Skip to main content
x

देसाई, विठ्ठल रघुनाथ

मास्टर विठ्ठल

        मास्टर विठ्ठल यांच्या भूमिका पाहून प्रेक्षकांनी त्यांना ‘इंडियन डग्लस’ ही उपाधी बहाल केली होती.

        १९०६-७च्या सुमारास महाराष्ट्रात प्लेगच्या साथीने धुमाकूळ घातला होता. तेव्हाच पंढरपूर येथे विठ्ठल यांचा जन्म झाला. पितृछत्र हरपल्यामुळे मास्टर विठ्ठल, आई तानीबाई हिच्यासमवेत कोल्हापुरात राहत होते. गरिबीमुळे त्यांचे शालेय शिक्षण जेमतेमच चालू होते. तथापि, फरीदगदगा, तलवारबाजीत हात चालविण्यात मात्र मास्टर विठ्ठल यांनी प्राविण्य मिळविले. कोल्हापुरात खरी कॉर्नरजवळ मास्टर विठ्ठल राहत असत, त्याच गल्लीत सरदार बाळासाहेब यादवही राहत असत. त्यांनी चौकशी करून आईच्या परवानगीने विठ्ठलला बाबूराव पेंटरांच्या ‘महाराष्ट्र फिल्म कंपनी’त प्रवेश मिळवून दिला व तेथे बाळासाहेब यादवांनी मास्टर विठ्ठल यांना लाठी, बोथाटी, तलवारीचे वार पवित्रात कसे काढायचे, फरीदगदगा, घोडेस्वारी यांचे शास्त्रशुद्ध शिक्षण दिले.

        बाबूराव पेंटरांनी मास्टर विठ्ठल यांना ‘कल्याण खजिना’ (१९२४) या मूकपटात नर्तकीची भूमिका दिली. त्या वेळेस महाराष्ट्र फिल्म कंपनीत भालजी पेंढारकरांचा राबता असे. त्यांच्या नजरेत मा. विठ्ठल भरले आणि त्यांनी भालजींबरोबर मुंबईस प्रयाण केले. भालजींनी मुंबईत ‘बाजीराव-मस्तानी’ हा शारदा फिल्म कंपनीचा पहिला मूकपट बनवला. त्यात मास्टर विठ्ठल यांचे तलवारबाजीचे हात पाहून शारदाचे मालक बी.के. देव बेहद्द खूश झाले आणि मास्टर विठ्ठल यांना शारदा फिल्म कंपनीत दरमहा २७ रुपये पगारावर नोकरीस ठेवले. ते वर्ष होते १९२७.

       शारदा फिल्म कंपनीने ‘मदन कला’, ‘पतिघाटनी सती’, ‘रत्नमंजिरी’, ‘सुवर्णकमल’ असे चार मूकपट १९२६ सालात रुपेरी पडद्यावर प्रदर्शित केले. हे सर्व स्टंटपट होते व या साऱ्या चित्रपटांनी मास्टर विठ्ठल हे नाव प्रसिद्ध होऊ लागले. मास्टर विठ्ठल यांच्या मारामारीच्या दृश्यांवर प्रेक्षक बेहद्द खूश झाले. त्यानंतर मास्टर विठ्ठल यांची कीर्ती आणि त्यांच्या चित्रपटांची संख्या वाढत गेली. मास्टर विठ्ठल यांच्या नावापुढे ‘स्टंट चित्रपटाचा हुकमी एक्का’ असे विशेषण लागू लागले. त्या वेळी हॉलिवूडमध्ये ‘डग्लस फेअरबॅक्स’ अशाच धाडसी व मारधाड चित्रपटातून काम करीत असत. त्यांचीही कीर्ती मोठी होती. परदेशात तो आणि भारतात मास्टर विठ्ठल म्हणून प्रेक्षक मास्टर विठ्ठल यांचा ‘इंडियन डग्लस’ म्हणून उल्लेख करत.

