Skip to main content
x

दांडेकर, संजय भालचंद्र

         पिकांच्या योग्य व निकोप वाढीसाठी सिंचनाप्रमाणेच अतिरिक्त पाणी व क्षार यांचा निचरा होणे, ही आवश्यक बाब आहे. हे जाणून त्यासाठी योग्य उपायांचा प्रयत्न करण्यात संजय दांडेकर सतत कार्यरत होते. १९८०मध्ये पुणे विद्यापीठाची बी.ई. (मेक.) ही पदवी प्राप्त केल्यानंतर त्यांनी किर्लोस्कर ब्रदर्स, वालचंदनगर इंडस्ट्रीज व एस.एस. इंडस्ट्रीज अशा विविध ठिकाणी कामाचा अनुभव घेतला.

         भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, हरयाणा, तर महाराष्ट्रात नीरा डाव्या कॅनॉलच्या आधिपत्याखाली असलेल्या व सांगली, सातारा, पुणे, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यांतील क्षेत्रात पाण्याच्या अतिरिक्त वापरामुळे जमिनी नापीक झाल्या आहेत. आतापर्यंत अशा क्षेत्राचा विकास केवळ परदेशी मदतीवर अवलंबून असे. कॅनेडियन सरकारने दिलेल्या मदतीवर चंबळ खोर्‍यातील २०,००० हेक्टर जमिनीचा विकास केला गेला, तर नेदरलँड सरकारने दिलेल्या २२ कोटी रुपयांमुळे हरयाणातील १,५०० हेक्टर जमिनीचा विकास झाला. मात्र अशी मदत बंद झाली की, विकासाचे काम ठप्प होत असे, परंतु दांडेकर यांच्या प्रयत्नामुळे आपल्याकडील उपलब्ध साधनसामग्री वापरून सच्छिद्र नळ्या पाणथळ व क्षारयुक्त जमिनींची सुधारणा करणे, सहज शक्य झाले आहे.

         याकरता दांडेकर यांनी ‘रेक्स पॉलीएक्सट्रुजन लि.’ या कंपनीद्वारे जर्मन तंत्रज्ञानावर आधारित प्लॅस्टिकच्या सच्छिद्र, लवचीक, वेगवेगळ्या व्यासाच्या नळ्यांच्या उत्पादनाला सुरुवात केली. क्षारपड जमिनीचे सर्वेक्षण करून जमिनीच्या उताराप्रमाणे १ ते १.५ मीटर खोलीवर या नळ्या टाकल्या. या क्षेत्राला भरपूर पाणी दिल्यामुळे त्या पाण्यात क्षार विरघळून सच्छिद्र नळ्यांवाटे त्याचा निचरा होणे शक्य झाले. आतापर्यंत त्यांनी या कंपनीद्वारे हरयाणात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर क्षारयुक्त जमिनीच्या विकासाचे कार्यक्रम पूर्ण केले आहेत. महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात दूधगाव येथे १,१०० हेक्टर, कसबे डिग्रज येथे ५०० हेक्टर व शेतकर्‍यांकडे १,००० हेक्टरवर हा कार्यक्रम राबवून हे क्षेत्र पिकाखाली आणले.

         त्यांनी मुंबईच्या वानखेडे क्रीडासंकुलाचेही पुनर्विकसन केले आहे. सध्या ते रेक्स पॉलीएक्सट्रुजन कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, झेनप्लास पाइप्स प्रा.लि., उत्तराखंड या कंपनीचे संचालक, सिस्टीम रेक्स, मुंबई या कंपनीचे भागीदार, तर बी.आय.एस. राष्ट्रीय कंपनी, ई.टी. १४ इलेक्ट्रो टेक्निकल, सीईडी-५० प्लॅस्टिक पाइपिंग सिस्टीम इ. कंपन्यांचे सदस्य आहेत.

         याव्यतिरिक्त कृष्णा व्हॅली चेंबर ऑफ इंडस्ट्रीज आणि कॉमर्स व नवकृष्णा व्हॅली स्कूलचे अध्यक्ष, कृष्णा व्हॅली क्लब व सांगली रोटरी क्लबचे संचालक आणि इंजिनीयर्स व आर्किटेक्ट असोसिएशनचे सचिव इत्यादी पदेही त्यांनी भूषवली आहेत.

 - संपादित

दांडेकर, संजय भालचंद्र