Skip to main content
x

चव्हाण, चंद्राम रामचंद्र

       चंद्राम रामचंद्र चव्हाण यांचा जन्म मौजे इंडी, जि.विजापूर (कर्नाटक) येथे एका गरीब कुटुंबात झाला. गुरुजींचे वडील रामचंद्र खुबा चव्हाण हे अध्यात्मिक विचारसरणीचे व विठ्ठलभक्त होते. सावकाराच्या जाचाला कंटाऴून ते कर्नाटकातून महाराष्ट्रात मौजे निंबर्गी ता. दक्षिण सोलापूर येथे १९२७ - २८ च्या दरम्यान आले. तेथून पुढे कोरवली या गांवी स्थायिक झाले. लहानपणी गुरुजी गुरे राखण्याचे काम करीत. त्यांची शिक्षण घेण्याची इच्छा लक्षात घेवून गुरुजींच्या वडिलांनी १९३५ मध्ये त्यांना शाळेत दाखल केले. पुढे त्यांचे शिक्षण कसेबसे इयत्ता ७ वी पर्यंत झाले. आर्थिक परिस्थितीमुळे पुढे त्यांना शिक्षण घेता आले नाही. १९४९ च्या ऑक्टोबर महिन्यात त्या वेळच्या शालेय समितीने त्यांची शिक्षक म्हणून बार्शी तालुक्यातील झरेगांव येथे नियुक्ती केली.

     उन्हाळ्याच्या सुट्टीत कोरवली या आपल्या गावी आल्यानंतर गुरुजी स्वस्थ बसत नसत. बंजारा समाजाच्या कल्याणासाठी आपण काम केले पाहिजे असे त्यांना सातत्याने वाटत असे. बंजारा समाजाचे व तांड्याचे प्रमुख गंगाराम गेमलू जाधव यांच्याशी ते या विषयावर चर्चा करीत. पुढे सोलापुरातील त्या वेळचे काँग्रेसचे कार्यकर्ते वि. गु. शिवदारे, राजाराम ढवळे, दिनानाथ कमळे गुरूजी, भाई छन्नुसिंग चंदेले, खेमा नाईक इ. कार्यकर्त्यांबरोबर गुरुजींचा संपर्क आला. बंजारा समाजाच्या विकासाची गुरुजींची तळमळ पाहून, कमळे गुरुजी शालेय समितीचे अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी चंद्राम चव्हाण गुरुजींची बदली कोरवली या त्यांच्या मूळ गावी केली.

      कोरवली येथील शाळेत अध्यापनाचे काम करीत गुरुजींनी समाजकार्य सुरू केले. संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा पायी प्रवास करून जिल्ह्यातील लमाण तांड्यांचे सर्वेक्षण केले. निरक्षरता, दारिद्य्र, सतत भटकी वृत्ती, व्यसनाधीनता अशा गर्तेत समाज अडकलेला होता. तेव्हा अशा अवस्थेत या समाजाला संघटित करणे व विकासाच्या प्रवाहात आणणे यासाठी गुरुजींनी प्रयत्न सुरू केले. गुरुजी तांड्यातांड्यावर जाऊन लोकांना एकत्रित करून त्यांचे लमाणी भाषेत प्रबोधन करीत असत. संत नामदेव, संत एकनाथ, संत तुकाराम, कबीर यांच्या अभंगवाणीतून दारूचे दुष्परिणाम व शिक्षणाचे महत्त्व पटवून देत असत. लोकांच्या हाताला काम व त्यांच्या मुलाबाळांना शिक्षण मिळवून देण्यासाठी व हे कार्य अधिक गतिमान  करण्यासाठी एक संस्था स्थापन करण्याचे त्यांनी ठरविले. १९५० मध्ये कार्यकर्त्यांच्या मदतीने व खेतपूरचे चितळेमामा यांच्या उपस्थितीत अक्कलकोट येथे एक लमाण परिषद आयोजित केली व या परिषदेत ‘सोलापूर जिल्हा लमाण सेवा मंडळा’ची स्थापना केली. या मंडळाच्या माध्यमातून त्यांनी २०० लमाण तांड्यांना दारू गाळण्यापासून मुक्त केले. लमाण लोकांची उदरनिर्वाहासाठी होणारी भटकंती कमी करून त्यांना स्थैर्य प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने दिनानाथ कमळे गुरुजींच्या सहकार्याने १९५७ मध्ये सोलापुरातील नेहरूनगर येथे बंजारा समाजाची ९०० घरांची एक आदर्श अशी वसाहत उभी केली. लोकांच्या उपजीविकेसाठी १९ शेती सहकारी संस्था स्थापन केल्या. शासकीय, निमशासकीय व वनविभागाची ७००० एकर जमीन संस्थेच्या वतीने मिळवून दिली. ९ जून १९५८ मध्ये नेहरूनगर या ठिकाणी जागृती विद्यामंदिराची स्थापना करून त्यांनी आपल्या शैक्षणिक कार्याचा शुभारंभ केला.

