भोसलेे, शिवराम खेमराज
शिवराम खेमराज भोसले दहा वर्षांचे असताना त्यांचे पितृछत्र हरपले. खेळण्याच्या वयात कर्तव्याची कठोर वाटचाल नशिबी आली. आपल्या पित्याचे (हि.हा. रायबहाद्दूर सरखेमसावंत तथा बापूसाहेब भोसले) छत्र अल्पकाळ लाभले तरी त्यांच्याकडून मिळालेला ‘कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।’ हा वारसा त्यांनी आयुष्यभर जपला. कोकणचे साटम महाराज यांचा अध्यात्मिक प्रभावही राजेसाहेबांच्यावर बालवयातच झालेला दिसतो. डेहराडूनला ‘डून’ स्कूलमध्ये दाखल झाल्यावर शिस्त व अभ्यासवृत्ती अंगी बाणवली.‘डून’ स्कूलमध्ये हुशार मनमिळाऊ, विद्यार्थी म्हणून ते ओळखले जात. तिथे ‘सिनिअर केंब्रिज’ ही परीक्षा प्रथम वर्गात उत्तीर्ण झाल्यावर त्यांनी पुण्याच्या वाडिया महाविद्यालयात दोन वर्ष शिक्षण घेतले. दरम्यान गांधर्व महाविद्यालयातून ‘बी. ए. म्युझिक’ ही पदवी त्यांनी प्राप्त केली. संगीत विशारद परीक्षेत त्यांनी सुवर्णपदक मिळविले. पंडित कुमारगंधर्व, वसंतराव आचरेकर, पुरुषोत्तम वालावलकर यांच्याशी त्यांचा स्नेह होता. संगीत सभांना तसेच संगीत परीक्षांचे अभ्यासक्रम आखण्याबाबत त्यांचा विचार घेतला जायचा. एवढा त्यांचा अधिकार होता. संगीताप्रमाणे साहित्यावर त्यांचा अपार जीव होता. मालवणी भाषेचे पहिले कवी वि. कृ.नेरुरकर हे त्यांचे गुरु होते. रणजीत देसाई, मुल्कराज आनंद यांच्याशी गाढ मैत्री, तर पुस्तकांवर शिवरामराजेंचा अपार जीव होता. त्यांचे स्वतःचे असे १५,००० पुस्तकांचे वर्गीकृत, अद्यावत ग्रंथालय आजही हिंडलगा येथे आहे. ‘पुस्तकासारखा मित्र नाही’ असे ते म्हणायचे म्हणूनच शेवटच्या दीड-दोन वर्षाच्या आजारपणातही त्यांचे वाचन, मनन चालू होते. इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व हा त्यांचा गुण, सावंतवाडीचे नाव जागतिक कला व्यवसायात करण्यासाठी आणि राजकारणात दोन्हीकडे उपयोगी ठरला.
मराठा लाइट एन्फन्ट्रीमध्ये १९४४-४६ या काळात शिवराम भोसले हे अधिकारी होते. १९४४ मध्ये बडोदे संस्थान मध्ये सन्मान्य कॅप्टन, १९४७ मध्ये ले. कर्नल ही पदे त्यांना मिळाली. जुलै १९६१ मध्ये भारतीय सेनेचे सन्मान्य ले. कर्नल हे पदही त्यांना बहाल करण्यात आले. लहान वयात राज्यकारभाराची सूत्रे त्यांच्याकडे आली. त्यांच्या मातोश्री श्रीमंत राणी पार्वतीदेवी यांच्या मार्गदर्शनाखाली मे १९४७ मध्ये संपूर्ण शासकीय अधिकारासह त्यांचा राज्याभिषेक झाला; आणि राज्यकारभार सुरू झाला. १५ ऑगस्ट १९४७ नंतर देश स्वतंत्र झाला आणि लोकशाहीचे वारे वाहू लागले. जनमत कौलास राजेसाहेब सामोरे गेले आणि भविष्यातील राजकारण, समाजकारणात त्यांनी स्वतःला झोकून दिले.
पुढे १९७१ मध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी संस्थानिकांचे तनखे रद्द केले त्याचे स्वागत ज्या काही मोजक्या संस्थानिकांनी केले त्यात शिवराम भोसले हेही होते. १९५७ साली राजांनी राजकारणात प्रवेश केला. १९५७ मध्ये शिवरामराजे खेमसावंत भोसले संयुक्त महाराष्ट्र समितीचे पुरस्कृत उमेदवार म्हणून विधानसभेवर निवडून गेले. १९६१ मध्ये त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १९६२, १९६७, १९८०, १९८५ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत शिवरामराजे विधानसभेवर निवडून गेले.
