Skip to main content
x

चौधरी, केशव गोपाळ

       केशव गोपाळ चौधरी यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव तालुक्यातील जामोद या गावी एका सुशिक्षित मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण चिखली (बुलढाणा) येथील शासकीय विद्यालयात झाले. नागपूरच्या कृषी महाविद्यालयातून १९५५मध्ये त्यांनी विशेष प्रावीण्यासह बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली आणि शासकीय कृषी सेवेत प्रवेश केला. कृषी अधिकारी म्हणून काम केल्यानंतर त्यांनी १९६३ ते १९६८ या काळात कोकणात रत्नागिरी, सावंतवाडी, वेंगुर्ला, धामापूर परिसरांत शासकीय सेवेत फलोद्यान विकास अधिकारी, संशोधन अधिकारी म्हणून काम केले. सेवांतर्गत प्रशिक्षण कार्यक्रमात त्यांनी पुणे कृषी महाविद्यालयातून एम.एस्सी. (हॉर्टिकल्चर) ही पदवी प्रथम वर्गात विशेष प्रावीण्यासह १९७० मध्ये मिळवली. यानंतर त्यांनी कृषी महाविद्यालय, पुणे (१९७०-१९७३) व धुळे (१९७३-१९७४) येथे उद्यानविद्या प्राध्यापक म्हणून काम केले. सदर पदावर काम करत असताना कोल्हार (अहमदनगर) भागातील ‘मस्कत’ जातीच्या डाळिंबातून पी-२३ व पी-२६ हे मोठ्या आकाराचे गोड, मऊ व मोठे दाणे असलेले वाण निवडले.

       चौधरी यांनी पीएच.डी. (हॉर्टि.) ही पदवी मोसंबीवर्गीय पिकांवरील संशोधनाद्वारे १९८३मध्ये म.फु.कृ.वि. येथून प्राप्त केली. त्यांनी मोसंबी संशोधन केंद्र, श्रीरामपूर (अहमदनगर) येथे १९७५ ते १९८४च्या दरम्यान लिंबवर्गीय पिकांवर संशोधनाचे काम केले व रोगप्रतिकारक खुंटनिर्मितीसाठी संकर कार्यक्रम राबवला. मोसंबीच्या डायबॅक रोगाची पानांवर दिसणारी लक्षणे कमी करण्यासाठी ‘क’ जीवनसत्त्वाची फवारणी व इतर पद्धती प्रमाणित केल्या. त्यांनी कागदी लिंबाचे उन्हाळी हंगामात (हस्तबहार) जास्त उत्पादन मिळवण्यासाठी संजीवकांच्या (वाढीस कारणीभूत व वाढ विरोधक) योग्य फवारण्या करण्याची शिफारस केली.

       कोकणातील शेतकरी आंबा, नारळ, सुपारी यांसारख्या पारंपरिक पिकांतच वर्षानुवर्षे गुंतलेला होता. त्याला पैसे देणार्‍या व कोकणातील हवेत चांगले उत्पादन देण्याची क्षमता असलेल्या विविध मसाल्याच्या पिकांवर संशोधन करून त्यांचा प्रसार करण्याची संधीही चौधरी यांना मिळाली. त्यांनी त्या काळात लवंग, जायफळ, दालचिनी, कोको, अधिक उत्पादन देणाऱ्या काळ्या मिरीच्या जाती कोकणात रुजवल्या. संशोधनाअंती त्यांनी मसाल्याच्या पिकांच्या व काजूच्या अभिवृद्धीच्या पद्धती प्रमाणित केल्या. त्यांच्या या प्रयत्नांमुळे व पाठपुराव्यांमुळे कोकणातील शेतकऱ्यांना फलोद्यान विकासासाठी अनुदान प्राप्त झाले. त्यांनी कोकणात केलेल्या फलोद्यान विकासाच्या कामांमुळे कृषिमंत्री बाळासाहेब सावंत यांनी त्यांना विशेष प्रशस्तिपत्रही दिलेले होते.

       चौधरी यांनी म.फु.कृ.वि.त उद्यानविद्या विभागप्रमुख म्हणून काम केले. या काळात विद्यार्थ्यांना व इतर कनिष्ठ संशोधकांना संशोधन कार्यक्रमाचे नियोजन व अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. तसेच त्यांनी महाराष्ट्राच्या अवर्षणप्रवण भागात डाळिंब, बोर, सीताफळ, आवळा यांसारख्या कोरडवाहू फळपिकांच्या वाढीसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नांमुळेच बांधावरच्या बोरी व्यापारी तत्त्वावर शेतात लागून या पिकाखालील क्षेत्र वाढले. त्याचाच परिणाम म्हणून ‘बोर बागायतदार संघ’, ‘डाळिंब बागायतदार संघ’ महाराष्ट्रात कार्यरत झाले.

       दुष्काळात शासनातर्फे रस्तादुरुस्ती किंवा तत्सम  अनुत्पादक व तात्पुरती कामे रोजगार हमी योजनेमार्फत  केली जात असत. डॉ. चौधरी यांनी रोजगार हमी योजनेद्वारे बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या शेतावरच काम देऊन फलोद्यान विकास या संकल्पनेचा प्रस्ताव तांत्रिक व आर्थिक तपशिलांसह त्या वेळच्या कृषिमंत्र्यांकडे १९८७मध्येच पाठवला होता. १९८९पासून शासन राबवत असलेल्या फलोद्यान विकास अनुदान योजनेचे मूळ डॉ. चौधरी यांच्या संकल्पनेतच आहे. त्यांनी १९८८मध्ये महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेत संशोधन सल्लागार या पदावर काम करत असताना स्वेच्छानिवृत्ती घेऊन नंतर कल्याणी अ‍ॅग्रो कॉर्पोरेशन या खासगी संशोधन व विकास संस्थेत काम करत असताना डाळिंब, आंबा, संत्रा, द्राक्षे यांच्या निर्यातीसाठी प्रयत्न  केले.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

चौधरी, केशव गोपाळ