Skip to main content
x

भूमकर, रामचंद्र

      रामचंद्र भूमकर यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातील अंबडवेट या गावी झाला. त्यांच्या वयाच्या दुसऱ्या वर्षीच वडिलांचे निधन झाले. घरच्या गरिबीमुळे मोठ्या भावडांची शिक्षणे होऊ शकली नाहीत, पण मुळातच हुशार असणाऱ्या रामचंद्र यांनी गावातील शाळेत शिक्षण घेतले. तेव्हा त्यांना त्यांच्या शिक्षकांनी सहकार्य केले. गरीब परिस्थिती असूनही त्यांनी पदवीपर्यंतचे शिक्षण घेतले. पुढे प्रौढ शिक्षण वर्ग चालवून त्यांनी सामाजिक शास्त्रातील (Masters in Social Works) पदवी घेतली. याच काळात ते अण्णा हजारे यांच्या आदर्शगाव योजनेमध्ये सहभागी झाले. पुढे स्वत:चे गाव आदर्शगाव योजनेत घेण्यासाठी डॉ. द.र. बापट यांच्या मार्गदर्शनाखाली विज्ञानवर्धिनी संस्थेमार्फत आदर्शगाव योजनेत काम केले. याच काळात भूमकर यांचा कृषी विद्यापीठातील मान्यवर तज्ज्ञांबरोबर संपर्क आल्यामुळे शेतीविषयी आवड निर्माण होऊन त्यांनी स्वत:च्या शेतात रोपवाटिका चालू केली. यातूनच त्यांनी आपल्या कामाची दिशा निश्‍चित केली. डॉ.द.र.बापट, डॉ.एन.के. सावंत, प्रा. श्री.य.दफ्तरदार यांच्या चार सूत्री भात लागवडीच्या कार्यक्रमात स्वत:च्या शेतात प्रयोग करून सर्व शेतकऱ्यांना भात उत्पादन दुप्पटीने वाढल्याचे दाखवले. दुसऱ्या वर्षी गावात २०-२५ शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन स्वत: प्रत्येकी १० गुंठे जमिनीवर प्रयोग करून दाखवला. त्याचे परिणाम तीन वर्षात गावात १०० % शेतकरी चार सूत्री पद्धतीने भात लागवड करू लागले. शेतकऱ्यांचे उत्पादन वाढल्याने तालुका शेती विभागाने यांच्या सहकार्याने संपूर्ण तालुक्यात या पीक पद्धतीचा प्रसार केला. या आदर्श गावास महाराष्ट्राचे राज्यपाल अलेक्झांडर व २० खासदारांनी भेट देऊन या कार्याचा गौरव केला होता.

      सविता यांच्याबरोबर विवाहबद्ध झाल्यानंतर त्या दोघांनी मिळून चारसूत्री भाताच्या लागवडीचा प्रसार केला. भात रोपांना सिलिकॉनचा वापर शेतकरी करत नसे, म्हणून भूमकर ‘थातुरा’ या सिलिकॉनयुक्त खताची निर्मिती करून ते खत शेतकऱ्यांना पुरवत असत. भूमकर कृषी विभागाच्या वेगवेगळ्या प्रदर्शन व मेळाव्यात सहभागी होत असत. तसेच पुण्यातील भिमथडी जत्रा, दीपमहोत्सव, शेतकरी मेळाव्यातही ते मार्गदर्शन करत असत. तसेच त्यांनी सेंद्रिय शेती पद्धतीचा इनोरा या संस्थेमार्फत प्रसार केला. गेल्या काही वर्षांत त्यांनी आपल्या शेतावर पत्नीच्या सहकार्याने पर्यटन व्यवसायही सुरू केला आहे.

- संपादित

भूमकर, रामचंद्र