आमदार म्हणून निवडून गेल्यावर ते कोकणचा विकास विसरले नाहीत. ‘स्वविकासाबरोबरच वैचारिक पातळीवरून प्रत्यक्ष कृतीपर्यंत समाजाचा, परिसराचा विकास झाल्याखेरीज खरा विकास होणार नाही, याची ठाम खात्री त्यांना होती. सावंतवाडी परिसरात शिक्षणाचा प्रसार झाल्याशिवाय तेथील लोकांचे दुर्भिक्ष्य संपणार नाही याची त्यांना जाणीव होती. याचसाठी १९६१ मध्ये शिवरामराजेंनी ‘दक्षिण रत्नागिरी जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळाची’ स्थापना केली. त्यासाठी स्वतःच्या इमारती, जागा, रोख रक्कम ७५,००० रुपये देऊन आपल्या पित्याच्या स्मरणार्थ पंचम खेमराज महाविद्यालयाची सुरुवात केली. आज विज्ञान, कला, वाणिज्य, शाखांचे पदवी पर्यंतचे शिक्षण देणारे २००० हून अधिक विद्यार्थी संख्या असलेले एक जुने, जाणते महाविद्यालय म्ह़णून सावंतवाडीत उभे आहे. शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूरशी ते संलग्न आहे.
पंचम खेमराज महाविद्यालयाला ९९ वर्षांच्या कराराने त्यांनी ९ एकर जमीन आणि सत्यविलास पॅलेस दिला. स्वतःची मुलेदेखील त्याच महाविद्यालयात शिकली याचा त्यांना अभिमान होता. गोरगरिबांची, समाजातील सर्व थरातील मुले या महाविद्यालयात ताठ मानेने शिकू लागली.
शिवराम भोसले यांना केवळ शैक्षणिक इमारत उभी करायची नव्हती तर सावंतवाडी परिसरात, दक्षिण कोकणात विज्ञान शिक्षण, पुस्तकी शिक्षणाबरोबरच सांस्कृतिक वारसा टिकविणे, वाढविणे आणि त्याद्वारे नवशिक्षितांना व्यवसाभिमुख करणे एवढा व्यापक विचार होता.
स्त्री शक्ती ही कोकणच्या आर्थिक विकासासाठी आधारस्तंभ आहे हे ओळखून स्थानिक हस्तोद्योगांना स्थानिक काम मिळाले, तर कोकणचा विकास शक्य आहे हे समजून प्रत्येक घरच उद्योगाचे केंद्र कसे होईल हे पाहण्यास हस्तोद्योगांना इलेक्ट्रॉनिक उद्योगांची जोड दिली. त्यासाठी स्वतःच्या पत्नी श्रीमंत सत्वशीलादेवी भोसले यांच्या सहकार्याने ‘सावंतवाडी लॅकर वेअर्स’ ची स्थापना केली. सावंतवाडीच्या लाकूडकाम, लाखकाम, बुुडकाम, गंजीफा खेळाचे सेट यांच्या निर्मितीसाठी प्रशिक्षणाची सोय केलीच पण त्यांना जागतिक हस्तकला बाजारपेठेत स्थान मिळवून दिले. कोकणात उत्पादित होणारी आंबा, फणस, कोकम, काजू यांच्या पद्धतशीर लागवड, उत्पादन आणि त्याची पूरक उत्पादने यांच्या विक्रीसाठी प्रयत्न केले.
सावंतवाडी संस्थानचे शेवटचे, राज्याभिषेक झालेले राजे, एवढीच शिवराम भोसले यांची ओळख राहू शकली असती, पण आपले पिता बापूसाहेब महाराजांचा शैक्षणिक प्रयोग, प्रगतीचा वारसा त्यांनी पुढे चालविला. अनेक सरकारी पदे भूषवूनही त्यांनी जमिनीशी नाळ कधी तुटू दिली नाही. जीवनाकडे पाहण्याची सकारात्मकदृष्टी आणि सतत कार्यमग्न ही त्यांची वैशिष्ट्ये होती.
अगदी शेवटच्या आजारपणात देखील आपल्या ‘सुंदरवाडी’ (सावंतवाडी) च्या शैक्षणिक विकासाबद्दल ते प्रयत्नशील असत.