Skip to main content
x

भोपटकर, लक्ष्मण बळवंत

अण्णासाहेब भोपटकर

     लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब भोपटकर हे प्रसिद्ध कायदेपंडित होते. स्वातंत्र्यपूर्वकालीन राजकारणात प्रत्यक्ष सहभाग, वृत्तपत्रांचे संपादन, राजकीय, तसेच व्यायाम व कुस्ती या विषयांवर लेखन आणि ललित गद्य लेखन अशी विविधांगी कामगिरी त्यांच्या नावावर आहे.

     लक्ष्मण बळवंत उर्फ अण्णासाहेब हे उच्चशिक्षित होते. १९०४ साली त्यांनी एम.ए. व १९०७ साली एल्एलबी. या पदव्या संपादन करून ते वकिलीच्या व्यवसायात कार्यरत होते. ‘भाला’ या वृत्तपत्राचे संपादक, प्रसिद्ध फौजदारी वकील व फर्डे वक्ते म्हणून नावाजलेल्या भास्कर बळवंत उर्फ ‘भाला’कार भोपटकरांचे ते धाकटे बंधू होते. आपल्या बंधूप्रमाणेच तेही लोकमान्य टिळकांचे खंदे अनुयायी होते. लोकशाही स्वराज्य पक्ष व हिंदू महासभा या पक्षांमधून त्यांची राजकीय कारकीर्द घडली. पुण्यातील सोन्या मारुती सत्याग्रहात व हैद्राबाद सत्याग्रहात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला होता; त्यामध्ये त्यांना तुरुंगवासही घडला. गांधीहत्या खटल्यात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वकील म्हणून त्यांनी काम पाहिले.

     अण्णासाहेबांनी ‘मराठा’ साप्ताहिकातून राजकारण व तत्त्वज्ञानविषयक लेखन केले. वृत्तपत्रातील जहाल लेखनाबद्दल ‘भालाकार’ भोपटकरांना तुरुंगवासाची शिक्षा झाल्यानंतर त्यांच्या अनुपस्थितीत अण्णासाहेबांनी ‘भाला’च्या संपादकपदाची धुरा सांभाळली. पुढे त्यांनी ‘लोकसंग्रह’ या दैनिकाचे संपादनही केले. या वृत्तपत्राद्वारे त्यांनी महात्मा गांधी यांना टीकेचे लक्ष्य केले. त्यांनी ‘पर्मनन्ट एलिमेन्ट्स ऑफ रिलिजन’ ही इंग्रजी लेखमाला  लिहिली. बिपिनचंद्र पाल यांच्या व्याख्यानांचे, तसेच लाला लजपतराय यांच्या ‘माझ्या हद्दपारीची कहाणी’ या पुस्तकाचे अनुवाद त्यांच्या नावावर जमा आहेत. विशेष म्हणजे, ही दोन्ही पुस्तके इंग्रज सरकारकडून प्रक्षोभक ठरविण्यात आली व ती जप्त करण्यात आली होती. काँग्रेसचे कायदेमंडळ, स्वराज्याची मीमांसा, हिंदू समाज दर्शन, अशी राजकीय विचार मांडणारी पुस्तके त्यांनी लिहिली.

     अण्णासाहेबांना व्यायाम व कुस्ती यांमध्ये विशेष रस होता. ‘माझी व्यायाम पद्धती’, ‘कुस्ती’, ‘दांडपट्टा’, ‘स्त्रियांचे व्यायाम’ ही व्यायाम व कुस्तीच्या प्रकारांबाबत प्रबोधन करणारी व त्यांचा प्रसार करणारी पुस्तके त्यांनी लिहिली.

     राजकीय, तत्त्वज्ञानविषयक व कुस्तीविषयक पुस्तकांच्या तुलनेत त्यांचे वाङ्मयीन लेखन अल्प आहे. त्यांनी ‘नवरत्नांचा हार’ हे मराठा वीरांच्या शौर्यगाथा कथन करणारे प्रेरणादायी पुस्तक लिहिले. याशिवाय, ‘मृत्यूच्या मांडीवर’ ही त्यांची कादंबरी प्रसिद्ध आहे. या कादंबरीमध्ये वीर व करुण रसाचा आविष्कार आढळतो.

- मनोहर सोनावणे

भोपटकर, लक्ष्मण बळवंत