Skip to main content
x

डेंगळे, दिवाकर कृष्णाजी

              संपूर्ण आयुष्य कला आणि कलेचा प्रसार करण्यासाठी वेचणारे प्राचार्य दिवाकर कृष्णाजी डेंगळे यांची चित्रकार व कुशल प्रशासक म्हणून ओळख आहे. मूळचे चिंचवडचे असलेले डेंगळे कुटुंबीय घोडागाडी तयार करण्याच्या व्यवसायामुळे १८६९ मध्ये पुण्यात आले. दिवाकर यांच्या आईचे नाव मालनबाई होते. त्यांचे वडील कृष्णाजी बळवंत डेंगळे यांचा मशीन ड्रॉइंगकडे ओढा होता. त्यांना शास्त्रीय संगीताची आवड होती. घरातील वातावरणामुळे बालवयातच डेंगळे यांच्यावर कलेचे संस्कार झाले.

             सर जे.जे. स्कूल ऑफ आर्टमधून १९४६ मध्ये कलाशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम (ड्रॉइंग टीचर्स सर्टिफिकेट कोर्स), १९५० मध्ये आर्ट मास्टर, तर १९५२ मध्ये जी.डी. आर्ट पेन्टिंग त्यांनी अभ्यासक्रम गुणवत्तेसह पूर्ण केला. दिवाकरांचा १९४९ मध्ये पूर्वाश्रमीच्या कमल कदम यांच्याशी विवाह झाला.

             ते १९५५ मध्ये अभिनव कला महाविद्यालयाचे उपप्राचार्य झाले. १९५५ मध्येच भारतीय कला प्रसारिणी सभा, पुणे या संस्थेचे ते आजीव सभासद झाले. १९५७ पासून भारतीय कला प्रसारिणी सभेच्या सर्व संस्थांचे प्राचार्यपद त्यांनी सलग एकतीस वर्षे भूषविले.

             महाराष्ट्र राज्य अशासकीय व शासनमान्य संस्थांच्या फेडरेशनचे ते बारा वर्षांहून अधिक काळ अध्यक्ष होते. बॉम्बे आर्ट सोसायटी, महाराष्ट्र राज्य कला सल्लागार मंडळ, ललित कला अकादमी व तिच्या विविध समित्या अशा अनेक समित्यांवर ते कार्यरत होते.

             आकाशवाणी-दूरदर्शनवरून कलाविषयक भाषणे, वृत्तपत्रे व मासिकांतून लेख, शैक्षणिक शिबिरे, चर्चासत्रे, कला मेळे, प्रात्यक्षिके, प्रदर्शने या माध्यमांतून त्यांनी कलेचा प्रसार केला. निसर्गचित्रे आणि जलरंगातील चित्रे हा त्यांचा जिव्हाळ्याचा विषय होता. निसर्गचित्रांची त्यांनी शंभराहून अधिक एकल प्रदर्शने केली. दीर्घकाळ सातत्याने निसर्गचित्रण हा एकच विषय हाताळल्यामुळे त्यांच्या शैलीत एकजिनसीपणा भासतो. त्यात नावीन्य व प्रयोगशीलता आढळत नाही. बँका, तसेच सार्वजनिक ठिकाणी निसर्गचित्रे लावून व त्यांची विक्री करून त्यांनी चित्रसाक्षरता वाढविण्याचे प्रयत्न केले.

             बॉम्बे आर्ट सोसायटी, महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन आणि इतर प्रदर्शनांमधून डेंगळेंना अनेक पुरस्कार मिळाले. वयाच्या पंचाहत्तराव्या वर्षी त्यांनी ‘चित्रकलेतील अलंकरणाचे अमर्याद स्वरूप’ या विषयावर मार्गदर्शकाशिवाय ‘डॉक्टरेट’ मिळविली. अत्यंत व्यग्र अशा आयुष्याच्या या प्रवासात त्यांना पत्नी कमलाताईंची साथ लाभली.

- रंजना सुतार

डेंगळे, दिवाकर कृष्णाजी