     लमाण बांधवांच्या विकासाबरोबर गुरुजींनी इतर मागास समाजातील लोकांच्या कल्याणासाठी काम करण्याचे ठरविले. त्यासाठी शिक्षकपदाचा राजीनामा दिला. हरिजन, गिरिजन, भटके, विमुक्त जाती - जमातींच्या सर्वांगीण विकासासाठी सोलापूर जिल्हा लमाण सेवा मंडळाची व्याप्ती वाढवून ‘सोलापूर जिल्हा मागास सेवा मंडळ’ असे संघटनेचे नामकरण करण्यात आले. ही संस्था २८ सप्टेंबर १९७७ रोजी नोंदणी करण्यात आली. संस्थेचे कार्यक्षेत्र महाराष्ट्र व कर्नाटक राज्य निश्‍चित करण्यात आले. शिक्षणाशिवाय समाजात खर्‍या अर्थाने परिवर्तन होणार नाही हे जाणवून गुरुजींनी सोलापूर शहर व जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुका, उत्तर सोलापूर तालुका, मोहोळ, मंगळवेढा या तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक शाळा सुरू केल्या. सोलापूर शहरातील लष्कर, कामाठीपुरा, लोधीगल्ली, मोटीगल्ली, कुंभारगल्ली, सेटलमेंट भाग (कैकाडी समाज) इ. मागास व गुन्हेगारी जातीजमाती असलेल्या भागातील मुले इतर ठिकाणच्या शाळेत जात नसल्याने त्यांच्या शिक्षणासाठी त्या-त्या ठिकाणी गुरुजींनी शाळा स्थापन केल्या. सोलापूर शहर व जिल्ह्यात मिळून सर्वच प्रकारच्या शिक्षण देणार्‍या ३७ शाखा स्थापन करण्यात आल्या. सध्या या शाखांतून सुमारे १५,५०० विद्यार्थी शिक्षणाचा लाभ घेत आहेत. गुरुजींच्या शिक्षण संस्थेत ७०० शिक्षक व शिक्षकेतर सेवक आहेत. संस्थेकडे शैक्षणिक कार्यासाठी शेती व बिगर शेती अशी मिळून १०० एकर जमीन आहे. शिक्षण संकुल व वसतिगृहाच्या सुमारे ५ कोटी रुपये किंमतीच्या इमारती आहेत. बालक मंदिर, प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, शारीरिक शिक्षण महाविद्यालय, सैनिकी स्कूल, आयडियल स्कूल, आश्रमशाळा, संगणक शिक्षण संकुल, अध्यापक महाविद्यालय, वसतिगृहे इ. विविध प्रकारच्या शाखा कार्यरत आहेत. गुरुजींनी या शाखांना साने गुरुजी, महात्मा गांधी, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले इ. समाजसुधारकांची नावे दिलेली आहेत.

