालंकाराचे निरूपण’ मध्ये प्रत्येक अलंकाराचे लक्षण आणि स्पष्टीकरणार्थ भरपूर उदाहरणे दिली आहेत. या पुस्तकात विद्यार्थ्यांनी अलंकार ठरविण्यासाठी, अभ्यासासाठी १६५ गद्य, पद्य उतारे दिले आहेत-हे विशेष.

     ‘मराठी भाषेचे उद्धाटन’ (१९०५) यामध्ये मराठी शब्दांच्या अभ्यासापासून मराठ्यांच्या इतिहासाचे, नीतिमत्तेचे ज्ञान आपणांस कसे प्राप्त होते, हे मनोरंजक रितीने सांगितले आहे.

     या कोशविषयक ग्रंथास डेक्कन व्हर्न्याक्युलर ट्रान्सलेशन सोसायटीचे बक्षीस मिळाले होते. याव्यतिरिक्त ‘राघवीय परीवाह’ (पूर्वार्ध) आणि ‘राघवीय परीवाह’ (उत्तरार्ध) या दोन्ही पुस्तकांत रामजन्मापासून ते रामाचा राज्याभिषेक येथपर्यंतचा कथाभाग आला आहे.

     ‘कमळीची सुटका’ हे २०९ आर्यांचे काव्य, आणि ‘पिलाजी आणि शिवाजी’ हे ११३ आर्यांचे काव्य प्रसिद्ध आहे.‘मुक्तामाला’  यात कविवर्य मोरोपंत यांच्या ११५ आर्यांची सुधारित आवृत्तीही प्रसिद्ध आहे.

     ‘मंदारमंजिरी’, ‘गजेंद्रमोक्ष’, ‘रथरूपक’, ‘जीवजागृती’ इत्यादी काव्यसंग्रहही प्रकाशित झाले आहेत.

      ‘कोरलाईचा किल्लेदार’ (१९२५), ‘केंजळगडचा कबजा’, ‘पण तिसरा कोण?’, ‘गणबगडाचा गडकरी’, ‘आबाजीरावाची साडेसाती’, ‘सवाईराम’, ‘एका गुलामाचे स्ववृत्तकथन’ या रहस्यमय कादंबर्‍या त्यांनी लिहिल्या आहेत.

     तसेच, ‘चिमुकले रामायण’, ‘अकरा मनोरंजक गोष्टी’, ‘गोवर्धनपंत’, ‘चंपूबाई’, हे त्यांचे कथासंग्रहही प्रसिद्ध आहेत.

     - प्रा. मंगला गोखले

भिडे, विद्याधर वामन