       मास्टर विठ्ठल यांच्या चित्रपटांनी शारदा फिल्म कंपनीचा दर्जा वाढला. त्याचबरोबर त्यांची मिळकतही वाढली. त्या काळात सर्वात जास्त पैसे घेणारा नट तेच होते. कंपनी त्या काळात त्यांना दरमहा दोनशे रुपये पगार देत असे. मास्टर विठ्ठल यांनी मूकपटांच्या काळात मिळालेल्या पैशातून कोल्हापुरात जागा घेऊन एक चाळ बांधली. त्यांनी १९२९-३०च्या काळात मोटारसायकल घेतली. त्या काळात ते स्वत:च्या वाहनाने चित्रीकरणाला जाणारे एकमेव कलाकार होते.

      १९२७ सालात ओरिएंट पिक्चर्स कॉर्पोरेशन या नवल गांधी यांच्या कंपनीने रवींद्रनाथ टागोर यांच्या कथेवरून ‘विसर्जन’/‘बलिदान’/‘सॅक्रिफाईस’ नावाचा सामाजिक चित्रपट काढला व त्यात मास्टर विठ्ठल हे नायक आणि झुबेदा व सुलोचना या दोन नायिका होत्या. हा चित्रपट खूपच चालला. त्या काळात मूकपट सरासरी दोन किंवा तीन आठवडे चालत. पण मास्टर विठ्ठलांचे नाव असल्यामुळे मुंबईच्या इंपीरियल थिएटरमध्ये ‘बलिदान’ ८ आठवडे चालला. १९३७ सालात शारदा फिल्म कंपनीने अँथोनी होप्सच्या ‘प्रिझनर ऑफ झेडा’ कादंबरीवरून ‘राजा तरंग’ नावाचा मूकपट काढला, त्यात मास्टर विठ्ठल यांची दुहेरी भूमिका होती. एकाच चित्रपटातून दुहेरी भूमिका करणारे पहिले कलाकार होते मास्टर विठ्ठल. ‘स्वदेश सेवा’ (१९२७) या चित्रपटात मास्टर विठ्ठल यांनी पडद्यावरचा पहिला बंडखोर नायक रंगवला होता. भारतीय रुपेरी पडद्यावरचा ‘पहिला सर्वाधिक लोकप्रिय महानायक’ मास्टर विठ्ठलच होते.

       आर्देसर इराणी यांची इंपीरियल फिल्म कंपनी ही त्या काळातील फार मोठी फिल्म कंपनी. पण त्या कंपनीचे चित्रपट मास्टर विठ्ठल यांनी भूमिका केलेल्या शारदा फिल्म कंपनीच्या चित्रपटासमोर चालत नसत. दिग्दर्शक के.पी. भावे हे इंपीरियलमध्ये कामास होते.

      १९२७ साली मास्टर विठ्ठल यांचा विवाह झाला होता. मास्टर विठ्ठल त्या वेळेस बनाम लेन येथे राहत असत. के.पी. भावे यांनी त्यांची भेट घेतली व इंपीरियल फिल्म कंपनीत येण्याचा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला आणि शारदा फिल्म कंपनी देत असलेल्या पगारापेक्षा जास्त पगार देण्याचे मान्य केले. पुढे प्रत्यक्ष मास्टर विठ्ठल यांना घेऊन के.पी. भावे हे आर्देसर इराणींकडे गेले तेव्हा त्यांनी शारदा फिल्म कंपनीपेक्षा जास्त पगार मी तुला देईन, असे आश्‍वासन दिले. भोगीलाल दवे यांना हे कळल्यावर त्यांनी विठ्ठलरावांवर कोर्टात दावा दाखल केला. नोटीस घेऊन विठ्ठल आर्देसर इराणी यांच्याकडे गेले. तेव्हा त्यांनी सांगितले की, तुझी केस मी लढवीन, पण एक लक्षात ठेवा, ज्यादा पैसे मिळतील तिकडे काम करीन असे सांगा. कोर्टात केस उभी राहिली. बॅरिस्टर महमदअली जीना हे मास्टर विठ्ठल यांच्यातर्फे वकील म्हणून उभे राहिले.

