Skip to main content
x

दाते, श्रीकृष्ण दत्तात्रय

बाबाजी दाते

        श्रीकृष्ण दत्तात्रय तथा बाबाजी दाते यांचे यवतमाळ हे जन्मगाव. मॅट्रिकपर्यंतचे त्यांचे शिक्षण यवतमाळ येथे झाले. १९३७ मध्ये त्यांनी एलएल.बी. व १९३९ मध्ये एम.ए. पदवी संपादन केली. १९४० मध्ये वर्धा येथील कला महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून ते नोकरी करू लागले. नंतर नागपूरच्या शासकीय विज्ञान महाविद्यालयात प्राध्यापक झाले. त्याच वर्षी अर्थशास्त्र विषय घेऊन ते एम.ए. झाले. १९४५ ते १९५० ह्या काळात अंमळनेरच्या प्रताप महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक होते. १९५० मध्ये यवतमाळ कला महाविद्यालयामध्ये त्यांनी प्राचार्यपदाची जबाबदारी स्वीकारली.

     पण १९५२ मध्ये हे महाविद्यालय बंद पडले व बाबाजींनी वकिली सुरू केली. १९५५ मध्ये त्यांनी विशुद्ध विद्यालय ही संस्था काढली. त्याचबरोबर मुलींसाठी खाजगी महाविद्यालय सुरू केले.

     १९५९ मध्ये त्यांच्या वाणिज्य विद्यालयास विद्यापीठाची मान्यता मिळाली. काही काळातच हे महाविद्यालय नावारूपास आले. त्यांच्या संस्थेचा व्याप वाढू लागला.  १९५७ मध्ये राणी लक्ष्मीबाई विद्यालय, बालकांसाठी ‘ध्रुव बालक मंदिर’ व ‘ध्रुव प्राथमिक शाळा आणि गुरुकुल’ सुरू केले. त्यानंतरच्या काळात मुलांसाठी ‘विवेकानंद विद्यालय’, ‘अध्यापन पदविका  विद्यालय’, ‘शारीरिक प्रशिक्षण महाविद्यालय’, ‘व्यंकटेश विद्यालय’ अशा शाळा व महाविद्यालये सुरू केली. 

     १९६० मध्ये मुलींसाठी महर्षी कर्वे वसतिगृह, नंतर विशुद्ध मुद्रणालय, अर्बन बँक, बर्फाचा कारखाना, आटा यंत्र, अनाथ मुलांसाठी मायापाखर आणि बालसदन, महिला बँक असे विविध उपक्रम त्यांनी सुरू केले. संस्थेचा व्याप व लौकिक वाढत गेला.

     १९७५ मध्ये आणीबाणीच्या काळात बाबाजींना १९ महिने कारावास झाला. त्याच वर्षी ते वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून निवृत्त झाले. त्यांची राहणी अतिशय साधी होती. वयाच्या सत्तरीतही ते कामासाठी सायकलने फिरत असत. कोणतेही काम पूर्ण होईपर्यंत पाठपुरावा करीत राहणे हा त्यांचा स्वभाव होता.

     १९७७ मध्ये कारागृहातून सुटल्यानंतर विशुद्ध विद्यालयाच्या विकासाच्या दृष्टीने त्यांचे प्रयत्न सुरू झाले. १९८२ मध्ये असे विविध उपक्रम सुरू केले.

      विद्यार्थ्यांना स्वावलंबी बनविणारे शेती, बागाईत, किराणा दुकान, सायकल दुकान, पिठाची गिरणी, भाजी विक्री असे सत्तावीस उपक्रम ते राबवीत होते.

     १९८२ मध्ये स्थापन केलेल्या ‘मायापाखर’ आणि ‘बालसदन’ या संस्थेत आज पंचेचाळीस बालकांचा प्रतिपाळ  होतो. १९८६ मध्ये यवतमाळपासून जवळ असणाऱ्या परिसरातील दोन उजाड टेकड्यांवर त्यांनी ‘वनराई’ चा प्रयोग केला. या त्यांच्या कार्याबद्दल महाराष्ट्र शासनाने सामाजिक वनीकरण योजनेअंतर्गत ‘वनश्री पुरस्कार’ प्रदान करून बाबाजींंचा यथार्थ गौरव केला.  यवतमाळ जिल्हा सभेतर्फे निघणाऱ्या ‘भारत’ या साप्ताहिकाचे १९५१ मध्ये ते संपादक होते. त्यातील बरेचसे लेखन बाबाजीच करीत. वयाच्या पंच्याऐंशीव्या वर्षीही त्यांच्या मनात समाजहिताच्या नवीन नवीन योजनांचा विचार होता.

     - प्रा. डॉ. सुधीर बोधनकर

दाते, श्रीकृष्ण दत्तात्रय