चव्हाण, ईश्वर गोपाळ
ईश्वर गोपाळ चव्हाण यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज तालुक्यातील हरळी गावातील एका गरीब, मागास कुटुंबात झाला. त्यांचे बालपण अत्यंत गरिबीत गेले. त्यांनी पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून बी.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटीत प्रवेश घेतला. तेथे त्यांनी एम.एस्सी.ची आणि पीएच.डी.ची पदवी ‘अॅनिमल हजबंडरी आणि डेअरी बॅक्टेरिओलॉजी अॅन्ड टेक्नोलॉजी’ या विषयांत मिळवली. यासाठी त्यांना कोल्हापूर संस्थानाची छत्रपती शाहू महाराज शिष्यवृत्ती मिळाली होती. अमेरिकेतील उच्च शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर परभणी, नागपूर आणि पुणे येथील कृषी महाविद्यालयांमध्ये पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्राचे प्राध्यापकपद भूषवले. या काळात त्यांनी अध्यापनाबरोबर संशोधनाचेही कार्य सुरू ठेवले. म.फु.कृ.वि. येथे १९७०मध्ये त्यांनी पशुविज्ञान आणि दुग्धशास्त्र विभागप्रमुख म्हणून सूत्रे हाती घेतली.
डॉ. चव्हाण यांनी गाय, शेळी, मेंढी या पशुप्रजातीवर आधारित दूध, लोकर व मटण उत्पादनांसाठी तीन वेगवेगळ्या संशोधनात्मक प्रकल्पांचे नियोजन केले. या प्रकल्पांची त्यांनी यशस्वीपणे उभारणी केली. तत्पूर्वी डॉ. चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे कृषी महाविद्यालय येथील डेअरी फार्मवर लालसिंधी गाय आणि सुरती म्हशींच्या कळपांचे प्रजनन, संवर्धन, व्यवस्थापन आणि हिरव्या वैरणीचे उत्पादन याची पायाभरणी केली. त्यामुळे लालसिंधी गाईंचे १५०० ते १७०० लीटर दूध ३०० दिवसांत मिळत होते. त्या दुधाचे स्निग्धांशाचे प्रमाणही चांगले (५ ते ५.५% फॅट) होते. त्याचप्रमाणे सुरती म्हशींचे सरासरी १४०० ते १६०० लीटर दूध ३०० दिवसांत मिळत होते.
ज्या काळात सर्वसाधारण शेतकरी संकरित गाय पाळण्यासाठी उत्सुक नव्हता, त्या काळात डॉ. चव्हाण यांनी संकरित गोसंशोधन प्रकल्प यशस्वीपणे उभा केला आणि शेतकऱ्यांना संकरित गाईचे व्यवस्थापन, प्रजनन आणि हिरव्या चाऱ्याचे उत्पादन घेतले, तर दूध उत्पादन वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते हे पटवून दिले. संकरित गाय आर्थिक फायद्याची आहे हे शेतकऱ्यांना पटले.
गोसंशोधन प्रकल्पात गीर जातीच्या गाईची विदेशी जातीच्या सिद्ध वळूशी संकर पद्धतीने पैदास करून त्यापासून संकरित गाईंचे उत्पादन केले. त्यासाठी विदेशी सिद्ध वळू होलस्टिन फ्रिझीयन, जर्सी आणि ब्राऊन स्विस यांचे गोठवलेले वीर्य वापरण्यात आले. अशा प्रकारे निर्माण झालेल्या संकरित गाईंचे ३००० ते ३२०० लीटर दूध ३०० दिवसांत मिळाले.
गोसंशोधन प्रकल्पाप्रमाणे शेळी उत्पादनाला महत्त्व देऊन १९७२पासून शेळी संशोधन प्रकल्प सुरू झाला. या प्रकल्पात स्थानिक जातीच्या शेळ्यांची संकर पद्धतीने पैदास करण्यात आली. यासाठी अंगोरा जातीच्या विदेशी बोकडांचा पैदाशीसाठी उपयोग केला जातो. अंगोरा हे लोकर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहेत. एका बोकडापासून ५ ते ६ किलो लोकर मिळते. त्यापासून उत्पन्न होणाऱ्या संकरित शेळ्यांत (तिसरी पिढी) दोन ते अडीच किलो लोकर उत्पादन मिळते. या प्रकल्पात निर्माण झालेल्या शेळ्या उत्तर प्रदेश, उत्तरांचल, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश या ठिकाणी दिल्या जातात.
शेळीचे व्यवस्थापन, त्यांची चरण्याची पद्धत, बाडे व आरोग्य याचा संशोधनात्मक अभ्यास करण्यात आला. मेंढी संशोधन प्रकल्पात स्थानिक जातीची दख्खनी मेंढी व विदेशी जातीचे मेंढे-डॉरसेट हॉर्न, सफोक आणि रशियन मेरीनो यापासून संकरित कोकरे निर्माण केली. डॉ. चव्हाण यांनी संशोधनाबरोबर शिक्षण आणि विस्तार कार्यातही मोठे योगदान दिले. एम.एस्सी. आणि पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.