     गुरुजी हे अध्यात्मिक संस्कारात वाढल्याने त्यांनी त्यांच्या शिक्षण संस्थांत मूल्य शिक्षण ही बाब जाणीवपूर्वक जोपासलेली आहे. निवासी शाखेतील विद्यार्थी पहाटे उठून प्रार्थना करतात. प्रार्थनेनंतर स्वच्छ चारित्र्य व श्रमाचे महत्त्व सांगितले जाते. गुरुजींवर महात्मा गांधी, पंडित नेहरू, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, प. पू. पांडुरंग शास्त्री आठवले इ. च्या विचारांचा पगडा आहे. त्यामुळे गुरुजींच्या शिक्षण व समाज कार्याला अध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले आहे. कोणत्याही समारंभाच्या निमित्ताने गुरुजी जेव्हा मार्गदर्शन करतात तेव्हा विविध संतांच्या शिकवणीचा उल्लेख केल्याशिवाय ते पूर्ण होत नाही. मात्र गुरुजींचा अध्यात्मवाद हा कर्मयोगावर आधारलेला आहे. म्हणूनच त्यांनी आपल्या संस्थेचे बोधवाक्य ‘आज परिश्रम कल लाभ’ असे निश्‍चित केलेले आहे. गुरुजींनी स्त्री शिक्षणावरही भर दिलेला आहे. स्त्रिया हे समाजाचे अर्धे अंग आहे. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवून चालणार नाही. ही त्यांची विचारसरणी असल्यामुळे त्यांनी सर्वच शाखांमध्ये मुलींना प्राधान्य दिलेले आहे. मुलींसाठी स्वतंत्र आश्रमशाळा व वसतिगृहे सुरू केलेली आहेत.

     १९५० मध्ये मागास व दुर्बलांच्या सक्षमीकरणासाठी गुरुजींनी सुरू केलेल्या या विधायक प्रकल्पाला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. या शैक्षणिक व सामाजिक विकास प्रकल्पात सहभागी झालेल्या १२० जातीधर्माच्या लोकांचे योग्य पध्दतीने पुनर्वसन व सक्षमीकरण झालेले आहे व होत आहे. सुमारे २००० विद्यार्थी शासकीय व निमशासकीय उपक्रमात उच्चपदावर विराजमान आहेत. या मधील २५० विद्यार्थी प्रथम श्रेणीचे अधिकारी म्हणून कर्तव्य बजावत आहेत. हेच गुरुजींच्या शैक्षणिक कार्याचे फलित म्हणावे लागेल. आजवर गुरुजींनी केलेल्या या कार्याची दखल शासन स्तरावर व विविध सामाजिक संस्थांनी घेऊन त्यांना विविध प्रकारचे पुरस्कार देऊन सन्मानित केलेले आहे. दलितमित्र पुरस्कार (महाराष्ट्र शासन), समाजसेवक भूषण पुरस्कार (सोनी चॅरिटेबल ट्रस्ट, सोलापूर), समाजसेवक भूषण पुरस्कार (सामाजिक समरसता मंच, पुणे), समाजसेवक भूषण पुरस्कार (भारती विद्यापीठ, पुणे), शैक्षणिक संस्था चालक सेवक पुरस्कार (महाराष्ट्र राज्य शिक्षक संघटना), कृतिशील बंजारा समाजसेवक पुरस्कार (अखिल भारतीय बंजारा सेवा संघ), गांधीफोरम पुरस्कार (गांधी फोरम यांच्या वतीने) इ. पुरस्कारांनी गुरुजींना गौरविलेले आहे. सध्या गुरुजी अखिल भारतीय बंजारा सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून काम करत आहेत. आज वयाच्या ८५व्या वर्षीही त्यांचा कामाचा उत्साह  वाखाणण्यासारखा आहे. व्यसनमुक्ती, गोरगरीब विद्यार्थ्यांना मदतीचे आवाहन, हुंडाबंदी, आंतरजातीय, धार्मिक व सामुदायिक विवाहाला उत्तेजन, अनेक चांगल्या संकल्पना समाजात रुजविण्यासाठी त्यांचे प्रबोधन चालू असते. म्हणूनच चंद्राम चव्हाण गुरुजी हे कृतिशील समाजसेवक म्हणून महाराष्ट्राला परिचित आहेत. माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांनी गुरुजींचे कार्य पाहून असा अभिप्राय नोंदविलेला आहे की, “मला पंढरपुरात पुंडलिक भेटला नाही. परंतु तो चंद्राम चव्हाण गुरुजींच्या रूपाने मला नेहरुनगर येथे भेटला.” ‍‌१४ जून २०१९ रोजी त्यांचं वृद्धापकाळामुळे निधन झालं.

     - प्रा. उत्तमराव हुंडेकर

चव्हाण, चंद्राम रामचंद्र