Skip to main content
x

दात्ये, रोशन चित्तरंजन

थक नृत्याचे अध्यापन व नृत्यसंरचना करणाऱ्या रोशन चित्तरंजन दात्ये यांचा जन्म नाशिक येथे झाला. वडील कृष्णाजी दत्तात्रेय बेदरकर व आई मीरा बेदरकर यांचे संस्कार, कविवर्य कुसुमाग्रज यांच्या दीर्घ सहवासातून मिळालेली जीवनदृष्टी आणि प्रा. डॉ. तारा भवाळकर यांकडून मिळालेली शिस्त यांच्यामुळे रोशनताईंचे व्यक्तिमत्त्व विकसित होत गेले. त्यांचे वडील शैक्षणिक क्षेत्रास महत्त्वपूर्ण योगदान देणारे, न्यू एज्युकेशन सोसायटीचे संस्थापक व प्राध्यापक होते; तर आई डी.एड. महाविद्यालयामध्ये प्राध्यापिका होत्या. त्यामुळे शिक्षण, शिस्त व सामाजिक भान यांचा वारसा रोशनताईंना मिळाला. शालेय व महाविद्यालयीन काळात कला-क्रीडाविषयक अनेक स्पर्धा, कार्यक्रमांत त्यांचा उत्साहपूर्ण सहभाग असे. त्यांनी भोसला मिलिटरी स्कूलचा अभ्यासक्रमही केला. बी.ए.,बी.एड. आणि पुणे विद्यापीठातून बी.कॉम. या पदव्यांसह गांधर्व महाविद्यालयाची नृत्यालंकार ही पदवी त्यांनी संपादन केली. नाशिक येथे सात वर्षे त्यांनी शालेय शिक्षिकेचे कामही केले.

रोशन दात्ये यांनी नाशिक येथे गुरु हैदर अली शेख यांच्याकडे दहा वर्षे कथक नृत्याचे आरंभीचे शिक्षण घेतले. त्यांचा १९७७ साली चित्तरंजन दात्ये यांच्याशी विवाह झाला व त्या पुण्यास स्थायिक झाल्या. त्यांच्या एकंदर कलाप्रवासात दात्ये कुटुंबियांचा पाठिंबा सतत मिळाला. पुणे येथे प्रख्यात कथक कलाकार व गुरु नृत्यपंडिता रोहिणी भाटे यांच्याकडे त्यांनी तीस वर्षे प्रगत अध्ययन केले.

रोहिणीताईंच्या सहवासात कथक नृत्यशैलीचे विविध आयाम, मूलभूत सूक्ष्म संकल्पना, कलाविषयक बहुमुखी विचार व त्यांचे प्रात्यक्षिक स्वरूप याची सखोल तालीम त्यांना मिळाली आणि नृत्यसंरचना करण्याचा मूलमंत्रही मिळाला. गुरु रोहिणी भाटे यांच्या नृत्यभारती कथक डान्स अकॅडमी या संस्थेत त्यांनी चोवीस वर्षे अध्यापन केले. याच संस्थेचे सचिवपद त्यांनी बारा वर्षे सांभाळले व तीन वर्षे सहसंचालिका म्हणूनही कार्य केले. त्यांचा या संस्थेच्या नृत्यविषयक उपक्रमांत गेली तीस वर्षे समायोजक या नात्याने सक्रीय सहभाग आहे.

रोशन दात्ये यांनी अभिजात नृत्यशैलीच्या एक कुशल नृत्यांगना व संरचनाकार, सक्षम गुरु व व्यासंगी कलासंशोधिका या तिन्ही भूमिकांतून कार्य केले आहे. त्यांनी ‘रोचित कथक अकादमी’ ही संस्था १९८० मध्ये नृत्यभारतीची शाखा म्हणून सुरु केली. या संस्थेच्या अनेक विद्यार्थिनींना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरचे पुरस्कार व शिष्यवृत्ती मिळाल्या व त्या परिपूर्ण कलाकार म्हणून रंगमंचीय प्रस्तुती करताना दिसतात . २००४-०५ या काळात एकंदर आठ वैविध्यपूर्ण कार्यक्रम सादर करून संस्थेची रजतजयंती साजरी झाली. संस्थेमार्फत एकल नृत्यप्रस्तुतींना प्रोत्साहन देण्यासाठी ‘एकलविधा’ हा उपक्रम राबवला जातो. तसेच कृ.द. बेदरकर कलाविचार मंच या उपक्रमात विविध मान्यवर तज्ज्ञांची कलाविषयक व्याख्याने आयोजित केली जातात .

एक कथक नृत्यकार म्हणून रोशनताईंनी प्रचलित व अप्रचलित तालांत नृत्यप्रस्तुती; धृपद, सरगम, चतुरंग, तराणे, होरी, रास,अष्टनायिका, ऋतू अशा पारंपरिक नाना विषयांवरच्या अभिनयप्रस्तुती प्रभावीपणे केल्या आहेत. मात्र त्यांचे वैशिष्ट्य असे की अधमा नायिका शूर्पणखा, धीरोद्धत नायक रावण, धीरललित नायक कृष्ण, एकश्‍लोकी रामायण, सूर्यवंदना, दिशा और रेषा, अहिनकुल या विषयांवर नृत्यरचना केल्या. तसेच कथक नृत्याच्या नेहमीच्या प्रस्तुतीत नसणार्‍या बैठकीची लावणी व पोवाडा या गीतप्रकारांवरही त्यांनी आगळीवेगळी प्रस्तुती करून कथकचा परीघ व्यापक केला. पृथ्वीचे प्रेमगीत या कुसुमाग्रजांच्या कवितेवरचा त्यांचा नृत्याविष्कारही वेधक होता.

