Skip to main content
x

दातार, विनोद विष्णुपंत

          नस्पतिरोगशास्त्राचे शिक्षण, संशोधन आणि विस्तारकार्य याबाबतीत मोलाचे योगदान देणारे विनोद विष्णुपंत दातार हे एक पारदर्शी व्यक्तिमत्त्व . त्यांचा जन्म औरंगाबाद येथे झाला. औरंगाबादच्या सरस्वती भुवन विद्यालयातून ते शालान्त परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढील शिक्षण त्यांनी परभणी येथील कृषी महाविद्यालयातून घेतले. त्यांनी १९७१मध्ये बी.एस्सी. (कृषी) पदवी, १९७३मध्ये एम.एस्सी. (कृषी) पदवी प्राप्त केली. त्यानंतर परभणीचे ज्वारी संशोधन केंद्र (१९७३), फळ संशोधन केंद्र (हिमायतबाग) येथे ज्वारी व फळ पिकावर वनस्पति-विकृतिशास्त्रासंबंधीच्या संशोधनात भाग घेतला. पुढील शिक्षणासाठी त्यांनी नवी दिल्ली येथील भा.कृ.सं.सं.त प्रवेश घेतला व १९७६ ते १९७९ या काळात पीएच.डी.चा अभ्यास पूर्ण केला. ते १९७४मध्ये मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी येथे वनस्पति-विकृतिशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कामाला लागले व त्यानंतर निरनिराळ्या पदांवर काम करून २००६ मध्ये सहयोगी अधिष्ठाता झाले.

          दातार १९७४पासून ‘इंडियन फायटो पॅथॉलॉजिकल सोसायटी’चे आजीव सदस्य आहेत. त्यांना १९७९मध्ये संस्थेने ‘एफ.पी.एस.आय’ देऊन त्यांचा सन्मान केला. औरंगाबाद येथे १९८९ आणि २०००मध्ये झालेल्या इंडियन फायटो पॅथॉलॉजिकल संस्थेच्या विभागीय परिसंवादाचे ते सहसंयोजक होते. ‘भारत-बल्गेरिया सांस्कृतिक देवाणघेवाण’ या कार्यक्रमांतर्गत १९९२मध्ये बल्गेरियातील उच्च शिक्षण संस्थांतील विद्यार्थी आणि संस्था प्रमुख आणि शिक्षकांना वनस्पति-विकृतिशास्त्रावर व्याख्यानांद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी जवळजवळ वीस एम.एस्सी. आणि पीएच.डी.च्याही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे, तसेच निरनिराळ्या विद्यापीठांत व संस्थांमध्ये मार्गदर्शक म्हणूनही काम केले. त्यांनी थायलंडमध्ये बँकॉक येथे भरलेल्या आंतरराष्ट्रीय चर्चासत्रात ‘कांद्यावरील रोग आणि त्यांचे नियंत्रण’ या शोधनिबंधाचे वाचन केले. त्यांनी निरनिराळ्या पिकांवरील रोगांचा प्रादुर्भाव, त्यांचे नियंत्रण व निराकरण यांवर संशोधन केले व संशोधनाचे निष्कर्ष आणि फलित त्यांनी विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संमेलनात सादर केले. त्यांचे सुमारे १८० शोधनिबंध विविध पत्रिकांतून (जर्नल्स) प्रसिद्ध झाले आहेत. पिकांवरील रोग मोजणाऱ्या ‘फायटोपॅथॉमेट्री’ या ग्रंथाचे ते डॉ.चारुदत्त माई यांचे सहलेखक आहेत. ‘कपाशी, पानवेली, बीटी कपाशी या पिकांवरील महत्त्वाचे रोग व नियंत्रण’ या ग्रंथांच्या लेखनातही त्यांचा सहभाग होता.

          दातार १९९९ ते २००४ या कालावधीत औरंगाबाद येथील राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पात सहयोगी संशोधन संचालक म्हणून कार्यरत होते. कृषी तंत्रज्ञान आत्मा योजनेत त्यांनी ‘पानवेलीवरील मर रोग, कारणे व उपाय’ हा संशोधन प्रकल्प राबवला व शिफारसी दिल्या. त्यांना ‘चौधरी देवीलाल पारितोषिक’ देऊन त्यांचा उचित गौरव केला गेला. दातार यांनी २००६ ते २००८ या काळात लातूर येथे कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून काम करताना संस्थेच्या विकास कार्यासाठी राज्य शासनाकडून निधी मिळवला.

          - डॉ. शुभलक्ष्मी भालचंद्र जोशी

दातार, विनोद विष्णुपंत