      इंपीरियल कंपनीने जास्त पैसे देण्याचे मान्य केल्यामुळे मा. विठ्ठल इंपीरियल फिल्म कंपनीत दाखल झाले. कोर्टात नटाच्या पगाराचा लिलाव त्यापूर्वी कधीही घडला नव्हता आणि यापुढे घडेल असे वाटत नाही. मास्टर विठ्ठल यांनी १९३० साली ‘सागर फिल्म कंपनी’साठी ‘अरुणोदय’, ‘बच्चा-ई-साकू’ आणि ‘दिलावर’ असे तीन चित्रपट केले. सागर ही इंपीरियलचीच एक कंपनी होती. त्याच सुमारास इंपीरियलमध्ये बोलका चित्रपट काढण्याची धामधूम सुरू झाली. बोलपटाचे नाव ठरले ‘आलम आरा’. मास्टर विठ्ठल, झुबेदा, पृथ्वीराज, जगदीश सेठी, दादा साळवी आणि सखू हे कलाकार ठरले. मुंबईच्या मॅजेस्टिक चित्रपटगृहातून १४ मार्च १९३१ रोजी ‘आलम आरा’ प्रदर्शित झाला. हा भारताचा पहिला बोलपट आणि त्या बोलपटात मास्टर विठ्ठल हे नायकाच्या भूमिकेत होते.

      ‘आलाम आरा’नंतर ‘अनंगसेना’ आणि ‘मेरी जान’ या दोन बोलपटात ते नायकाच्या भूमिकेत होते. चित्रपटात ८ व ११ गाणी होती. मास्टर विठ्ठल यांना गाता येत नसे. तेव्हा पार्श्‍वगायन आणि पुनर्ध्वनिर्मुद्रण हे तांत्रिक प्रकार अस्तित्वात नव्हते. त्यामुळे हिंदी बोलपटात काम मिळण्याची फारशी संधी उपलब्ध नव्हती. मराठी बोलपट कोल्हापुरात निर्माण होत. पुण्यात दादासाहेब तोरणे यांची ‘सरस्वती सिनेटोन’ मात्र हिंदी-मराठी बोलपट तयार करत.

      तोरणे यांनी मास्टर विठ्ठल ह्यांना पुण्यात बोलवून घेतले आणि ‘औट घटकेचा राजा’, ‘आवारा शहजादा’ या मराठी आणि हिंदी बोलपटांच्या दिग्दर्शनाची जबाबदारी सोपवली. मार्क ट्वेनच्या ‘प्रिन्स अ‍ॅन्ड पॉपर’ या कादंबरीवर हा बोलपट आधारित होता. ‘छत्रपती संभाजी’ या सरस्वती सिनेटोनच्या पुढच्या चित्रपटात मास्टर विठ्ठल यांनी संभाजीची भूमिका केली होती. ‘ठकसेन राजपुत्र’/‘भेदी राजकुमार’ या तिसऱ्या मराठी-हिंदी चित्रपटातून त्यांनी नायकाची भूमिका केली.

     १९४१ सालात मास्टर विनायक यांच्या ‘अमृत’ या मराठी-हिंदी बोलपटातून त्यांनी खलनायकाची व्यक्तिरेखा सजवली व त्यानंतर भालजी पेंढारकरांनी बोलवल्यामुळे त्यांनी कोल्हापूर गाठले. तेथे त्यांनी ‘सूनबाई’, ‘बहिर्जी नाईक’, ‘जय भवानी’, ‘मीठभाकर’ असे वीस-पंचवीस बोलपट केले. प्रभातच्या ‘रामशास्त्री’त राणोजी ही माधवराव पेशव्यांच्या सैन्यातील शिलेदाराची भूमिका केली. तसेच भालजींच्या ‘स्वराज्याचा शिलेदार’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले.

      १९६६ सालात पडद्यावर आलेला ‘शोधा म्हणजे सापडेल’ हा मास्टर विठ्ठल यांनी अभिनय केलेला शेवटचा बोलपट. त्यांनी जवळपास शंभरहून अधिक चित्रपटांतून काम केले होते.

- द.भा. सामंत

देसाई, विठ्ठल रघुनाथ