नाविन्य व परंपरेचा समतोल असणार्‍या अत्यंत अभ्यासपूर्ण नृत्यसंरचना हे रोशन दाते यांचे वैशिष्ट्य आहे. केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर सामाजिक व सांस्कृतिक विचार पोचवण्याचे एक साधन म्हणूनही कलेचा हेतू जबाबदारीने स्वीकारणार्‍या रोशनताईंनी या नृत्यसंरचनांतून कलाविष्कारासह समाजप्रबोधनही साधले आहे. कथकादिकथक, व्योम, मेघदूतम्, स्पेस - कलाकाराची, ललित अलंकृत महाराष्ट्र अशा संशोधनपर नृत्यरचना आणि सृष्टी (पर्यावरण विषयक), नारीशक्ती (सावित्रीबाई फुले, कस्तुरबा गांधी व जोन ऑफ आर्क यांच्या कार्यावर आधारित), एकरूप (समूहशक्ती), कॅक्टस (सकारात्मक दृष्टिकोन) या सामाजिक आशयाच्या तसेच पारंपरिक संकल्पनांवरच्या पंचायतनपूजा, नृत्यसौरभ, विठ्ठल संकीर्तन अशा वैविध्यपूर्ण नृत्यसंरचना त्यांनी केल्या व त्या जाणकारांनीही वाखाणल्या आहेत.

कालका-बिंदादिन महोत्सव, शरच्चंद्रिका महोत्सव, कथक महोत्सव (दिल्ली), विरासत बॅले फेस्टिवल (लखनौ), नर्मदा उत्सव (होशंगाबाद), उदयशंकर बॅले फेस्टिवल (जयपूर), कालाघोडा समारोह (मुंबई), कालिदास महोत्सव (उज्जैन), फिल्म फेस्टिवल (गोवा), इ. महत्त्वाच्या मंचांवर तसेच अमेरिका, कॅनडा, ब्रिटन, व्हिएटनाम, स्पेन, पोर्तुगाल, रोमानिया, बल्गेरिया, हंगेरी, आफ्रिकेतील केनिया, झांबिया, टांझानिया, झिंबाब्वे, इ.देशांत रोशन दाते यांनी अनेकदा यशस्वीपणे एकल, युगल व समूह नृत्यप्रस्तुती केली . भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आय्.सी.सी.आर्.) त्या मान्यताप्राप्त कलाकार आहेत.

रोशन दात्ये या पुणे विद्यापीठाच्या ललित कलाकेंद्र गुरुकुल येथे गुरु व मानद प्राध्यापिका म्हणून त्यांनी काम पाहिले . त्यांनी सप्रयोग व्याख्याने, कार्यशाळांद्वारे भरतनाट्यशास्त्रातील नृत्यविधा यासारख्या अनेक विषयांवर मार्गदर्शन केले आहे . गुरु-शिष्य परंपरा, कथक नृत्य व अवकाश, नृत्य आणि प्राचीन शिल्प-चित्र व साहित्य, नृत्यातील कथाकथन परंपरा, कथक व नृत्यसंरचना, नाटयशास्त्रातील नृत्तकरण, अभिनयदर्पण व नाट्यशास्त्रातील नृत्यविचार, मेघदूतम् काव्याच्या संदर्भात आंगिक अभिनय, इ. अनेक विषयांवर त्यांनी दिल्ली, लखनौ, ग्वाल्हेर, मुंबई, पुणे, धारवाड तसेच एडमंटन, विनिपेग (कॅनडा), लेस्टर (ब्रिटन) इ. ठिकाणी झालेल्या परिसंवाद व अधिवेशनांत व्याख्याने दिली आहेत.

कथक नृत्य आणि प्राचीन शिल्प, मध्ययुगीन लघुचित्र यांतील परस्पर संबंध या संशोधन प्रकल्पासाठी २००२-०४ या काळात भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे त्यांना शोधवृत्ती प्रदान करण्यात आली. या संशोधनावर आधारित ‘कथक-आदिकथक’ या हिंदी ग्रंथाचे प्रकाशन २०१०मध्ये झाले. केवळ ग्रंथिक रुपातच नव्हे तर कथकादिकथक या नृत्यप्रस्तुतीतून रोशनताईंनी प्राचीन नृत्यपरंपरेचे प्रयोगरूपही पुढे आणले. नियतकालिके, वृत्तपत्रे व ग्रंथांमध्ये त्यांचे शोधलेख प्रसिद्ध झाले आहेत. रोशनताईंच्या कार्याबद्दल कॅनडातील सिटी ऑफ थंडर बे येथील मेयरकडून सन्मान (१९९८), नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या कार्यावर आधारित लघुपटाच्या निर्मितीतील योगदानाबद्दल माजी राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या हस्ते सन्मान (२००९), ‘कलाभक्ती’ सन्मान (नाशिक, २००९), रोटरी क्लबचा पुरस्कार (२०१०) इ. अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले . २०१६ साली त्यांना स्वर्गीय पंडिता रोहिणी भाटे पुरस्कार प्राप्त झाला . 

              - चैतन्य कुंटे / आर्या जोशी

दात्ये, रोशन चित्तरंजन