Skip to main content
x

देसाई, कपिल कल्याणदास

     मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश कपिल कल्याणदास देसाई यांचा जन्म मुंबईत एका समाजसुधारकाच्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील डॉ.कल्याणदास देसाई आर्यसमाजी होते. त्यांनीच स्थापन केलेल्या गुजरातमधील शुक्लतीर्थ येथील ‘गुरुकुल रेसिडेन्शियल स्कूल’ या निवासी शाळेत कपिल यांचे शालेय शिक्षण झाले. १९२८मध्ये मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर ते मुंबई येथील एल्फिन्स्टन महाविद्यालयात दाखल झाले. या महाविद्यालयातून त्यांनी १९३२ साली पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी मुंबई येथील गव्हर्नमेंट लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेतले. तेथे ‘हिंदू कायदा’ या विषयात त्यांना प्रथम क्रमांक मिळाला आणि जे पारितोषिक मिळवावे अशी तेव्हा प्रत्येक विद्यार्थ्याची महत्त्वाकांक्षा असे ते जज् स्पेन्सर पारितोषिक त्यांना मिळाले. तसेच सर आर्नॉल्ड स्कॉलरशिप ही मानाची शिष्यवृत्तीही त्यांना मिळाली. त्यांनी आपली कायद्याची पदवी १९३४मध्ये मिळविली. नंतर जानेवारी १९३८मध्ये त्यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मूळ शाखेत वकिली सुरू केली. प्रारंभी कन्हैयालाल मुन्शी आणि नंतर पुरुषोत्तम त्रिकमदास यांच्या हाताखाली त्यांनी काम केले. थोड्याच काळात ते एक यशस्वी वकील म्हणून ओळखले जाऊ लागले.

     १८ एप्रिल १९५८ रोजी देसाई यांची मुंबई उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून आणि १२डिसेंबर१९५९ रोजी कायम न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.  मुख्य न्यायाधीश एस.पी.कोतवाल यांच्यानंतर न्या.देसाई २७सप्टेंबर१९७२ रोजी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश झाले. २६ऑक्टोबर१९७२ रोजी ते या पदावरून निवृत्त झाले. मुख्य न्यायाधीश म्हणून  त्यांची कारकीर्द अल्प असली, तरी मुंबई उच्च न्यायालयातील त्यांची एकूण कारकीर्द साडेचौदा वर्षांची होती. या काळात त्यांनी केलेल्या कामावरून कायद्याच्या मूलतत्त्वांवरील आणि व्यावहारिक गोष्टींवरील त्यांची पकड, दोन्ही बाजूंचे म्हणणे शांतपणे ऐकून घेऊन त्वरित निकाल देण्यातले त्यांचे कौशल्य, त्याचप्रमाणे त्यांचा सभ्यपणा व शालीनता या गोष्टींचा प्रत्यय येत असे.

     - अ. ना. ठाकूर

 

देसाई, कपिल कल्याणदास