Skip to main content
x

देसाई, उत्तम तुकाराम

         त्तम तुकाराम देसाई यांचा जन्म कराड तालुक्यातील अणेे या छोट्या गावातील निरक्षर परंतु सुसंस्कृत, खानदानी आईवडिलांच्या पोटी झाला. देसाई यांचे वडील तुकाराम हे गिरणी कामगार होते. देसाई यांचे प्राथमिक शिक्षण अणे गावीच जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. ते सुरुवातीपासूनच एकपाठी व अभ्यासात चांगली गती असलेले विद्यार्थी होते. त्यांचे शालेय शिक्षण कोळे येथे झाले. अकरावीसाठी त्यांनी कोल्हापूर येथील प्रायव्हेट स्कूलमध्ये व १९६६ मध्ये प्रथम वर्गात ते एस.एस.सी. झाले. १९७० मध्ये कोल्हापूर येथील कृषी महाविद्यालयातून  ते बी.एस्सी. (कृषी) झाले व १९७२ मध्ये पुणे येथील कृषी महाविद्यालयातून उद्यानशास्त्र विषयात एम.एस्सी. झाले. भा.कृ.सं.सं.तून त्यांनी पीएच.डी.ची पदवी मिळवली.

        महाविद्यालयात असताना त्यांना नाट्याभिनय, कुस्ती, कबड्डी यांसारख्या खेळात रस होता. उच्च शिक्षण प्राप्त केल्यानंतर डॉ. देसाई यांनी सी.एस.आय.आर.मार्फत पूल ऑफिसर म्हणून ८ ऑक्टोबर १९७६ रोजी म.फु.कृ.वि. येथे काम करण्यास सुरुवात केली. त्यानंतर विविध पदांवर काम करून २००६मध्ये उद्यानविद्या प्रमुख या पदावरून निवृत्त झाले. त्यांनी १९९० मध्ये इंग्लंडमधील वालशाल पॉलिटेक्निकमध्ये एक वर्षाचा पदव्युत्तर प्रशिक्षण अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यांनी लिंबवर्गीय पिकात महत्त्वाचे संशोधन कार्य केले.

        देसाई यांनी कागदी लिंबाची ‘साई (राहुरी) सरबती’ ही मोठ्या आकाराची व जास्त उत्पादन देणारी जात विकसित करून लागवडीसाठी प्रसारित केली. त्यांनी कागदी लिंबावर संजीवकांचा वापर करून उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन घेण्याचे तंत्रही विकसित केले होते. कागदी लिंबाबद्दलच्या संशोधनासाठी त्यांचा १९९३ मध्ये पेरियाक्युलम (केरळ) येथे झालेल्या लिंबावरील राष्ट्रीय परिसंवादात ‘कॉपर प्लेक’ देऊन गौरव करण्यात आला. याच कालावधीत त्यांनी पदव्युत्तर संशोधनामार्फत आंब्याची ‘साई सुगंध’ ही संकरित जात, आंब्याच्या नियमित बहरासाठी शेंडा खुडण्याचे तंत्र, डाळिंब छाटणी तंत्र इ. विविध तंत्रे विकसित केली. त्यांनी बोराच्या इलायची जातीमधील मेल स्टरलिटी सर्वप्रथम निदर्शनास आणून दिली. त्यांनी राष्ट्रीय संशोधन प्रकल्प, मैदानी प्रदेश योजनेचे सहयोगी संशोधन संचालक म्हणूनही काम केले. या केंद्रावर त्यांनी प्रामुख्याने जाती सुधारणेचे कार्य केले. त्यांनी भेंडी, घेवडा, घोसावळी इ. भाजीपाल्यांच्या व फुलझाडांच्या जाती विकसित करण्यास सहकार्य केले. नियमित शैक्षणिक  व संशोधनाच्या कामाव्यतिरिक्त ‘करंट सायन्स’, ‘राजस्थान हॉर्टिकल्चर सोसायटी संशोधन नियतकालिक’, ‘इंडियन जर्नल ऑफ हॉर्टिकल्चर’, या संशोधन नियतकालिकांत परीक्षक म्हणून काम केले.

        राज्य नियोजन मंडळाच्या फळ उपसमितीवर देसाई यांची सभासद म्हणून नेमणूक केली गेली होती. तसेच त्यांनी एम.एस्सी.च्या २६ व पीएच.डी.च्या ८ विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते. त्यांचे एकूण ११८ संशोधनपर लेख व २६ विस्तार लेख प्रसिद्ध झाले असून त्यांनी ३ पुस्तके व १० पुस्तक प्रकरणेही लिहिलेली आहेत.

- प्रा. भालचंद्र गणेश केसकर

देसाई, उत्तम तुकाराम